scorecardresearch

मला कुण्णाची मदत लागत नाही?’… बायांनो, मदत घ्या !

सणासुदीच्या दिवसांत बायकांना घरातली कामं प्रचंड असतात. आवराआवर, साफसफाई, पूजेची तयारी, स्वयंपाक, चहापाणी… यादी संपतच नाही. पण याच दिवसांत असेही संवाद ऐकायला मिळतात- ‘मला बाई कुण्णाची मदत लागत नाही. मी एकटीच करते सर्व!’ अशा वेळी विचारावंसं वाटतं… ‘का गं बाई, तुला का मदत नको?…’

Women ask help from family members festival housework
मला कुण्णाची मदत लागत नाही?’… बायांनो, मदत घ्या ! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सणावाराचे दिवस सुरु झाले आहेत. घराची साफसफाई, सजावट, स्वयंपाकाची तयारी… एक ना अनेक आणि या जोडीला उपासतापास. बायकांसाठी सणवार म्हणजे नुसताच आनंद, उत्साह इतकंच नसतं, तर त्याबरोबरीनं हे सगळं आणि असंख्य कामं आणि त्यानंतरचा थकवाही असतो. सणाच्या निमित्तानं घरचे एकत्र जमतात, चार क्षण एकत्र घालवतात. हा आनंदाचा ठेवा मग पुढे वर्षभर पुरतो, वगैरे सगळं काही खरं असलं, तरी बायकांनाही या सणांच्या दिवसांतलं काम पुढचे अनेक महिने पुरतं हेही तितकंच खरं आहे! पूर्वीएवढं सोवळंओवळं किंवा काटेकोर नियम आज जरी लावले जात नसले, तरीही सणांच्या दिवसांत बायका जास्त दमतात हे नक्की.

गणपती-गौरीसारखे सण आल्यावर तुम्हाला आजूबाजूला हे असे संवाद ऐकलेले आठवतायत का?… ‘मला कुण्णाची मदत लागत नाही, मी एकहाती सगळं करते!’, ‘आम्ही आमच्या वेळी एका वेळेस तीस-तीस जणांचा स्वयंपाक करत होतो, आता बघा, साध्या १५ जणांच्या स्वयंपाकालासुद्धा निम्मे पदार्थ बाहेरुन आणलेले असतात!”, “मी बाई सगळी साफसफाई स्वत:च करते. घराचा कानाकोपरा चमकवते अगदी! मला आवडतच नाही बाईच्या हातचं…’ असे डायलॉग तुमच्या कानावर पडत असतीलच. असंख्य गोष्टी ‘मी एकटीच करते’ म्हणणाऱ्या अनेकजणी असतात. सणावाराची खरेदी, घरातली साफसफाई, सजावट, स्वयंपाक, नंतरचं आवरणं… सगळं सगळं त्या स्त्रिया स्वत: करत असतात. पण तुम्ही आणखी एक पाहिलंय का? की यातल्या कितीतरी जणी ऐन सणासुदीच्या दिवसांत आजारी पडतात. एकटीनं सर्व काम ओढून न्यायच्या नादात खूप दमणूक होते, जुनी दुखणी या दमणुकीनं डोकी वर काढतात, मानसिक थकवा येतो ते वेगळंच.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं

अशा वेळी त्या स्त्रियांना विचारावंसं वाटतं, ‘अगं बाई, पण का? का करतेस तू सर्व एकटीनंच?’ आणि सांगावंसं वाटतं, की ‘बाई, जरा थांब! थोडा श्वास घे… आणि मुख्य म्हणजे आता, लगेच कुणाची तरी मदत घे कामात. तुलाही सण साजरा करायचा आहे ना? कुटुंबाच्या आनंदात तुझाही वाटा आहेच. की नुसतंच काम करून करून दमायचंय तुला? जेवणखाण, आवराआवरी, याच्या पलिकडेही सण असतो, हे एकदा अनुभवून बघ गं! घरातली पुरूष माणसं, मुलंबाळं आपापल्या परीनं सणात सहभागी होत असतात. पण घर आवरण्याच्या, साफसफाईच्या आणि स्वयंपाकाच्याही कामात तुला त्यांची थोडी मदत लागणार आहे, हे त्यांना प्रांजळपणे सांग. अगं, ती तुझीच प्रेमाची माणसं आहेत. तू तुझं काम वाटून घ्यायचा प्रयत्न केलास, तर ती का प्रतिसाद देणार नाहीत?… हं, सुरूवातीला नवरोबा थोडं चुकतील, मुलं जरा टाळाटाळही करतील… पण चुकतमाकत सगळे शिकतीलच की! शेवटी सणासुदीचं काम हेही सर्व कुटुंबाचंच काम आहे ना? त्यात आपला वाटा उचलायची सवय हळूहळू नक्की लागेल त्यांना. पण त्यांना ही जाणीव नसेल, तर ती होण्यासाठी आधी तू मदत मागायला तर हवीस ना?…’

आपण बोलतोय ते मदतीला हात असूनही एकटीनंच करण्याचा सोस असण्याबद्दल. अशाही कितीतरीजणी आहेत ज्यांना खरोखरच या दिवसांत मदतीची फार फार गरज असते आणि त्यांना ती मिळत नाही. फार कशाला, आपल्या परदेशात राहणाऱ्या बहिणी, मैत्रीणींकडे बघा. मग आपण तर किती नशीबवान आहोत ते पटतं की नाही पहा! आपल्याला मदत घेण्याचे असंख्य पर्याय आहेत.

