यशस्वी व्यक्तींच्या प्रयत्नांच्या आणि मेहनतीच्या गोष्टी या अतिशय प्रेरणादायी व आशादायी असतात; त्यांना ऐकून या जगात काहीही शक्य आहे याची आपल्याला जाणीव होऊ लागते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी उद्योजिकेची म्हणजेच प्रेरणा झुनझुनवाला हिचा प्रवास समजून घेणार आहोत. सध्याची मुले ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टफोन, इंटरनेट यांसारख्या गोष्टींचा वापर करून सतत नवनवीन गोष्टी शिकत असतात.

विविध माहितीपूर्ण व्हिडीओ, रंजक ऑनलाइन गेम्स यांसारख्या गोष्टींमधून लहान मुलांना अभ्यास अधिक झटपट समजण्यास मदत होऊ शकते. हे लक्षात घेऊन मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून अनेक कंपन्या त्यांच्यासाठी ॲप्स बनवीत असतात. या ॲप्स बनविणाऱ्या कंपनीमध्ये भारतीय उद्योजिका ‘प्रेरणा झुनझुनवाला’ने दिलेले योगदान आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा : भारतातील दुर्मीळ ‘हरगीला’ पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या पूर्णिमादेवी बर्मन कोण? ‘हरगीला आर्मी’बद्दल जाणून घ्या

प्रेरणा झुनझुनवाला ही एक भारतीय उद्योजिका असून, तिने सिंगापूर येथे आपली ‘लिटल पॅडिंग्टन’ नावाची एक प्री-स्कूल सुरू केली आहे. त्यानंतर तिने ३ ते १० वर्षांच्या मुलांसाठी क्रिएटिव्ह गॅलिलिओ नावाचा एज्युटेक स्टार्टअपदेखील सुरू केला.

प्रेरणा झुनझुनवालाने न्यूयॉर्क विद्यापीठातून विज्ञान शाखेमधील पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. प्रेरणाच्या कंपनीने टुंडेमी आणि लिटल सिंघम अशी दोन ॲप्लिकेशन्स लाँच केली आहेत. हे ॲप जवळपास एक कोटीहून अधिक वापरकर्त्यांनी डाऊनलोड केलेले आहे. लहान मुलांसाठी असणाऱ्या शैक्षणिक ॲप्सपैकी हे एकमेव असे ॲप आहे; जे भारतातील प्ले स्टोअरवरील टॉप २० ॲप्समध्ये येते.

प्रेरणा झुनझुनवालाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार असे समजते की, मुलांसाठी असलेले हे सॉफ्टवेअर त्यांच्या आवश्यकता आणि गरजेनुसार त्यांच्या अभ्यासाचा प्रवास, व्हिडीओ आणि गेमिफिकेशन प्रदान करण्यास मदत करते.

“… तो निर्णय ठरला गेम चेंजर!” तब्बल पाच वेळा UPSC मध्ये अपयश पचवूनही नेटाने मिळवले यश! पाहा

प्रेरणाने याआधी कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेतले नव्हते. तिने कोणत्याही प्रशिक्षणानुसार ही कंपनी स्थापन केलेली आहे. तिच्या या कंपनीने गेल्या वर्षी तब्बल ६० कोटी रुपयांची कमाई केली होती. इतकेच नाही, तर तिच्या या स्टार्टअपची मागील वर्षी ४० मिलियन डॉलर्स म्हणजेच ३३० कोटी रुपये इतकी किंमत होती.

कंपनीच्या अशा प्रचंड यशानंतर भविष्यात प्रेरणा झुनझुनवाला नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. इतकेच नाही, तर तिची ही कंपनी स्थानिक भाषांमध्येदेखील आपला कंटेन्ट उपलब्ध करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते.