भाग्यश्री फडके धर्माधिकारी
सुलभाताई गुडघा दुखतो म्हणून डॉक्टरांकडे गेल्या होत्या. वय वर्षे ६०… अनेक शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे गुडघे सुजलेले. गुडघे दुखणे, भरभर चालताना त्रास होणे या तक्रारी घेऊन त्या डॉक्टरांना भेटल्या. आपण आपल्या आसपास पाहिले की बहुतेक वेळा बायका कंबर दुखते, गुडघे दुखतात म्हणून तेल चोळत असतात. तर महिलांमध्ये एवढे पाठ, कंबर, गुडघेदुखीचे प्रमाण जास्त का असते आणि त्यावरचे उपाय काय हेही जाणून घेऊ या. त्यावरचे उपाय खरं तर मुलींनी लहान वयातच सुरू केले पाहिजेत. ती काय खाते, किती पोषण देणारे खाते, लहान वयापासून शारीरिक हालचाल, व्यायाम कसा आणि किती करते यावर तीचे वृद्धापकाळातील कंबर, गुडघ्यांचे आरोग्य अवलंबून असते.
आपल्या मानवी शरीराला (सांगाड्याला) हालचाल करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु आपली हाडं तर अतिशय टणक, कडक असतात, त्यामुळे इजा न पोचता वाकणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे सुदैवाने शरीरात जोडून घेणाऱ्या उती आहेत (कन्हेक्टिव टिशू) आहेत जे दोन हाडांना व कूर्चा (cartilage) जोडण्याचे काम करतात आणि हालचाल करण्यास मदत करतात. त्यांनाच सांधे असे म्हणतात. जरा क्षणभर विचार करा की, आपले शरीर किती अगणित प्रकारच्या हालचाली, कसरती, व्यायाम प्रकार करू शकते, वाकू, वळवू, हात-पाय पुढे मागे, वर-खाली करू शकतो, गोलाकारात फिरवू शकतो, खेळाडू कठीण खेळू शकतात, वादक पियानो वाजवू शकतात. या सगळ्या जलद हालचाली करणे शक्य होते केवळ आणि केवळ आपल्या संध्यांमुळे. बरं या सांध्यांची अनेक कामे अगदी ठराविक असतात ती सतत आयुष्यभर चालूच असतात.
नितंबाचा सांधा
नितंबाचा सांधा नितंबाचे हाड आणि मांडीचे हाड यांना जोडणारा सेतू असतो. मांडीच्या हालचाली करण्यास मदत करतो जसे की, मांडी छातीजवळ वर उचलणे (फ्लेक्शन), पाय मागच्या बाजूस सरळ नेणे (एक्स्टेंशन), पाय शरीराच्या मध्यापासून दूर बाहेरच्या बाजूला नेणे (ॲबडक्शन), पाय पुन्हा शरीराच्या जवळ किंवा दुसऱ्या पायाकडे आणणे (ॲडक्शन), पाय किंवा गुडघा बाहेरच्या बाजूला फिरवणे (लॅटरल रोटेशन), पाय किंवा गुडघा आतल्या बाजूला फिरवणे (मिडियल रोटेशन), पाय गोलाकार फिरवणे (सरकमडक्शन) असे सर्व व्यायाम प्रकार करू शकतो.
महिलांमध्ये नितंबाचा सांधा दुखण्याची कारणे…
गरोदरपणात शरीरात ‘रिलॅक्सिन’ नावाचे संप्रेरक तयार होते. हे बाळाच्या जन्मासाठी ओटीपोटाचे सांधे सैल करते. त्यामुळे नितंबाचे सांध्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊन वेदना होतात. नितंबाच्या सांध्याला इजा किंवा घर्षणापासून वाचवण्यासाठी द्रवाने भरलेल्या छोट्या पिशव्या (Bursae) असतात. जास्त चालण्यामुळे, धावण्यामुळे यांना सूज येते ज्याला बर्साइटिस म्हणतात. त्यामुळे नितंबाच्या बाहेरील बाजूला वेदना होतात.
