Women Hair Clip On Bangs Fringe Hairpiece celebrity stylist nrp 97 | असे वापरा ‘क्लिप ऑन’ बँग्ज | Loksatta

असे वापरा ‘क्लिप ऑन’ बँग्ज

केसांचे ‘बँग्ज’ किंवा ‘फ्रिंजेस’ची फॅशन हल्ली पुन्हा ठिकठिकाणी दिसू लागली आहे.

असे वापरा ‘क्लिप ऑन’ बँग्ज
असे वापरा ‘क्लिप ऑन’ बँग्ज

केसांचे ‘बँग्ज’ किंवा ‘फ्रिंजेस’ची फॅशन हल्ली पुन्हा ठिकठिकाणी दिसू लागली आहे. हा हेअरकट खरंतर फार फार जुना! आपल्याकडचा जुन्या हिंदी चित्रपटांमधला अभिनेत्री साधनाचा प्रसिद्ध ‘साधना कट’ आठवा! आजपर्यंत खूप अभिनेत्रींनी तो मिरवला. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, जेनेलिया डिसूझा, बिपाशा बासू, चित्रांगदा सिंग, रवीना टंडन आणि आणखीही कित्येकींनी वेळोवेळी आपल्या केसांचे छानसे ‘फूल बँग्ज’ कापून चेहऱ्याला वेगळा ‘लूक’ दिला. हे पाहून आपल्यालाही कधीतरी असा हेअरकट करून पाहायला हवा, असं वाटतं. पण यात काही अडचणी आहेत.

हे ‘फूल बँग्ज’ खांद्यावर रुळणाऱ्या स्ट्रेट किंवा वेव्ही केसांवर किंवा अगदी ‘ब्लंट कट’सारख्या कानापर्यंत कापलेल्या स्ट्रेट केसांवर अतिशय क्यूट आणि ‘बोहो’ दिसतात. मात्र आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात त्यांचं सौंदर्य टिकवणं कर्मकठीण!

रोज सकाळी घाईत आवरून बाहेर पडणं, बस-लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणं, स्वत:ची दुचाकी असेल तर ओढणीनं चेहरा आणि केस कडेकोट झाकून प्रदूषण आणि ट्रॅफिक चुकवत जाणं, हे आपणा सामान्य सख्यांचं ‘रूटिन’! रात्री कामावरून घरी जाईपर्यंत आपला चेहरा जसा कंटाळून जातो, तसेच पोनिटेल- वेणी- बनमध्ये आवळलेले किंवा हेअरबँड-क्लिप लावून कानावर कसेतरी सोडून दिलेले केसही बिचारे दिसू लागलेले असतात! अभिनेत्रींप्रमाणे सारखे केस ठीकठाक करायला, प्रसंगी केस लगेच स्ट्रेटनर वापरून केस आणि फ्रिंजेस स्ट्रेट करायला आपल्याकडे काही ‘पर्सनल हेअरस्टायलिस्ट’ नसतो. या परिस्थितीत कितीही आकर्षक वाटले तरी ‘फूल बँग्ज’चे चोचले कसे परवडायचे?

दुसरी अडचण अशी, की सर्वच स्त्रियांच्या केसांच्या मूळच्या ठेवणीनुसार त्यांचा ‘फूल बँग’ हेअरकट करता येईलच असं नाही. काही जणींचे केस पुढच्या बाजूस विरळ असतात किंवा मुळातच केसांची घनता कमी असते. अशा वेळी फूल बँग्ज हेअरकट करायला कित्येकदा सलूनवाली मंडळी स्पष्ट नकार देतात! आणि ‘तो काही तुम्हाला चांगला दिसणार नाही’ हे त्यांचं कारण ऐकून आपणही जरा खट्टू होतो.

आता मात्र यावर एक मजेशीर उपाय निघाला आहे. तो म्हणजे ‘क्लिप ऑन बँग्ज’. साध्या शब्दांत खोटे बँग्ज. ही चक्क फूल बँग्जच्या केसांची क्लिप असते. आपल्या मूळच्या केसांचा मधोमध भांग पाडून ते नीट विंचरून घ्यायचे आणि आपल्याला बँग्ज कपाळावर कुठवर रुळायला हवेत ती लेंग्थ ठरवून चेहऱ्याच्या मधोमध केसांवर ही क्लिप लावून टाकायची अशी सोपी पद्धत. तुम्हाला खरं वाटणार नाही इतके हे खोटे बँग्ज खरेखुरे भासतात! कित्येक जण ते क्लिपवाले बँग्ज आहेत हे अजिबात ओळखू शकत नाहीत. ऑनलाईन शाॉपिंग साईटस् वर देशी-परदेशी वेगवेगळ्या ब्रॅण्डस् चे क्लिप ऑन बँग्ज मिळतात आणि त्यांची किंमत अवघ्या २००-२५० रुपयांपासून सुरू होते.

ज्यांना फ्रिंजेस किंवा बँग्जच्या ‘क्यूटनेस’चा सोस आहे, त्यांना या बँग्जचे दोन फायदे आहेत

हेअरकटची ‘कटकट’ नाही
फुल बँग्ज हेअरकट आपण ‘मेन्टेन’ करू शकू का? ही शंका ज्यांच्या मनात असते त्यांना कोणताही हेअरकट न करता केवळ बँग्जची एक क्लिप लावून नवा ‘क्यूट लूक’ मिळवता येतो. फिरायला, पार्टीला जाताना पटकन बँग्ज लावा, लोकांकडून कौतुक करून घ्या आणि आल्यावर बँग्ज काढून विंचरून कपाटात ठेवून द्या! तुमच्या मूळच्या केसांना कुठे धक्काही लागला नाही. आहे ना मजा!

केस कापण्यासाठी ‘मानसिक’ पूर्वतयारी!
असे वेगळ्या प्रकारचे हेअरकट ज्या ‘चतुरा’ प्रथमच करत असतात, त्यांना ‘पण त्यात मी कशी दिसेन?’ हा प्रश्न असतोच. काही वेळा आपण केलेली एखादी गोष्ट आपल्याला आवडते, पण त्यावर प्रियजनांच्या प्रतिक्रिया नकारात्मक असतात. मग लगेच आपल्याला आपल्या निवडीबद्दल शंका यायला लागते आणि पुन्हा पूर्वीसारखं करू या, असा विचार मनात येतो. अशी ‘तळ्यात-मळ्यात’ विचारसरणी असेल, तर सलूनमध्ये जाऊन ‘फूल बँग्ज’ कापल्यावर पुन्हा मागे जाण्याची- म्हणजेच बँग्जशिवाय पूर्वी होतो तसं दिसण्याची संधी नसते. पुन्हा केस वाढेपर्यंत थांबावं लागतं. अशांना खोटे बँग्ज लावून ‘सांग मी कशी दिसते?’ असं स्वत:लाच आरशात पाहून विचारता येईल. आधी घरी बँग्ज लावून, मग बँग्जसह बाहेर वावरून नव्या ‘लूक’बद्दल तुम्हाला पुरेसा आत्मविश्वास गोळा झाला, की हेअरकटचा ठाम निर्णय घ्यायला तुम्ही तयार होता. मग बिनधास्त बँग्ज हेअरकट करा आणि मिरवा!

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-08-2022 at 06:15 IST
Next Story
‘कास्टिंग काऊच’चे कटू सत्य