भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
स्व-औषधोउपचार हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा विषय अनेक वर्षं चर्चिला जातोय आणि अनेक तज्ज्ञांनी याआधी याविषयी लिहिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार त्यात स्त्रियांचे स्व-औषध घेण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक आहे हे खेदाने सांगावे लागते. स्व-औषधोउपचार जाणीवपूर्वक आणि खबरदारीने घेतले तर ती स्वतःची सकारात्मक काळजी ठरेल पण दुर्दैवाने जगभरातंच असं दिसून आलंय की स्व-औषधउपचार चुकीच्या पद्धतीने आणि बेजबाबदारपणे घेतले जातात. आपण सर्व साधारणपणे सर्वचजण सर्दी खोकला झाला की डॉक्टरांकडे जायचे टाळतो. तीन-चार दिवस वाट पाहून काही फरक पडला नाही तर डॉक्टरांकडे जातो. काही लोक स्वतः औषधाच्या दुकानात जाऊन सर्दी-कफाची औषधे खरेदी करतात. आपल्यासाठी अतिशय सामान्य बाब असते. पण तीच बाब जीवघेणी / घातक ठरू शकते.
भारतात दोन राज्यात येथील नुकते घडलेलं उदाहरण पाहूया. ऑक्टोबर २०२५ मध्ये एक कफ सिरप पिऊन पाच वर्षांआतील २० मुलांचा मृत्यू झाला. ही बाब अतिशय गंभीर होती. कफ सिरप बनवणारी फार्मा कंपनीच्या औषधात ४८.६% -Diethylene Glycol (DEG) हे इंडस्ट्रीयल पेंट, प्लास्टिकमध्ये वापरले जाणारे रंगहीन, वासहीन रसायन आढळून आले. किडनी साठी अत्यंत घातक द्रव्य आहे. धोक्याच्या पातळीपेक्षा DEGचे ५०० पट जास्त प्रमाण कफाच्या औषधात आढळले. या कंपनीने ३५०हून अधिक नियमांचे उल्लंघन केले होते. राज्य सरकारने त्यावर बंदी आणली. शिवाय Diethylene Glycol (DEG) असणाऱ्या अजून दोन फार्मा कंपन्यांच्या औषधांवर बंदी घातली. ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात स्त्रियांनी सर्दी-खोकल्यासाठी अँटीबायोटिक्स स्वतः घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
एक दैनंदिन प्रसंग.
“डोके दुखतंय? पॅरासिटामॉल घे.”
“पाळी अनियमित आहे? फार्मसीत मिळते एक टॅब्लेट, लगेच बरे वाटेल.”
“थोडं वजन वाढलंय? इंटरनेटवर एक सप्लिमेंट खूप ट्रेंडिंग आहे.”
घर, ऑफिस, कुटुंब, जबाबदाऱ्या… या सगळ्यांत स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते किंवा वेळ मारून नेण्यासाठी ‘जलद उपाय’ शोधते. वेळ वाचवण्यासाठी, डॉक्टरकडे जाणे टाळण्यासाठी किंवा ‘ही लहानशी समस्या आहे’ असे समजून — एक गोळी घेतली जाते. पण त्या एका गोळीपासून हार्मोन्सचे संतुलन बिघडण्यापासून ते हृदयविकारापर्यंत एक अदृश्य प्रवास सुरू होतो.
२०२६ पर्यंत भारतात OTC (ओव्हर दि काऊंटर) औषधांचा वापर झपाट्याने वाढला आहे. Central Drugs Standard Control Organization आणि Indian Council of Medical Research यांच्या अहवालांनुसार वेदनाशामक, हार्मोन्स, अँटीबायोटिक्स आणि सप्लिमेंट्सचा स्व-औषधोपचारात मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला दिसतो. डिजिटल फार्मसी प्लॅटफॉर्म्समुळे औषध उपलब्धता सोपी झाली आहे, पण त्याबरोबर धोकेही वाढले.
स्वऔषधोपचाराची व्यापकता- राष्ट्रीय आकडेवारी (२०२५–२६ संशोधन)
- भारतामधील एका अभ्यासानुसार, स्वऔषधोपचाराचे सरासरी प्रमाण ६४.४% इतके आढळले आहे.
- विविध समुदाय-आधारित अभ्यासात स्वतः औषधे वापरणाऱ्या लोकांची टक्केवारी ५३.६% ते ६२.३% इतकी प्रचंड आहे.
- एक मध्य भारतातील अभ्यासात महिलांची स्वऔषधोपचार करण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत सुमारे दुप्पट आढळली.
- गर्भवती महिलांमध्ये सामान्यतः सर्दी, ताप, डोकेदुखीसाठी स्वऔषधोपचाराचे प्रमाण १९.३% आहे
म्हणजे एकूणच भारतात साधारण ५०-६५% लोक दरवर्षी वैद्यकीय सल्ल्याविना औषध घेतात, तर महिलांची संख्या तुलनेने अधिक आहे.
स्व-औषधोपचारात वापरली जाणारी प्रमुख औषधे
- वेदनाशामक औषधे/ NSAIDs (Non-steroidal anti-inflammatory drugs) घेतली जातात.