गुडघ्याचा सांधा
शरीरातील सर्वात मोठा आणि अतिशय गुंतागुंतीचा सांधा म्हणजे गुडघ्याचा सांधा. तिथे एका ठिकाणी तीन सांधे असतात. शरीराचे वजन उचलून घेणाऱ्या हाडांना जोडलेला असतो. गुडघ्याचा सांधा अस्थिबंध (लिगामेंट), कंडरा, स्नायुबंध (टेंडन), कूर्चा (कार्टिलेज) या सर्वांच्या समन्वयाने कार्यरत असतो. वय जसे वाढत जसे सांध्यामधले द्रव (संधीद्रव) कमी होत जाते. तसेच कूर्चा (कार्टिलेज) सुद्धा वयोपरत्त्वे पातळ होत जाते. अस्थिबंधची (लिगामेंट) लवचिकता कमी होत जाते. वयोपरत्त्वे सांध्यांमध्ये होणारे परिणाम जनुकीय असतात व्यक्तीसापेक्ष असतात.
महिलांमध्ये गुडघेदुखीची कारणे…
महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या प्रामुख्याने शारीरिक रचना, संप्रेरकांमध्ये बदल, वयानुसार हाडांची झीज आणि जीवनशैलीतील सवयींमुळे उद्भवते.
महिलांचे श्रोणि (ओटीपोट) कंबर, नितंब पुरुषांपेक्षा थोडे अधिक रुंद असते. यामुळे मांडीचे हाड आणि गुडघ्यामध्ये जास्त कोन तयार होतो, त्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांमध्ये होणारे बदल हाडांची घनता आणि सांध्यांची स्थिरता यावर परिणाम होतो. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन कमी झाल्याने हाडे कमकुवत होतात.
महिलांमध्ये मांडीच्या पुढील भागातील स्नायू मागील स्नायूंपेक्षा अधिक मजबूत असतात. त्यामुळे स्नायूंचे संतुलन बिघडते आणि गुडघ्यावर ताण येतो. तसेच महिलांमध्ये वाढलेल्या वजनानेसुद्धा गुडघ्यावर अधिक जोर/ ताण पडतो. वाढत्या वयानुसार गुडघ्यातील गादी झिजण्यास सुरुवात होते, त्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जाऊन वेदना होतात. बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे गुडघे लवकर दुखू लागतात. हाय हिल्स वापरल्याने गुडघ्याच्या संरचनेवर आणि चालण्याच्या पद्धतीवर वाईट परिणाम होतो. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता असल्यास हाडे ठिसूळ होतात आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.
अर्थाेप्लास्टी- संधिवात किंवा इजा झाल्यामुळे सांधे जर खराब झाले असतील तर शस्त्रक्रियेनंतर बदलून कृत्रिम सांधे बसवता येतात, त्याला अर्थाेप्लास्टी म्हणतात. शरीरातील बरेच सांधे अर्थाेप्लास्टी करून बदलता येतात प्रामुख्याने नितंब, गुडघे आणि खांद्याचे बदलतात. शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेल्या हाडांची दोन्ही टोके काढली जातात आणि धातू, सिरामिक, प्लास्टिक घटक वापरून टोके सांधली जातात. वेदना कमी करणे आणि हालचाली वाढवणे हाच मुख्य उद्देश्य या शस्त्रक्रियेमागे असतो.
नितंबाचा सांधा बदलणे (रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी)
रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी मुख्यत्वे अशा रुग्णांसाठी केली जाते- ज्यांच्या नितंबाचा सांधा गंभीररीत्या खराब झाला आहे आणि ज्यांना औषधे, इंजेक्शन किंवा फिजिओथेरपी करूनही आराम मिळालेला नाही.
