ज्ञानदेव बाबाराव नजान
“आई, काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबतच आहे!”
हा संदेश पाहून त्या महिलेच्या डोळ्यांत अश्रू आले. काही महिन्यांपूर्वीच तिच्या मुलाचं निधन झाले होतं. परंतु तिच्या मोबाइल स्क्रीनवर त्याच्यासारखं दिसणारं छायाचित्र, त्याच्या आवाजासारखा वाटणारा आवाज आणि त्याच्याच शैलीत लिहिलेले संदेश दिसत होते. काही क्षणांसाठी तिला वाटलं की तिचा मुलगा पुन्हा तिच्याशी बोलत आहे. परंतु वास्तव वेगळं होतं. तो तिचा मुलगा नव्हता, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) वापरून तयार केलेली त्याची डिजिटल प्रतिकृती होती.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘डिजिटल रिसरेक्शन’ (Digital Resurrection) किंवा ‘डिजिटल पुनर्जन्म’ ही संकल्पना जगभरात चर्चेचा विषय बनत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ, आवाज, संदेश आणि सोशल मीडिया माहिती यांचा वापर करून त्या व्यक्तीप्रमाणे दिसणारी किंवा बोलणारी डिजिटल प्रतिमा तयार केली जाऊ शकते.
हे तंत्रज्ञान काही लोकांसाठी आठवणी जपण्याचे साधन असू शकते; परंतु त्याचवेळी ते भावनिक, सामाजिक आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्नही निर्माण करत आहे.
डिजिटल पुनर्जन्म म्हणजे नेमके काय?
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील डिजिटल माहिती- जसे की सोशल मीडिया पोस्ट्स, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्रे आणि लिखाणाची शैली- यांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं त्या व्यक्तीसारखं डिजिटल स्वरूप तयार करणं याला ‘डिजिटल रिसरेक्शन’ असं म्हटलं जातं.
आज उपलब्ध असलेल्या काही तंत्रज्ञानाच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीचा आवाज, बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवाद करण्याची शैली यांचं अनुकरण करणं शक्य झालं आहे. त्यामुळे काही वेळा मृत व्यक्ती पुन्हा डिजिटल स्वरूपात आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव निर्माण होऊ शकतो.
महिलांवर आणि मुलांवर याचा कसा परिणाम होऊ शकतो?
भावनिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुटुंबांसाठी हे तंत्रज्ञान विशेषतः प्रभावी ठरू शकतं. पती, पालक, मूल किंवा जवळच्या नातेवाईकाला गमावलेल्या महिलांना अशा डिजिटल प्रतिकृतींमुळे मानसिक आधार मिळाल्याची भावना निर्माण होऊ शकते. परंतु काही परिस्थितींमध्ये याच भावनांचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते.
कल्पना करा, एखाद्या महिलेच्या मृत पतीच्या नावानं किंवा आवाजात संदेश येऊ लागले, ज्यामध्ये आर्थिक मदत, वैयक्तिक माहिती किंवा इतर संवेदनशील बाबींबाबत विनंती केली जात आहे. तांत्रिकदृष्ट्या हे शक्य होऊ लागल्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या भावनिक फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच, मुलांचे फोटो, व्हिडिओ आणि आवाज मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर उपलब्ध असल्यास, त्यांचा वापर करून त्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.
आपण काय काळजी घ्यावी?
- सोशल मीडियावर स्वतःचे आणि मुलांचे व्हिडिओ, ऑडिओ आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे शेअर करताना सावधगिरी बाळगा.
- कुटुंबातील सदस्यांच्या डिजिटल आठवणींचे संरक्षण करा आणि त्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत याची जाणीव ठेवा.
- मृत व्यक्तीच्या नावाने, आवाजात किंवा प्रतिमेत येणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित डिजिटल संवादाकडे चिकित्सक दृष्टीने पाहा.
- भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असताना आर्थिक किंवा वैयक्तिक माहितीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका.
- मुलांना आणि कुटुंबीयांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डीपफेक आणि डिजिटल फसवणूक याबद्दल जागरूक करा.
तंत्रज्ञान की भावना?
तंत्रज्ञानाने माणसाच्या आठवणी जतन करण्याचे नवे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. परंतु जेव्हा तंत्रज्ञान मानवी भावनांचे अनुकरण करू लागते, तेव्हा त्याचा परिणाम केवळ तांत्रिक राहत नाही; तो मानसिक, सामाजिक आणि नैतिक प्रश्नही निर्माण करतो.
डिजिटल जगात एखाद्या व्यक्तीचे अस्तित्व त्याच्या मृत्यूनंतरही काही प्रमाणात टिकून राहू शकते. परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, स्क्रीनवरील आवाज, चेहरा किंवा संदेश हे वास्तव नाही. ती केवळ डिजिटल माहितीवर आधारित तयार झालेली प्रतिबिंबे असतात.
आजच्या काळात सायबर सुरक्षेचा अर्थ केवळ आपले पासवर्ड सुरक्षित ठेवणे नाही. तर आपल्या आठवणी, भावना आणि डिजिटल ओळखीचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. कारण भविष्यातील सर्वात मोठे सायबर आव्हान कदाचित संगणक हॅकिंग नसून, मानवी भावनांचे डिजिटल अनुकरण असू शकते.
(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)
dnyandev.najan@yahoo.in
