“मेलं नशिबच माझ फुटकं” अगदी वैताग आलाय नेहमीच्या कामांचा. एखादी गोष्ट पाठी लागली की, ती आयुष्यभरासाठी बरोबर राहते असं माझ झालंय. स्वतःशीच पुटपुटत वीणा तावातावाने जिने खाली उतरत होती. तिचा राग तर आकाशाला भिडला होता. तिच्या मागोमाग मीही जिने उतरत होते. वीणाला वैतागलेलं पाहून मी तिचा हात पकडला. तिला विचारलं, काय गं वीणा, एवढ्या तावातावाने कुठे निघालीस? तिचा चेहरा अजूनच रागाने लाल झाला. मला उत्तर देत म्हणाली, चालली जीव द्यायला. कोणताही प्रसंग आला तरी कोलमडून न जाणाऱ्या वीणाच्या तोंडी हे वाक्य ऐकलं आणि मीही दोन मिनिटांसाठी शांत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीणा अशी का वागतेय? हे मला कळेना. बरं जेव्हापासून ती आमच्या चाळीमध्ये राहायला आली तेव्हापासून मी तिला ओळखते. जवळपास नऊ ते दहा वर्षांपासूनची आमची ओळख. तिच्या घरात वाद-विवाद होतात. पण कौटुंबिक वाद कोणाला चुकले आहेत. संसार म्हटलं की वाद हे होणारच. असो… तरीही मी वैतागलेल्या वीणाला हिंमत करून विचारलं आपण थोडावेळ बसून बोलूया का? म्हणजे तुला बरं वाटेल. मानसिक ताण हलका होईल.

माझ्या नशिबाने वीणा त्यासाठी तयार झाली. दोघी आमच्या नेहमीच्या जागी म्हणजेच चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत जाऊन बसलो. “वीणा, बोल आता काय झालं?” मीच पुढे होऊन तिला विचारलं. यावर ती म्हणाली, “बघ मी सकाळी सहा वाजता घरकाम करायला निघून जाते. इतर स्त्रियांसारखी मी काही शिकलेली नाही. पदरात एक पोर, त्यात सासू-सासरे व नवरा.”

आणखी वाचा – मुलींना स्पर्श करण्यात कसलं सुख? तुमच्यासारख्या राक्षसांना तर…

“सहा ते बारा दोन घरांची धुणी-भांडी करून झाल्यावर बरोबर दुपारी १२.३० वाजता मुलाला शाळेत सोडायला मी घरी येते. दुपारचं जेवण उरकलं की पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ आणखीन दोन घरांच्या धुण्याभांड्यांच्या कामाला जाते. सहा वाजले की फक्त मुलाला शाळेतून घरी आणायचं काम माझा नवरा करतो. बस्स एवढाच काय तो त्याला त्रास. बाकीचा पूर्ण दिवस घरात बसून. बरं कुठेतरी काम शोधा तेही नाही. मी घरकामं करते ते त्यांना पटत नाही. सासू-सासरेही त्यांच्याच बाजूने. बोल काय बोलावं.”

नऊ ते दहा वर्ष मी ज्या वीणाला ओळखते ती इतकं सगळं झेलतेय याची जाणीव मला तिच्या बोलण्यामधून हळूहळू होत गेली. “आता काय झालंय ते बोल?” असं मी वीणाला विचारलं. यावर ती म्हणाली, “काय होणार गं नेहमीचा घरात तमाशा. मी आतापर्यंत दुर्लक्ष करत आली. पण आता सहन होत नाही. तुला सांगते माझ लग्न ठरलं तेव्हा मुलगा किती चांगल्या नोकरीला आहे, त्याला कोणतंच व्यसन नाही, स्वतःची मुंबईमध्ये हक्काची खोली आहे असं काय काय सांगण्यात आलं. माझ्या घरच्यांनी आणि मी ते पाहूनच लग्नासाठी होकार दिला. २२व्या वर्षी माझं लग्न झालं. पण शेवटी काय आमची फसवणूकच झाली ना…”

आणखी वाचा – वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…

लग्नाला नऊ महिने झाले आणि मी गरोदर राहिले. त्यानंतर सगळं सत्य हळूहळू माझ्यासमोर येऊ लागलं. त्यांना (नवरा) एक नोकरी टिकवता येत नाही. पाच-सहा महिने नोकरी केली की पुढचे काही महिने बसून खायचं. शिवाय दारूचं व्यसन अशा गोष्टी माझ्या समोर येऊ लागल्या. आज-उद्या सुधारतील या आशेवर मी दिवस काढले. त्यानंतर सोहम (मुलगा) झाला. आता तरी जबाबदारीची जाणीव होईल असं वाटलं? पण छे… ते काही सुधारले नाहीत. शेवटी मीच सोहम सहा महिन्यांचा झाला आणि घरकाम करायला सुरुवात केली.”

“माहेरी तरी कोणाला सांगू. माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचं निधन झालं. त्यांच्या वर्षभराने माझी आईही मला सोडून गेली. मला कोणी भावंडही नाही. मामा-मामीने मला लहानाचं मोठ केलं. त्यांनी सांभाळलं. आता त्यांना तरी माझी अवस्था कोणत्या तोंडाने सांगू. म्हणून मीच मेहनत करून आपल्या मुलासाठी आपण लढायचं असं ठरवलं. आता गेली आठ वर्ष घरकाम करतेय. नवऱ्याला त्याची किंमत नाही. आता तर दोन वर्ष होत येतील कुठेच नोकरीही केली नाही. संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर. तरीही कामावरुन घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी सासूपासून ते नवऱ्यापर्यंत दोष मलाच. मग प्रत्येकवेळी मलाच प्रश्न पडतो मीच का?”

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

वीणाबाबत वर वरचं मला माहीत होतं. पण ती तिच्या आयुष्यामध्ये एवढं सारं सहन करत असेल याची काडीभरही कल्पना मला नव्हती. कारण एवढं वीणा सहन करतेय हे तिने मला कधी जाणवूच दिलं नाही. आई-वडिलांविना पोरकी झालेली पोर संसारात पडली. पण तिथेही तिला सुख नाही. ना नवऱ्याचं सुख, ना घरातील इतर माणसांचं. आता ती लढतेय, झगडतेय ते फक्त तिच्या मुलासाठी… अशा कित्येक स्त्रिया तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील. पण वीणासारख्या स्त्रियांना घरामध्ये मान हा मिळायलाच पाहिजे. नवऱ्याला संसारात हातभार लावणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. पण स्त्रियांना संसारात हातभार लावण्याबाबत नवऱ्यानेही विचार करणं तितकंच गरजेचं आहे नाही का?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women facing many problems in marriage life and earn for family son see details kmd
First published on: 30-11-2022 at 19:08 IST