लक्षणे- गंभीर ऑस्टियोआर्थरायटिस, अॅव्हॅस्कुलर नेक्रोसिस, रूमेटॉइड आर्थरायटिस, हिप फ्रॅक्चर किंवा गंभीर दुखापत किंवा जन्मजात दोष असतील तर. असह्य वेदना, सांधा कडक होणे, लंगडणे ही लक्षणे दिसल्यास शास्त्रक्रिया करतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणारी एक प्रगत आणि अत्यंत अचूक शास्त्रक्रिया आहे. यात पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा जास्त अचूकता मिळते आणि जलद पुनर्वसन (Rehabilitation) शक्य होते. शस्त्रक्रियेपूर्वी नितंबाच्या सांध्याची सीटी स्कॅन इमेजिंग केली जाते, ज्यामुळे नितंबाच्या रचनेचे अचूक ३-डी त्रिमितीय प्रारूप तयार होते. अस्थिशल्यचिकित्सक या त्रिमितीय प्रारूपाचा वापर करून कृत्रिम सांधा (इम्प्लांट) बसवण्याची अचूक जागा ठरवतात. रोबोटिक हाताच्या मदतीने खराब झालेले हाड किंवा कूर्चा अचूकपणे काढून टाकतात आणि कृत्रिम सांधा योग्य स्थितीत बसवतात.
फायदे- कृत्रिम सांधे अत्यंत अचूकपणे बसवले जातात, ज्यामुळे सांधेदुखी थांबून नैसर्गिक हालचाली पुन्हा सुरू होतात. या शस्त्रक्रियेत अत्यंत लहान छेद घेतला जातो, त्यामुळे स्नायू आणि ऊतींचे नगण्य नुकसान होते. कमी चिरफाड झाल्यामुळे रक्तस्त्राव आणि वेदनांचे प्रमाण खूप कमी असते. रुग्ण लवकर चालू फिरू लागतात. शस्त्रक्रियेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली चालणे सुरू केले जाते. पायाची ताकद वाढवण्यासाठी आणि नितंबाची लवचिकता टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. रुग्ण सर्वसामान्यपणे ४ ते ६ आठवड्यांत आपली सर्व दैनंदिन कामे पूर्ववत करू शकतात.
गुडघ्याचा सांधा बदलणे (रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी)- जेव्हा रुग्णाला औषधे, इंजेक्शन्स किंवा फिजिओथेरपी करूनही आराम मिळत नाही आणि रोजचे जगणे कठीण होते, तेव्हा ही शस्त्रक्रिया सुचवली जाते. गंभीर ऑस्टियोआर्थरायटिस, पाय तिरपे होणे, संधिवात, गंभीर दुखापत असेल तर केली जाते. रोबोटिक नी-रिप्लेसमेंट सर्जरी गुडघेदुखीवर उपचार करणारे अत्यंत प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामध्ये रोबोट स्वतः ऑपरेशन करत नाही, तर तज्ज्ञ अस्थिशल्यचिकित्सक रोबोटिक हात आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने अत्यंत अचूकतेने ही शस्त्रक्रिया पूर्ण करतात. रोबोटिक हाताच्या साहाय्याने फक्त झिजलेला आणि खराब झालेला हाडाचा भाग मोजून (सब-मिसिमीटर अचूकतेने) कापला जातो.
मूळ निरोगी हाड आणि लिगामेंट्सना धक्का लावला जात नाही. त्यानंतर शल्यचिकित्सक धातूची कॅप आणि विशेष गादी (Spacer) गुडघ्यात अचूकपणे फिट करतात. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे २० ते २५ मिनिटे लागतात. मानवी त्रुटीची शक्यता नगण्य होते आणि इम्प्लांट अगदी योग्य जागेवर बसतो. लिगामेंट बॅलन्सिंग उत्तम प्रकारे होत असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर गुडघा अगदी नैसर्गिक वाटतो. अचूक अलाइनमेंटमुळे कृत्रिम सांध्यावर योग्य वजन पडते, ज्यामुळे त्याची झीज कमी होते आणि तो २० ते २५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो. रुग्ण घरातल्या घरात चालणे आणि फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली गुडघा वाकवण्याचा व्यायाम सुरू करतो. रुग्ण वॉकरशिवाय स्वतःच्या पायावर चालू शकतो आणि दैनंदिन कामे करू लागतो. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेचे रुग्ण २ ते ३ आठवडे आधीच पूर्णपणे बरे होतात.
(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत.)
bhagyashri1@zohomail.in
