ज्ञानदेव बाबाराव नजान
अलीकडेच सोशल मीडियावर एका केंद्रीय मंत्र्यांचा आणि काही लष्करी अधिकाऱ्यांचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी तो खरा समजून पुढे पाठवला. मात्र नंतर अधिकृत तथ्य-पडताळणीत तो कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) च्या मदतीनं तयार केलेला बनावट (Deepfake) व्हिडिओ असल्याचं स्पष्ट झालं.
या घटनेनं एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला- आज आपण पाहतो किंवा ऐकतो ते सर्वच खरं असतं का? डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर महिलांविरुद्ध शस्त्र म्हणून केला जातो. एका अहवालानुसार, संमतीशिवाय तयार केलेल्या एकूण डीपफेक पॉर्नोग्राफीपैकी सुमारे ९८ टक्के ते ९९ टक्के पॉर्नोग्राफी महिला आणि मुलींना लक्ष्य करते. अभिनेत्री ऐश्वार्या राय, रश्मिका मंदाना यांनाही डीपफेकद्वारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.
आज AI च्या मदतीनं एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा बोलण्याची शैली हुबेहूब तयार करता येतं. त्यामुळे खऱ्यासारखे वाटणारे बनावट फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करणं शक्य झालं आहे. अशा प्रकारांना Deepfake असं म्हटलं जातं.
याचा अर्थ AI नं तयार केलेला प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ चुकीचाच असतो असं नाही. शिक्षण, आरोग्य, संशोधन, चित्रपट, जाहिरात आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये AI चा अत्यंत उपयुक्त आणि सकारात्मक वापर होत आहे. मात्र त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याची फसवणूक करणे, बदनामी करणे किंवा चुकीची माहिती पसरवणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो.
महिला आणि मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. सोशल मीडियावर सहज उपलब्ध असलेले फोटो वापरून बनावट चित्रे किंवा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा प्रकारांमुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास, बदनामी, सामाजिक गैरसमज आणि अनावश्यक तणावाला सामोरे जावे लागू शकते.
काही वेळा प्रसिद्ध व्यक्ती, डॉक्टर, शिक्षक, सरकारी अधिकारी किंवा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती यांच्या नावानंही बनावट व्हिडिओ तयार करून चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे कोणताही व्हिडिओ पाहताच त्यावर त्वरित विश्वास ठेवणं किंवा तो पुढे पाठवणं योग्य नाही.
विशेषतः पालकांनी मुलांना एक महत्त्वाची सवय लावणं गरजेचं आहे. इंटरनेटवर दिसणारा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ खरा असेलच असं नाही. कोणतीही धक्कादायक, भावनिक किंवा आक्षेपार्ह सामग्री पाहिल्यानंतर ती लगेच शेअर करण्याऐवजी तिची सत्यता तपासावी.
अशा प्रकारचे बनावट व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. काही वेळा अफवा पसरतात, गैरसमज निर्माण होतात आणि समाजात अनावश्यक संभ्रमाचं वातावरण तयार होऊ शकतं.
याशिवाय अशा अप्रमाणित फोटो, व्हिडिओ किंवा संदेशांचा परिणाम तपास यंत्रणांवरही होऊ शकतो. चुकीची माहिती मोठ्या प्रमाणात पसरल्यास तिची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि संसाधनं खर्च करावी लागू शकतात. त्यामुळे कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवणं टाळणं ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक आणि डिजिटल जबाबदारी आहे.
Deepfake तयार करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही वेळा सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी, काही वेळा व्यक्तीची बदनामी करण्यासाठी, तर काही वेळा सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती पसरवण्यासाठी अशा बनावट सामग्रीचा वापर करतात. काही प्रसंगी परदेशातून कार्यरत असलेले दुष्प्रचार (Disinformation) करणारे गट किंवा संघटित नेटवर्कही समाजात गोंधळ, अविश्वास किंवा तणाव निर्माण करण्यासाठी अशा तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणताही धक्कादायक फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ पाहताच त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत आणि विश्वासार्ह स्रोतांकडून त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे.
भारतासह अनेक देशांना चुकीची माहिती आणि AI-आधारित Deepfake चा सामना करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये परदेशातून चालवल्या जाणाऱ्या दुष्प्रचार मोहिमा (Disinformation Campaigns) समाजात गोंधळ निर्माण करणं, लोकांचा विश्वास कमी करणं किंवा संवेदनशील घटनांबाबत अफवा पसरवणं यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित किंवा संवेदनशील विषयांवरील कोणतीही माहिती अधिकृत सरकारी स्रोत, संरक्षण दल किंवा विश्वासार्ह वृत्तसंस्थांकडूनच पडताळून पाहणं आवश्यक आहे.
Deepfake पासून स्वतःचं संरक्षण कसं कराल?
१. सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो सार्वजनिकपणे शेअर करताना आवश्यक तेवढीच माहिती द्या.
२. सोशल मीडिया खात्यांमधील Privacy Settings नियमित तपासा.
३. धक्कादायक किंवा संशयास्पद फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ लगेच पुढे पाठवू नका.
४. कोणत्याही व्हिडिओची सत्यता विश्वासार्ह वृत्तसंस्था किंवा अधिकृत स्रोतांकडून तपासा.
५. मुलांना AI, Deepfake आणि डिजिटल सुरक्षिततेबद्दल त्यांच्या वयानुसार मार्गदर्शन करा.
६. तुमच्या नावाने किंवा फोटोचा गैरवापर होत असल्याचा संशय आल्यास संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवा आणि आवश्यक असल्यास जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
आजच्या डिजिटल युगात AI हे एक प्रभावी आणि उपयुक्त तंत्रज्ञान आहे. मात्र कोणतेही तंत्रज्ञान सुरक्षित की असुरक्षित हे त्याच्या वापरावर अवलंबून असते. AI च्या युगात फक्त डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवणे पुरेसे नाही; सजग विचार, अधिकृत स्रोतांद्वारे पडताळणी आणि जबाबदारीनं माहिती शेअर करणं हीच खरी सायबर सुरक्षा आहे.
सायबर फॉरेन्सिक विश्लेषक
dnyandev.najan@yahoo.in
