ज्ञानदेव बाबाराव नजान

दरवाज्यावरची बेल वाजली… घरातील कामात व्यग्र असलेल्या स्मिताने दार उघडले. “मॅडम, आम्ही जनगणना विभागातून आलो आहोत. तुमची माहिती अपडेट करायची आहे.’’ समोर दोन जण हातात फाईल, गळ्यात आयडी कार्ड, बोलण्यात ठामपणा, चेहऱ्यावर अधिकृत भाव…

“फक्त काहीमिनिटांचं काम आहे,” ते सांगतात.

“सरकारी काम” या एका शब्दावर स्मिताचा विश्वास बसतो…

सुरुवातीचे प्रश्न अगदी साधे होते-

“कुटुंबात किती जण आहेत?”

“मुलं काय शिकतात?”

“घरात कोण-कोण राहतात?”

त्यांच्या या प्रश्नाावर स्मिताला काहीच संशय आला नाही, कारण हे प्रश्न तिला अगदी सामान्य वाटत होते. थोड्याच वेळात त्यापैकी एकाने फाईल बंद केली आणि म्हणाला, “मॅडम, आता व्हेरिफिकेशनसाठी आधार नंबर लागेल. फक्त क्रॉस-चेक करायचं आहे.”

स्मिता क्षणभर थांबली.

“आधार का लागेल?” तिनं विचारलं.

“सरकारी प्रक्रिया आहे मॅडम, नाहीतर डेटा अपूर्ण राहील,” असं उत्तर पटकन आलं.

स्मिताने आधार कार्ड काढलं. यानंतर पुढचा प्रश्न-

“PAN नंबर आहे का? आणि बँक अकाउंट लिंक आहे का? एक OTP येईल, तो सांगावा लागेल.”

इथे मात्र स्मिताला काहीतरी वेगळं वाटलं.

“जनगणनेत हे कशासाठी?” तिच्या मनात प्रश्न आला. ती थोडी सावध झाली.

“मला आधी खात्रीकरावी लागेल,” असं म्हणत तिने माहिती देण्यास नकार दिला.

तिच्या या उत्तरावर त्यांचे चेहरे खाटकन उतरले.

“ठीक आहे, मग नंतर येतो,” असं म्हणत ते लगेच निघून गेले.

दरवाजा बंद होताच स्मितानं लगेचओळखीच्या व्यक्तीशी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. चौकशीत समोर आलं. त्या परिसरात अशाप्रकारे माहिती गोळा करण्याचा कोणताही अधिकृत कार्यक्रम सुरू नव्हता. स्मिताने वेळेत सावधगिरी बाळगली… म्हणून संभाव्य मोठं नुकसान टळलं.

आजकाल अशाप्रकारे काही व्यक्ती सरकारी विभागाच्या नावाचा आधार घेऊन घरापर्यंत येऊ शकतातआणि साध्या प्रश्नांपासून सुरुवात करून हळूहळू संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.

खरे जनगणना अधिकारी काय विचारतात?

अधिकृत जनगणना प्रक्रियेतकेवळ मर्यादित आणि सामान्य माहिती विचारली जाते:

कुटुंबातील सदस्यांची संख्या

वय, शिक्षण, व्यवसाय

घराची स्थिती(कच्चं/ पक्कं, पाणी, वीज सुविधा)

यापलीकडे कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहितीविचारली जात नाही.

धोक्याची घंटा :

खालीलपैकी काही गोष्टी लक्षात आल्या, तर सावध व्हा :

आधार (Aadhaar)किंवा PAN नंबर मागितला जातो.

बँक तपशील, ATM माहिती विचारली जाते.

OTP विचारला जातो.

कोणताही दस्तऐवज देण्यास किंवा पैसे देण्यास सांगितले जाते.

SMS मधील लिंक क्लिक करायलासांगितली जाते.

जनगणनेच्या चौकटीबाहेरील माहिती विचारली जाते.

सुरक्षित राहण्यासाठी…

कोणतीही माहिती देण्यापूर्वी अधिकृत ओळखपत्र (Official ID) नीट तपासा.

फक्त जनगणनेशी संबंधित मूलभूत प्रश्नांनाच उत्तर द्या.

संवेदनशील कागदपत्रे (Aadhaar, PAN, बँक तपशील) कधीही शेअर करू नका.

घरातील वयोवृद्ध सदस्यांना सावध ठेवा आणि त्यांना अशा प्रकारांबद्दल समजावून सांगा.

शंका वाटल्यास स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांशी संपर्क साधा.

सायबर फॉरेन्सिक विश्लेषक

dnyandev.najan@yahoo.in