कोण होत्या मेरी थार्प नकाशाशास्त्र कार्टोग्राफर समुद्रविज्ञान मिड अटलांटिक रिज | who was marie tharp cartographer map maker oceonographer mid atlantic ridge vp-70 | Loksatta

कोण होत्या मेरी थार्प ?

प्रस्थापित विरूद्ध नवोदितांचा संघर्ष कायमच सर्वत्र पहायला मिळतो. इथेही मेरी यांच्या संशोधनावर प्रश्नचिह्न निर्माण केले गेले. त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलं आहे, की “त्यांना वादविवाद, चर्चा करत बसू देत. मी नकाशा तयार करण्यात गढून गेले आहे.

कोण होत्या मेरी थार्प ?
मेरी यांनी १९५० मधे आपल्या करीअरची सुरूवात लॅमॉन्ट जिऑलॉजिकल ऑब्झर्व्हेटरीमधून केली; तेव्हा त्या संस्थेत काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. (Photo Credit: Lamont-Doherty Earth Observatory and the estate of Marie Tharp)

समुद्रसपाटीचा पहिला जागतिक नकाशा प्रकाशित करणाऱ्या अमेरिकन भूवैज्ञानिक मेरी थार्प यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २१ नोव्हेंबर रोजी गुगलने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित खास अॅनिमेटेड डुडल तयार करून आदरांजली वाहिली. विसाव्या शतकामध्ये मॅपिंग तसंच समुद्रशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मेरी थार्प यांना अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसने २१ नोव्हेंबर १९९८ साली सर्वश्रेष्ठ कार्टोग्राफर म्हणून सन्मानित केले होते. त्या सन्मानाची आठवण आणि थार्प यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुगलच्या होमपेजवर अलीकडेच २१ नोव्हेंबर रोजीच थार्प यांचे डुडल प्रसिद्ध करण्यात आले.

आणखी वाचा : तोफांच्या माऱ्याने जमलं नाही, ते डासांनी…

मॅपिंग म्हणजेच नकाशाशास्त्र तसंच समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्टोग्राफर आणि भूवैज्ञानिक म्हणून नामांकित असलेल्या थार्प यांच्या मौलिक कामगिरीमुळे खंडीय प्रवाहांचे सिद्धांत बळकट होण्यास मदतच झाली. मेरी थार्पचा जन्म अमेरिकेतल्या मिशिगनमधे ३० जुलै १९२० रोजी झाला. अमेरिकेच्या कृषि विभागात त्यांचे वडील कार्यरत होते. मेरीने मिशिगन विद्यापीठात पेट्रोलिअम विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्या १९४८ साली ती न्यूयॉर्कमधे दाखल झाल्या. नकाशावाचन आणि कार्टोग्राफी हे सुरुवातीपासून त्यांच्या आवडीचे विषय होते. १९५० मधे त्यांनी जेव्हा आपल्या करीअरची सुरूवात लॅमॉन्ट जिऑलॉजिकल ऑब्झर्व्हेटरीमधून केली; तेव्हा त्या संस्थेत काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. भूगर्भशास्त्रज्ञ ब्रूस हेगन यांच्याशी मेरीचा परिचय इथेच झाला. या संस्थेनेही थार्प यांना लॅमोंटडिहर्टी हेरिटेज वार्षिक पुरस्कार देऊन गौरवले होते.

आणखी वाचा : उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

करीअरच्या सुरूवातीला त्यांच्या असं लक्षात आलं की, पृथ्वीवरील बहुतांश जमिनीच्या नकाशाच्या रेखांकनाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु महासागराविषयी कुणाहीकडे फारशी माहिती किंवा अशाप्रकारच्या कामाची नोंद उपलब्धच नाही. साहजिकच मेरी यांनी आपले लक्ष्य महासागराच्या तळाकडे केंद्रित केलं. याबद्दल त्या लिहितात, “माझ्याकडे विलक्षण शक्यतांनी आणि आकर्षक जिगसॉ कोड्याने भरून टाकण्यासाठी कोरा करकरीत कॅनव्हास होता. आयुष्यातच एकदाच मिळालेली आणि इतिहासात जगातील कोणाहीसाठी संधी होती. चाळीसच्या दशकात विशेषतः एका महिलेसाठी तर नक्कीच!”

