ज्ञानदेव बाबाराव नजान– समोर मोबाईल हातात घेऊन बसलेली आई अक्षरशः हादरली होती. काही दिवसांपूर्वीच तिने मुलीच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. नातेवाईकांचे कमेंट्स, शुभेच्छा, लाईक्स… सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पण एका ओळखीच्या व्यक्तीने तिला सावध केलं- “ताई, मुलांचे फोटो इंटरनेटवर सार्वजनिक ठेवू नका. ते चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात.” सुरुवातीला तिला हे अतिशयोक्ती वाटली. “एका साध्या फोटोमुळे काय होणार?” असा प्रश्न तिच्या मनात आला. पण डिजिटल जगात आपण शेअर केलेली प्रत्येक माहिती, फोटो आणि क्लिक कुठपर्यंत पोहोचू शकते, याचा अंदाज अनेकदा आपल्याला नसतो.इंटरनेटचा एक भाग असा आहे, जो आपण रोज वापरतो- Google, YouTube, Instagram, WhatsApp…पण याच इंटरनेटच्या पलीकडे एक लपलेलं जगही आहे, ज्याला अनेकदा ‘Dark Web’ म्हणून ओळखलं जातं.
हा शब्द ऐकताच अनेकांना क्राईम थ्रिलर किंवा रहस्यपूर्ण कथा आठवतात. पण प्रत्यक्षात हा विषय गंभीर आहे- विशेषतः महिला आणि मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेच्या दृष्टीने.Dark Web म्हणजे नेमकं काय?सोप्या भाषेत सांगायचं तर- सामान्य सर्च इंजिन्स (गूगल व इतर) वर सहज दिसत नाही असा इंटरनेटचा एक भाग. तिथे असलेली प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर असतेच असं नाही. काही लोक गोपनीयता राखण्यासाठीही त्याचा वापर करतात. मात्र, सायबर गुन्हे, चोरीची माहिती, बनावट ओळख, फसवणूक आणि इतर गैरवापरासाठी वापरली जाणारी माहिती अशा ठिकाणी फिरताना आढळू शकते.
काही प्रकरणांमध्ये चोरीला गेलेला वैयक्तिक डेटा, फोटो किंवा बँक खात्याची अथवा social media accountची माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.हे सगळं सुरू कसं होतं?अनेकदा अगदी साध्या गोष्टींपासून.आई-वडील मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकतात- शाळेच्या गणवेशातील फोटो, डान्स व्हिडिओ, बाहेर फिरण्याचे फोटो, सुट्टीतील फोटो… यामध्ये कधी शाळेचं नाव दिसतं, कधी ठिकाण, तर कधी मुलांची दिनचर्या नकळत समोर येते.बहुतेक वेळा हे निरागसपणे केलं जातं. पण इंटरनेटवर प्रत्येकजण चांगल्या हेतूनेच पाहत असतो असं नाही.
एका प्रकरणात एका महिलेने मुलीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक करून नियमितपणे टाकले होते. काही महिन्यांनी तिच्या social media account वर विचित्र संदेश आणि अज्ञात लोकांकडून friend requests वाढू लागल्या.नंतर लक्षात आलं की मुलीचे काही फोटो फेक प्रोफाईलवर वापरले जात होते. आईला सर्वात मोठा धक्का कशाचा बसला माहीत आहे?“हे फोटो आम्हीच सोशल मीडियावर टाकले होते…” आज अनेक मुलं ऑनलाइन क्लासेस, गेमिंग, सोशल मीडिया आणि विविध ॲप्लिकेशन्स वापरतात. काही ॲप्लिकेशन्स अनावश्यक परमिशन मागतात- गॅलरी, कॅमेरा, लोकेशन ॲक्सेस… जर ॲप सुरक्षित नसेल किंवा संगणकात अथवा मोबाईलमध्ये सायबर सुरक्षेच्या कमतरता असतील, तर माहिती गळती (data leak) होण्याचा धोका वाढू शकतो.
विशेषतः मुली आणि किशोरवयीन मुलं अधिक असुरक्षित ठरू शकतात.कारण त्यांचे फोटो एडिट करून गैरवापर करणं, ऑनलाइन रेकी करून किंवा पाळत ठेवून मानवी तस्करीसारखे गुन्हे करणं, बनावट अकाऊंट्स तयार करणं, ऑनलाइन छळ किंवा वैयक्तिक माहितीचा चुकीच्या प्रकारे वापर… या गोष्टींमुळे मानसिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान होऊ शकतं.महत्त्वाची गोष्ट म्हणजे- भीती निर्माण करणं हा उद्देश नाही. तर जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे.कारण इंटरनेटवर काहीही शेअर करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे-
“ही माहिती चुकीच्या व्यक्तीकडे गेली तर?”
काय काळजी घ्याल?
मुलांचे फोटो पब्लिक अकाऊंटवर टाकणं शक्यतो टाळा
शाळेच्या गणवेशात, ओळखपत्र, घराचा पत्ता किंवा ठिकाण दिसणार नाही याची काळजी घ्या
सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग नियमित तपासा
अनोळखी ॲप्सला अनावश्यक परवानगी देऊ नका
मुलांना ऑनलाइन अनोळखी व्यक्तींविषयी जागरूक करा
बनावट प्रोफाईल किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास लगेच रिपोर्ट करा
गुंतागुंतीचा पासवर्ड आणि टू- फॅक्टर- ऑथेंटिकेशन वापरा
आणखी एक महत्त्वाची गोष्ट-
“Delete” केलं म्हणजे माहिती पूर्णपणे नाहीशी झाली असं नाही.
म्हणूनच डिजिटल जगात “Share करण्यापूर्वी विचार” ही सवय खूप महत्त्वाची आहे.
आजची मुलं डिजिटल जगात वाढत आहेत. त्यांना इंटरनेटपासून दूर ठेवणं शक्य नाही.
पण त्यांना सुरक्षितपणे इंटरनेट वापरायला शिकवणं ही प्रत्येक पालक, शाळा आणि समाजाची जबाबदारी आहे.
(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)
