ज्या महिलांना गरोदरपणात नैराश्याचा म्हणजेच ‘पेरिनेटल डिप्रेशन’चा सामना करावा लागला आहे, त्यांना बाळाला जन्म दिल्यांनतर पुढच्या २० वर्षांच्या कालावधीत हृदयविकाराची शक्यता, ही पेरिनेटल डिप्रेशन नसणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक असते, अशी माहिती एका नवीन संशोधनावरून समोर आली असल्याचे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

पेरिनेटल डिप्रेशनची समस्या महिलांना गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतर उद्भवू शकते. जागतिक स्तरावर अंदाजे पाच पैकी एका महिलेला या पेरिनेटल डिप्रेशनचा सामना करावा लागतो.

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासासाठी, पेरिनेटल डिप्रेशननंतर होणाऱ्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा अभ्यास करण्यासाठी सुमारे सहा लाख महिलांची माहिती वापरण्यात आली होती. त्या अभ्यासामध्ये महिलांमध्ये उच्च रक्तदाब, इस्केमिक हृदयरोग [हृदयापर्यंत रक्त पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित होणे] आणि हृदय बंद पडण्यासारखे भयंकर आजार होऊ शकतात असे समोर आले.

हेही वाचा : १९४३ साली प्रवास, खरेदीसाठी खर्च केले तब्ब्ल ‘८३ कोटी’ रुपये! कोण होत्या महाराणी सीतादेवी? पाहा

स्वीडनमधील स्टॉकहोम येथे असणाऱ्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील डॉ. एम्मा ब्रॅन, डॉ. डोन्घाओ लू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पूर्वी झालेल्या अभ्यासावर संशोधन करून असा निष्कर्ष काढला की, पेरिनेटल डिप्रेशनमुळे हृदयविकारासह प्री मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर, ऑटोइम्यून कंडिशन, आत्मघाती वर्तन आणि अकाली मृत्यूसारख्या गंभीर आजार होण्याचा धोका असू शकतो.

“जगभरात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांनी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये आता महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्याविषयी समस्यांचा समावेश करण्याची सतत चर्चा होत असते”, असे डॉक्टर लू यांनी म्हटले आहे.

“पेरिनेटल डिप्रेशन हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांची पूर्वसूचना देऊ शकते की नाही, हे आम्हाला पाहायचे होते”, असे ते अभ्यासक म्हणाले.

स्वीडनमध्ये झालेल्या सर्व बाळांच्या जन्माची नोंद ठेवणाऱ्या, स्वीडिश वैद्यकीय जन्म नोंदणीच्या मदतीने, २००१ ते २०१४ दरम्यान जन्म देणाऱ्या आणि पेरिनेटल डिप्रेशन असणाऱ्या ५५,५३९ महिलांची माहिती गोळा केली. तसेच, त्याच कालावधीतील पेरिनेटल डिप्रेशन नसणाऱ्या ५,४५,५६७ महिलांची माहिती एकत्र केली. या सर्व महिलांचे २०२० पर्यंत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाच्या निदानांचे निरीक्षण करण्यात आले.

निरीक्षणातून पेरिनेटल डिप्रेशन असणाऱ्या ६.४ टक्के महिलांमध्ये, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराचे निदान झाले असल्याचे आढळून आले. तर, ज्या स्त्रियांना पेरिनेटल डिप्रेशन नव्हते, अशा महिलांमध्ये या आजारचे निदान हे केवळ ३.७ टक्के इतके आहे. यावरून पेरिनेटल डिप्रेशन असणाऱ्या महिलांना हृदयविकाराचा ३६ टक्के अधिक धोका असतो असे आढळून आले.

हेही वाचा : महिलांच्या हाती सुरक्षेची दोरी! ‘या’ राज्यात आहेत ११.५ टक्के महिला पोलिस अधिकारी कार्यरत, पाहा

इतकेच नाही, तर या आजारांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे ५० टक्के, इस्केमिक हृदयरोग ३७ टक्के आणि हृदय बंद पडण्याचा धोका हा ३६ टक्क्यांनी अधिक असल्याचेही समजते.

“आमच्या अभ्यासामुळे कोणत्या व्यक्तीला हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी असणाऱ्या आजाराचा सर्वाधिक धोका असू शकतो, हे ओळखण्यासाठी मदत होऊ शकते; ज्यामुळे त्यांच्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात”, असे या अभ्यासाचे वरिष्ठ अभ्यासक डॉक्टर ब्रॅन म्हणतात.

तर या अभ्यासकांनी पेरिनेटल डिप्रेशन असणाऱ्या स्त्रियांसह त्यांच्या बहिणींशीदेखील तुलना केली. तेव्हा, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी धोका हा त्यांच्यातही २० टक्क्यांनी अधिक असल्याचे अभ्यासातून समोर आले. म्हणजेच हा धोका अनुवांशिकदेखील असू शकतो असे सूचित होते, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.