आणखी वाचा : जीन्सचा खिसा हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही…

अटलांटिक महासागराच्या तळाचा डेटा जमवायचा तर जहाजावर मेरीने जाणं क्रमप्राप्त होतं. परंतु महिलेने अशाप्रकारचं काम करावं यासाठी जहाजावरील पुरूषांची मानसिकता अनुकूल नव्हती. १९४० -५० च्या दशकामध्ये महिलांनी या पुरूषप्रधान क्षेत्रामध्ये येऊन काम करणं, हेच खरं तर आव्हानात्मक होतं, असं मेरीने लिहून ठेवलं आहे. त्यामुळे हा डेटा जमवण्याचं काम ब्रूस हेगन यांच्यावर मेरी यांनी सोपवलं. अटलांटिक महासागराच्या खोलीचं मोजमाप करायचं तर त्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. इको साऊंडर्सच्या नवीन संशोधनामुळे मेरीला मिड अटलांटिक रिज शोधण्यात मदतच झाली. त्यांनी सर्वप्रथम उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाचा नकाशा तयार केला.

आणखी वाचा : केस सरळ करण्यासाठी नेमका किती वेळा स्ट्रेटनर वापरावा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

१९५७ मध्ये मेरी थार्प आणि हेगन यांनी एकत्रितपणे अटलांटिकमधील समुद्रसपाटीचा डेटाच्याआधारे पहिला नकाशा प्रसिद्ध केला. त्यांच्या या संशोधनावर प्रस्थापित भूवैज्ञानिकाकांचा विश्वास बसणे कठीण होते. या मंडळींनी पाण्याखालील चित्रं टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या साह्याने थार्प यांच्या निष्कर्षाची शहानिशा करायचं ठरवलं. आश्चर्य म्हणजे हेगेन यांनी जमविलेला समुद्रसपाटीचा डेटा आणि त्यावर आधारित थार्प यांनी तयार केलेल्या नकाशा, मांडलेला निष्कर्षासहित सिद्धांत यांत साम्य आढळून आले. अशाप्रकारे मिड – अटलांटिक रिजला मान्यता मिळाली.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

प्रस्थापित विरूद्ध नवोदितांचा संघर्ष कायमच सर्वत्र पहायला मिळतो. इथेही मेरी यांच्या संशोधनावर प्रश्नचिह्न निर्माण केले गेले. त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलं आहे, की “त्यांना वादविवाद, चर्चा करत बसू देत. मी नकाशा तयार करण्यात गढून गेले आहे. सत्य अस्तित्वात आहे आणि चित्र (छायाचित्र) जे सांगेल ते हजार शब्दांतही सांगता येणार नाही. शेवटी ‘सीईंग इज बिलिव्हिंग’. (प्रत्यक्षाला प्रमाण कशाला…!)”

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

अटलांटिक महासागराच्या मध्यावर दक्षिणोत्तर पसरलेली सर्वाधिक लांबीची पर्वतरांग असून पृथ्वीवरील सर्वात मोठी भूशास्त्रीय रचना आहे. या रिजला मध्य अटलांटिक उंचवटा किंवा खंडीय उंचवटा असंही एक नाव आहे. याच मिड अटलांटिक रिजमध्ये अनेक दऱ्या, भेगा असल्याच्या नोंदी मेरी थार्प यांनी केल्या होत्या. याच भागामध्ये भूकंपाचे केंद्रही होते. थार्प आणि हेगेन यांच्या संशोधनानंतर सुमारे दोन दशकांनी नॅशनल जिओग्राफिकने द वर्ल्ड ओशन फ्लोर बाय थार्प अँड हेगन या नावाने संपूर्ण महासागराच्या तळाचा नकाशा प्रकाशित केला. १९९५ साली थार्प यांनी आपला नकाशासंग्रह लायब्ररी ऑफ कॉंग्रेसला दान केला. २३ ऑगस्ट २००६ रोजी न्यूयॉर्कमध्ये मेरी थार्प यांचे निधन झाले. कॅटिलिन लार्सन, रेबेका नेसेल आणि डॉ. टियारा मूर या महिला आज समुद्रविज्ञान तसंच भूविज्ञान क्षेत्रामध्ये मेरी थार्प यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
(शब्दांकन : साक्षी सावे)

Marie Tharp, July 2001. (Credit: Lamont-Doherty Earth Observatory and the estate of Marie Tharp)

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 07:42 IST
Next Story
तोफांच्या माऱ्याने जमलं नाही, ते डासांनी…