- आयब्रूप्रोफेन
- डायक्लोफेनाक सोडियम
- नॅप्रोक्झेन
दुष्परिणाम :
- पोटातील आम्ल वाढते परिणामी गॅस्ट्रिक अल्सर होण्याचा धोका.
- किडनीवर ताण पडतो.
- दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकारांमध्ये वाढ होते.
भारतातील केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, वेदनाशामक औषधे सर्वात जास्त स्व-औषधोपचारासाठी वापरली जाणारी औषधे आहेत.
- अँटीबायोटिक्स (डॉक्टरी सल्ल्याशिवाय) घेतले जातात.
- अमोक्सिसिलीन
*अझिथ्रोमायसिन - सिप्रोफ्लोक्सासिन
दुष्परिणाम/ धोके :
बॅक्टेरियल विरुद्ध व्हायरल संसर्गामध्ये स्वैरवापर केल्याने अँटीबायोटिक्सना प्रतिरोधक आणि उत्परिवर्तन निर्माण होते.
पचनसंस्थेचे विकार होतात.
पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव संतुलन बिघडते.
मूत्रमार्गातून होणाऱ्या संसर्गात वाढ होते.
- हार्मोनल / संप्रेरकांशी संबंधित वापरले जाणारी औषधे
- इमर्जन्सी कॉंट्रासेप्टीव पिल (ECP) —
- एस्ट्रोजन / प्रोजेस्टेरॉन संप्रेरके
-पाळी नियमित करणाऱ्या हार्मोनल पिल्सचा (OTCचा अतिवापर)
आणि कोणत्याही गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेणे हे हार्मोनल यंत्रणेवर गंभीर परिणाम करू शकते.
अनेकांना या हार्मोनल/ संप्रेरकांशी संबंधित औषधांच्या दुष्परिणामांची पूर्ण माहिती नसते. हार्मोन्स म्हणजे शरीराची ‘संगीतमय समतोल रचना’. एक चुकीचा स्वर संपूर्ण रचना विस्कटू शकतो.
शरीरावर दुष्परिणाम
मासिक पाळीचे चक्र अनियमित होणे.
वजन वाढणे.
मूड स्विंग्स / मूड सारखा बदलणे.
PCOSची लक्षणे तीव्र होणे.
शरीरावर त्वरित व दीर्घकालीन परिणाम
त्वरित परिणाम असे-
- डोकेदुखी, मळमळ, उलटी
- पोटदुखी, गॅसेस
- पाळीचे चक्र अनियमित
आपल्या शरीरावरील गोळ्यांचा प्रभाव आणि त्याचा संभाव्य परिणाम काय होऊ शकतो ते पाहू.
- वेदना शामक/NSAIDs गोळ्या जास्त घेतल्यास त्याचा परिणामी असा हाेताे की, पोटाच्या जळजळीचा त्रास वाढतो तसेच किडनीची कार्यक्षमता कमी होते.
- हार्मोनल पिल्सचा अतिवापर झाल्यास हार्मोन असंतुलन, मासिक पाळीचे चक्र बिघडते.
- अँटीबायोटिक्सच्या वारंवार सेवनाने अँटीबायोटिक्सचा प्रतिरोध निर्माण होतो, सतत मूत्रमार्गाचा संसर्ग होतो.
- अनेक प्रकारची औषधे सतत सेवन केल्याने औषध-औषधाची परस्पर प्रतिक्रिया होत राहते.
दीर्घकाळ वेदनाशामके हार्मोनल औषधांचा अनियंत्रित वापर :
→ रक्तदाबात वाढ होते.
→ रक्त गोठण्याच्या क्रियेत सतत बदल होतात.
→ हृदयविकाराचा धोका वाढतो.
ICMR २०२६ च्या डेटानुसार, ३५–४५ वयोगटातील महिलांमध्ये ‘silent cardiac risk’ वाढताना दिसते, विशेषतः ज्या महिलांनी नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोनल गोळ्या घेतल्या आहेत.
(ड) वजन कमी करणारी सप्लिमेंट्स / आयुर्वेदिक गोळ्या
अनेक जाहिरातींमधून वजन कमी करणारी सप्लिमेंट्स दाखवली जातात. त्यांची अनेक ऑनलाइन ब्रँड्सद्वारे विक्री होते. प्रोटीन पावडरमध्ये प्रोटीनव्यतिरिक्त शर्करा अधिक प्रमाणात असते. काही उत्पादनांमध्ये अनियंत्रित स्टिरॉइड्स किंवा हार्मोनल घटक आढळतात.
दुष्परिणाम :
- थायरॉईड बिघाड होतो.
- हृदयाचे ठोके अनियमित होतात.
- मानसिक अस्वस्थता निर्माण होते.
हार्मोन्सपासून हृदयापर्यंत – शरीरात साखळी प्रतिक्रिया चालू असते. स्त्रीचे शरीर जैविकदृष्ट्या अधिक हार्मोन-संवेदनशील असते. ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे संतुलन : - हाडांची घनता नियंत्रणात ठेवते.
