Premium

गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय?

गौतमी जे करतेय ती महाराष्ट्राची संस्कृती नाही तर मग अशा घाणेरड्या शिव्या देणं ही आपल्या राज्याची संस्कृती आहे का?

gautami patil
गौतमीने माफी मागितली तरीही तिला इतका पराकोटीचा विरोध का?

गौतमी पाटील. मागच्या आठ-दहा महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव. सप्टेंबर २०२२ मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या गौतमीचे हावभाव पाहून वादाला तोंड फुटलं होतं. सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमीने विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून डान्स केला होता. त्यानंतर जो वाद सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे. यादरम्यान, गौतमीने माफी मागितली, सुधारणा करण्याची कबुली दिली, पण वाद काही शमत नाहीये. आता तिच्या आडनावावरून वाद सुरू झालाय, यावर राजकारणीही प्रतिक्रिया देत आहेत. पण खरंच तिला विरोध करण्यासाठी वापरली जाणारी कारणं तेवढी मोठी आहेत का? असा प्रश्न मला वारंवार पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर गौतमी पाटीलची जवळपास एक तासांची एक मुलाखत आली होती. ती मुलाखत मी पाहिली, त्यानंतर तिला विरोध करणारे निव्वळ कारणं शोधत असल्याचं मला जाणवलं. (इतरांची मतं वेगळी असू शकतात.) घरची परिस्थिती हलाखीची, वडील तिला आईजवळ सोडून निघून गेले, आईने हाताला मिळेल ते काम करून गौतमीला मोठं केलं, आईच्या प्रकृतीमुळे तिचं शिक्षण सुटलं आणि तीही आईबरोबर कामाला जाऊ लागली. गौतमीला डान्सची आवड होती, त्याच आवडीतून तिने डीजे गाण्यांवर नाचायला सुरुवात केली. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून ती आईला सांभाळतेय व तिच्या डान्स ग्रूपलाही.

हेही वाचा – “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं…” शाहीर संभाजी भगत यांची गौतमी पाटीलबाबत पोस्ट, म्हणाले, “आडनाव बदलून लाज…”

गौतमी पाटील अश्लील डान्स करते, असे आरोप झाल्यानंतर तिने माफीही मागितली. पण विरोध करणाऱ्यांचा विरोध तीळमात्रही कमी होत नाही, ते दुसरं कारण शोधायला तयारच असतात. डीजे गाण्यांवर नाचणारी गौतमी पाटील ही महाराष्ट्रात एकटीच आहे का? तर नाही. तिच्यासारख्या असंख्य मुली आहेत. विदर्भात तर अशा डान्सचे मनोरंजनपर कार्यक्रम मी लहानपणापासून पाहात आले आहे, पण त्यातल्या कुणालाच कधीच विरोध झाला नाही.

गौतमीने कोणताही व्हिडीओ शेअर केला, फोटो पोस्ट केला की त्यावर घाणेरड्या व गलिच्छ कमेंट्स असतात. तिला आईवरून घाण शिव्या दिल्या जातात. गौतमी जे करतेय ती महाराष्ट्राची संस्कृती नाही तर मग अशा घाणेरड्या शिव्या देणं ही आपल्या राज्याची संस्कृती आहे का? आपल्या इथं सनी लिओनीसारख्या पॉर्न स्टारला आदर दिला जातो, तिला काम मिळतं, तिने ती इंडस्ट्री सोडली म्हणून तिचं तोंडभरून कौतुक केलं जातं, पण दुसरीकडे गौतमीसारखी मुलगी डान्स करून तिचं कुटुंब चालवतेय तर तिथे मात्र तिला कडाडून विरोध केला जातोय.

हेही वाचा – “तू मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’…” किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी खास पोस्ट चर्चेत

गौतमीने डान्स केला नाही, तिच्या कुटुंबावर, तिच्या डान्स ग्रूपवर उद्या उपासमारीची वेळ आली तर हे विरोध करणारे त्यांना जेवू घालणार आहेत का? कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर दोन वर्षांपूर्वी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की, आपल्या शरीराचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा स्रीला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. अलीकडेच ओडिशामध्ये एका महिलेला वेश्याव्यवसाय केल्याने अटक झाली, तिने कोर्टात दाद मागितल्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरोबर असल्याचं मत त्या कोर्टाने नोंदवत तिची सुटका केली. जर, आपल्या देशात वेश्याव्यवसाय हा गुन्हा नसेल तर एखादीच्या डान्सला इतका पराकोटीचा विरोध कशाला?

आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, असं म्हणतात. पण याच महाराष्ट्रात एका तरुणीला तिच्या डान्समुळे धारेवर धरणं, तिचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल करणं, तिला सारख्या शिव्या घालणं सातत्याने केलं जातंय, त्यामुळे आपण माणूस म्हणून नक्की कोणत्या दिशेने जात आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 17:18 IST
Next Story
आहारवेद: ‘भाज्यांचा राजा’ वांगी