कुंकू आणि मंगळसूत्र हा भारतीय संस्कृतीत सौभाग्यलंकार मानला जातो. विवाहित महिला पारंपरिक पद्धतीने गळ्यात मंगळसूत्र घालत कपाळावर टिकली (पूर्वी कुंकू लावलं जायचं) लावतात. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नवऱ्याचे निधन झाल्यानंतर विधवा महिलेला कुंकू व मंगळसूत्र हा सौभाग्यलंकार घालणं वर्ज्य आहे, असा एक समज समाजात कैक वर्षे रूढ आहे. काळानुसार, पिढीनुसार सगळ्याच परंपरा बदलल्या जातात किंबहुना बदलाव्या लागतात. तसंच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या विधवा महिलाही आता गळ्यात मंगळसूत्र घालतात. पुरुषांच्या नजरेतून सुटण्याचं एकमेव सुरक्षाकवच म्हणून मंगळसूत्राकडे पाहिलं जातं. रिती व परंपरा थोड्या फार प्रमाणात बदलण्यात माणसाला किंवा समाजाला अनेकदा हरकत नसते. पण, विचार बदलण्यात मात्र १०० टक्के असते. त्यामुळेच की काय अजूनही समाजात विधवांना प्रतिष्ठेची वागणूक मिळताना दिसत नाही. बरं, पुरुषांपेक्षा जास्त अपमान तर महिलांकडून केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलर्स मराठी वाहिनीवर ‘भाग्य दिले तू मला’ नावाची मालिका सुरू आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. धाकट्या जाऊबाईने विधवा असलेल्या मोठ्या जाऊबाईला अनावधानाने किंवा मुद्दाम हिणवण्यासाठी कुंकू लावण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर लगेचच चूक लक्षात आल्याचं दाखवून तिने सॉरी म्हटलं. यावर तिचा मुलगा व होणाऱ्या सुनेने खडे बोल सुनावले. कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी या आपल्या आजूबाजूलाच घडणाऱ्या असतात. कारण, मालिका किंवा चित्रपट हा समाजाचा आरसाच असतो एकप्रकारे.

हेही वाचा>> काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

आजही हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला विधवा महिलांना बोलावलं जात नाही. विधवांनीच विधवांसाठी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा २-३ बातम्या कानावर पडल्या होत्या. सण-समारंभाच्या कार्यक्रमात कोपऱ्यात बसणाऱ्या त्या विधवेच्या मनात विचारांचं वादळ उठलेलं असतं. माझ्याबरोबरच असं का? याचा विचार ती करत असते. तर दुसरीकडे आपल्याबरोबर जे घडलं ते कुणाच्याही बाबतीत घडू नये, असा विचारही सातत्याने तिच्या मनात येतो. पण, एका महिलेला दुसऱ्या महिलेचं दु:ख समजू शकत नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव काय? कुठल्या महिलेला आपण विधवा व्हावं असं वाटत असेल? पण दुर्दैवाने महिलाच दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजू शकत नाहीत.

आमच्या सोसायटीतही असाच हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता. या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. माझी आई कमिटीत असल्याने महिलांच्या हळदीकुंकवाची जबाबदारी असणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये तीदेखील होती. २६ जानेवारीलाच माझ्या वडिलांची पुण्यतिथी असते आणि याच दिवशी बहुतांश ठिकाणी हळदीकुंकवाचा कार्यक्रम होतो. तसाच आमच्याही सोसायटीत व्हायचा. हळदीकुंकवाच्या वाणापासून ते तिळगूळ, लाडवांपर्यंत सगळं सामान आमच्याच घरी पडलेलं असायचं. सकाळी नवऱ्याच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी हळदीकुंकवाची तयारी करणाऱ्या विधवा आईला मी फार जवळून पाहिलेलं आहे. ते सगळं करताना तिच्या मनाला काय वेदना होत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

हेही वाचा>> ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

सगळी तयारी करुनही हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात आई नेहमी दूरदूरच असायची. कारण विधवा महिलेचं समाजातील स्थान तिला ज्ञात होतं. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला आणि सोसायटीतील काही महिलांनी ह्यांनी कसं काय वाणाचं सामान आणलं वगैरे असा प्रश्न उपस्थित केला. बरं याआधीही सलग तीन वर्ष माझ्या आईनेच हळदीकुंकवाची तयारी केली होती. तेव्हा या बायकांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण त्यावर्षीच्या कार्यक्रमात वाणावरुन थोडे खटके उडाल्याने अचानक हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अर्थात, सोसायटीमधील इतर महिलांनी माझ्या आईची बाजू घेतली. पण, त्यानंतर यापुढे कोणत्याच हळदीकुंकवाची जबाबदारी न घेण्याचा निर्णय माझ्या स्वाभिमानी आईने घेतला होता. त्यानंतर काही महिलांनी घरी येऊन आईची माफीही मागितली. पण या सगळ्या गोष्टींना नंतर काहीच किंमत नसते. त्याचा फारसा उपयोगही होत नाही.

विधवा महिलांनी शुभकार्यात हात लावणं, आजही आपल्याकडे अशुभ मानलं जातं. मानसन्मान दूरचीच गोष्ट कार्यक्रमात त्यांची दखलही घेतली जात नाही. इतर महिलांप्रमाणे नटण्याचा त्यांना अधिकार नसतो. त्यातही दागदागिने घातल्यावर, नटून थटून गेल्यावर त्यांना टोमणे मारले जातात, नावं ठेवली जातात. एका महिलेलाच दुसऱ्या स्त्रीच्या भावना कळत नसतील. तर या स्त्रित्वाचा काय उपयोग. त्यामुळे बाईपणाचा आदर करा, ही समस्त महिला वर्गाला विनंती!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Widow should be treat respectfully by society other womens chatura loksatta kak
First published on: 25-01-2023 at 11:43 IST