- हृदयसंस्था नियमित ठेवते.
- त्वचा आणि केस यावर परिणाम करते.
डॉक्टरांचा सल्ला का अत्यावश्यक?
योग्य डोस आणि कालावधी निश्चित करणे.
इतर औषधांशी परस्पर प्रतिक्रिया (drug-drug interaction).
रक्ततपासणी (blood panel, liver/kidney function).
हार्मोनल स्थितीचे सखोल परीक्षण.
कुटुंबीयांचा वैद्यकीय इतिहास विचारात घेणे.
उदाहरणार्थ, उच्च रक्तदाब असलेल्या स्त्रीने वारंवार वेदनाशामके घेतल्यास धोका दुप्पट होऊ शकतो.
डॉक्टर संपूर्ण जैव-रासायनिक स्थिती लक्षात घेऊन औषध देतात केवळ लक्षणांसाठी नाहीत.
एक स्व-औषधोपचार, खास करून हार्मोन्सच्या गोळ्या / संप्रेरके, वेदनाशामके किंवा अँटीबायोटिक्समध्ये चूक झाल्यास रोग पुढे वाढू शकतो, वेळेत निदान न झाल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारे व न दिसणारे धोके
- OTC म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये-
- अनावश्यक संयोजने असू शकतात. –
- Fixed-dose combinations
- छुपे स्टेरॉईडस
- वेदनाशामक सर्दीची combination औषधे
- सोशल मिडिया वर “Doctor recommended” म्हणून दाखवलेले सप्लिमेंट्स.
या सर्वांचा दीर्घकालीन उपयोग हार्मोनल ताण, इम्युनिटीमध्ये बदल, मेटाबोलिक सिंड्रोम किंवा हृदयरोग वाढवू शकतो.
फार्मासिस्ट सांगते-
- एखाद्या आजाराची तीन दिवसांपेक्षा जास्त लक्षणे असतील तर डॉक्टरांकडे जा.
- प्रत्येक औषधाच्या पॅकेटच्या आतला कागद वाचा.
- अँटीबायोटिक्स कधीच प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नका. अँटीबायोटिक कोर्स पूर्ण करा,तो स्वतः सुरू करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
- हार्मोनल गोळ्या (ECP किंवा पाळीचे चक्र बदलणाऱ्या गोळ्या) केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्या.
“गोळी घेतली आणि…”
गोळी घेतली आणि वेदना थांबली.
गोळी घेतली आणि पाळी आली.
गोळी घेतली आणि वजन थोडं कमी झालं.
पण…
गोळी घेतली आणि हार्मोन्स संतुलन बिघडले.
गोळी घेतली आणि रक्तदाब वाढला.
गोळी घेतली आणि भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम झाला.
तात्पुरत्या आरामाच्या बदल्यात दीर्घकालीन किंमत मोजावी लागते. त्यामुळे औषधाच्या कोणत्याही गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नका.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांची किंमत म्हणजे-
- अनावश्यक मेडिकल खर्च वाढतात.
- क्रॉनिक आजार होण्याची शक्यता.
- मानसिक ताण-तणाव.
- कार्यक्षमतेत घट होणे.
आरोग्य म्हणजे खर्च नव्हे; ती गुंतवणूक आहे. डिजिटल युगात मार्केटिंग आणि वैद्यकीय सत्य यात फरक ओळखणे अत्यावश्यक आहे.
महिलांनी लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी…
- १. OTC म्हणजे सुरक्षित असे नसते.
- २. पाळी, थायरॉईड, रक्तदाब, रक्तातील शर्करा यांची– नियमित तपासणी करा.
- ३. गर्भधारणा नियोजन असल्यास कोणतीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
निष्कर्ष-
स्वऔषधोपचार हा आज भारतात साधारण ५५-६५% लोकांमध्ये एक सामान्य, पण धोक्याचा व्यवहार बनला आहे. विशेषतः महिलांमध्ये वेदनाशामके, संप्रेरके, अँटीबायोटिकचा स्वैरवापर वाढलेला दिसतो. ‘ओव्हर दि काऊंटर’ उपलब्धता सोपी असली तरी हार्मोनचे सूक्ष्म संतुलन कायम ठेवणे आणि आवश्यक तपासण्या करून घेणे फार महत्वाचे आहे. एक गोळी तात्पुरता आराम देऊ शकते, पण योग्य सल्ला आयुष्यभराची सुरक्षितता देतो. आरोग्य ही सोय नाही, तर ती जबाबदारी आहे. आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीराशी प्रामाणिक राहणे, हेच खरे स्वातंत्र्य आहे. स्वास्थ्य म्हणजे लक्षणांवर तात्पुरते उपाय नाही- ते एक संपूर्ण जैविक, मानसिक आणि दीर्घकालीन अवस्था आहे. आणि तिचं स्वास्थ्य’ टिकवून ठेवणं सर्वस्वी तिच्याच हातात आहे.
(लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या द्वीपदवीधर आहेत.)
phadkebhagyashri@gmail.com
