डॉ. स्वाती अजित गायकवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ
पूर्वी पाळी येण्याचं सरासरी वय १२–१३ वर्षं होतं. मात्र आज अनेक मुलींना वयाच्या ८ व्या वर्षीच पाळी येते. ज्या वयात मुलींनी खेळण्यात, धावण्यात, स्वप्न पाहण्यात रमायला हवं, त्या वयात त्यांना सॅनिटरी पॅड, पोटदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागत आहे.
यामागची प्रमुख कारणं कोणती?
बदललेली जीवनशैली हे यामागचं मुख्य कारण आहे. जंक फूड, मैद्याचे पदार्थ, शर्करायुक्त पेय, प्रक्रिया केलेले अन्न यामुळे शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे इस्ट्रोजेन हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे मेंदूला चुकीचा संदेश जातो की आपले शरीर हे प्रजननासाठी तयार आहे.
यासोबतच प्लास्टिकचा वाढता वापर हीदेखील एक गंभीर बाब आहे. गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यास त्यातून झिनो-इस्ट्रोजेन्स नावाची रसायनं अन्नात मिसळतात. ही रसायनं शरीरात नैसर्गिक हार्मोन्ससारखी वागून अकाली वाढीची प्रक्रिया सुरू करतात.
दुधात व मांसात असलेले कृत्रिम हार्मोन्सही यासाठी जबाबदार ठरत आहेत. उत्पादन वाढीसाठी जनावरांना दिली जाणारी औषधं व इंजेक्शन्स अप्रत्यक्षपणे मुलांच्या शरीरात पोहोचतात. याचा परिणाम मुलींच्या हार्मोनल संतुलनावर होतो.
कोणते परिणाम होतात?
अकाली पाळीचे परिणाम केवळ शारीरिक नाहीत, तर मानसिकही आहेत. मुली मानसिकदृष्ट्या तयार नसताना त्यांच्यावर प्रौढत्व लादलं जातं. याशिवाय लवकर पाळी आल्यास उंची कमी राहण्याचा धोका वाढतो, कारण हाडांची वाढ लवकर थांबते. काही प्रकरणांत पाळी थांबवण्यासाठी हार्मोन थेरपी द्यावी लागते, जी मुलीसाठी वेदनादायक आणि मानसिक तणाव निर्माण करणारी ठरू शकते.
ज्या मुलींना खूप लवकर मासिक पाळी येते, त्यांना भविष्यात कमी वयातच रक्तदाब आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. याचबरोबर अशा मुलींमध्ये पुढे हृदयविकार, अर्धांगवायू किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका तुलनेने वाढू शकतो.
लवकर पाळी आल्यामुळे मुलींची उंची वाढणे थांबते. कारण हार्मोन्समधील बदलांमुळे हाडांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नाही. यामुळे आत्मविश्वास कमी होणे, चिडचिडेपणा किंवा नैराश्यासारखी लक्षणेही दिसून येतात.
यावर उपाय काय?
पालकांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. घरचं ताजं अन्न, मैद्याचा तसेच साखरेचा कमी वापर, जेवणासाठी स्टील-काचेच्या भांड्यांचा वापर करणे, मैदानी खेळ खेळणे, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे हे सर्व साधे पण प्रभावी उपाय आहेत.
लाड करणं म्हणजे आरोग्याशी तडजोड नव्हे. मुलांचं बालपण सुरक्षित ठेवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे.
आठव्या वर्षी पाळी येणं ही प्रगती नाही, तर आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि ती आजच ऐकली गेली पाहिजे.
