डॉ. पायल नारंग, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ
प्रसूतीनंतर आपल्या बाळाच्या काळजीत पूर्णपणे गुंतल्याने बऱ्याच माता त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. विशेषतः गर्भाशय मुखाची (सर्व्हायकल) आरोग्य तपासणी म्हणजेच पॅप स्मिअर व एचपीव्ही यांसारख्या चाचण्या प्रसूतीनंतर टाळल्या जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दरवर्षी १ लाख २० हजारांपेक्षा जास्त महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं निदान होतं. जागतिक पातळीवर साल २०१८ मध्ये ५ लाख ७० हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं निदान झालं होतं. यातील ३ लाखापेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला आहे.

सतत आपल्या बाळाची काळजी घेणे, झोपेचा अभाव, शारीरिक थकवा आणि ‘आता मला काहीच त्रास होत नाही’ या भावनेमुळे मातांकडून गर्भाशय तपासणीस टाळाटाळ केली जाते. परंतु ही निष्काळजी भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते.

आरोग्य तपासणी का गरजेची?

गर्भाशय मुखाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात वाढू शकतो. प्रसूतीनंतर शरीरात होणारे हार्मोनल बदल, जंतुसंसर्गाचा वाढलेला धोका आणि जुन्या जखमा लक्षात घेता ही तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

प्रसूतीनंतर बहुतांश महिला त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या बाळाच्या आरोग्यावर केंद्रित करतात. मात्र स्वतःच्या तपासण्यांकडे मात्र पाठ फिरवतात. गर्भाशय मुखाची तपासणी ही वेदनारहित, सोपी आणि अवघ्या काही मिनिटांत होणारी प्रक्रिया आहे. प्रसुतीनंतर ६ ते १२ आठवड्यांत ही तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

ही आहेत तपासणी टाळण्यामागची कारणं

  • बाळाची जबाबदारी आणि वेळेचा अभाव
  • तपासणीबाबत भीती किंवा लाज
  • कुटुंबाकडून पुरेसा पाठिंबा न मिळणे
  • तपासणीचे महत्त्वच माहीत नसणे

कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

बाळाबरोबरच बाळाच्या आईची काळजी घेणे ही त्या नवमातेच्या कुटुंबियांची जबाबदारी आहे. वेळोवेळी तिला तपासणीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. निरोगी आईच निरोगी बाळाची जोपासना करू शकते.

बाळाच्या आरोग्यासोबतच मातेचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर स्वतःकडे दुर्लक्ष न करता वेळेवर गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. यासाठी मातेला तिच्या कुटुंबाची साथ मिळणे गरजचे आहे. अनेकदा मूल झाल्याच्या आनंदाच मातेच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. परंतु बाळाच्या अरोग्याबरोबरच मातेचे आरोग्य सांभाळणेही तितकेच महत्त्वाचे असते.