हेही वाचा… नातेसंबंध: ‘प्लेटॉनिक लव्ह’ जोडीदार समजून घेईल का?

आपल्या आई, मावशी, सासू, काकू यांच्या पिढीत बाहेरुन मदत घेणं म्हणजे त्या स्त्रीला सहसा नावं ठेवली जायची. तरीही कितीतरी जणी त्यातून हळूहळू बाहेर पडल्या आणि शक्य तितकी मदत घेऊ लागल्या. सण सगळ्यांचाच असतो, त्यामुळे सणाच्या तयारीत घरातले सगळेचजण उत्साहाने सहभागी होऊ शकतात. आपण फक्त एक हाक मारण्याचा अवकाश असतो. खपदज घरांत सजावट, साफसफाईची जबाबदारी घरातील पुरुषवर्गावर दिलेली असतेही. पण त्याचबरोबर या दिवसांतला स्वयंपाक खूप थकवणारा असतो. अशा वेळेस शक्य ती मदत बाहेरुन घेतली तर त्यात काहीही चूक नाहीये! गौरी जेवणाच्या दिवशी साहजिकच घरात जेवणाऱ्यांची संख्या भरपूर असते. अशा वेळेस नैवेद्यापुरतं आपण करुन पोळ्या, पुरणपोळ्या बाहेरुन मागवल्या तर घरातल्या बायकांवरचा भार नक्कीच कमी होतो. अशा कितीतरी गरजू बायका असतात, ज्यांना या दिवसांत काम मिळालं, तर त्यांचाही सण उत्साहानं साजरा होऊ शकतो. त्यांना जर अशी ऑर्डर दिली तर आपलंही काम कमी होतं आणि त्यांनाही हातभार लागतो. काही घरांमध्ये, जिथे मोठ्या कुटुंबाचा गमपती कुणाच्या तरी एकाच्या घरी बसवला जातो, तिथे आता कुटुंबातले सगळे मिळून खर्च देतात आणि मेन्यू ठरवून बाहेरुन जेवण मागवतात. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे घरातल्या बायका फक्त स्वयंपाकघरात अडकत नाहीत.

पूर्वी घरामध्ये मुलं, मुली, भाचे, पुतणे वगैरे भरपूर मुलंमुली असायची. हक्कानं हाक मारली तर कोणतीही कामं केली जायची. आता एकत्र कुटुंब पध्दत कमी झाली असली सणावाराच्या निमित्तानं ठिकठिकाणी पांगलेले एकत्र येतात. त्यात विस्तारित कुटुंबं म्हणजे शेजारी, मित्रमैत्रीणी यांची कुटुंबं वाढलेली आहेत. मग सणावाराच्या तयारीच्या निमित्तानं त्यांनाही सहभागी करुन घेतलं, तर त्यांना हा अनुभव नक्कीच आवडेल, बघा! पाहुणे येण्याआधीच्या साफसफाईसाठी कुणी ओळखीचं असेल तर त्यांना मदतीला घ्या किंवा हल्ली अनेकजण ही व्यावसायिक सेवा पुरवतात, त्याचा लाभ घ्या. मदत मागणं यात काहीच कमीपणा नाही हे मुळात लक्षात घ्या.

हेही वाचा… स्वास्थ्यकारक स्वयंपाक करायचाय?… मग हे वाचा-

‘सण आमचाही आहे,’ याची घरातल्या सदस्यांना जाणीव नसेल तर ती जरूर करुन द्या. जेवायला वाढणं, उरलेलं अन्न काढून ठेवणं, ओटा आवरणं आणि पुसणं, ही कामं तर घरातली तरुण मुलंमुली, पुरुष, कुणीही करु शकतंच. त्यामुळे बायकांना दोन घास निश्चित निवांतपणे खाता येतील. गौरी-गणपती म्हणजे वर्षाचा सण. त्यानंतर येणारं नवरात्र, मग दिवाळी… एकामागोमाग सण येतातच. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून दोन क्षण आनंदानं, उत्साहानं घालवावेत म्हणूनच हे सण असतात. सण म्हणजे आनंद, हे समीकरण आपल्यालाही हवं असेल, तर बायांनो हक्काची मदत मागा!

lokwomen.online@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×