काही वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातली एक स्त्री एका बुवाकडे जात असे. हळूहळू तिने आपल्या तरुण मुलींनाही आपल्या बरोबर न्यायला सुरुवात केली. बाबा कोणत्या ना कोणत्या विधींच्या नावाखाली या मुलींना सतत आपल्या जवळ बोलवायला आणि नको तिथे स्पर्श करायचा. मुलींनी घरी आल्यावर आईला त्याबद्दल सांगितलं तर आईचं उत्तर होतं, ‘‘सिद्धी प्राप्त झालेले महाराज आहेत ते. ते जे काही करतात ते भक्तांच्या भल्यासाठी. तुम्ही असं बोलता आहात कारण तुमच्या मनात पाप आहे.’’

एरवी आपल्या मुलींनी कोणाकडे पाहणंही मंजूर नसलेली ती आई त्या बुवाला आपल्या मुलींना नको असतानाही बिनदिक्कत स्पर्श करू देत होती आणि तो त्या बुवाचा प्रसाद असल्याचे सांगत होती. पुढे त्या मुलींचं, त्या माऊलीचं आणि त्या बुवाचं काय झालं ते नाहीत नाही. पण स्वत:ला कॅप्टन, कृष्ण असं काहीही म्हणवून घेणारा एक माणूस बड्या घरांमधल्या, एरवी आपल्या प्रतिष्ठेचं अवडंबर करणाऱ्या शेकडो बायकांना योनिशुद्धीकरण या वेडगळ कल्पनेच्या जोरावर स्वतचं मूत्र, वीर्य पाजून, गुंगीचं औषध देऊन फशी पाडतो, तेव्हा हसावं की रडावं हेच समजत नाही.

लग्न करून मुलींना सासरी पाठवताना त्यांच्या हातात पोथ्या पुराणे नाही तर संविधानाची प्रत द्या, असं सांगणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षच या तथाकथित बुवासाठी छत्री धरताना, त्याला घास भरवताना, त्याची पाद्यपूजा करून आपल्या पदराने त्याचे पाय पुसताना आणि प्रत्येकाला एक गुरू लागतोच, मी त्याला गुरू मानलं तर काय बिघडलं असं म्हणताना दिसतात, तेव्हा या प्रकरणात ज्या ५८ स्त्रियांबद्दलची सीडी आहे, असं सांगितलं जातं, त्यांच्याबद्दल काय बोलावं हे कळत नाही.

नवससायास करून पोरं झाली असती तर बायकांना पती कशाला लागले असते, असा रोकडा प्रश्न तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केला होता. तरी देवळांपुढच्या आणि अशा बुवा बाबांपुढच्या नवसाच्या रांगा काही हटायला तयार नाहीत. लग्न व्हावं, चांगला नवरा मिळावा म्हणून देवाला साकडं घालण्यासाठी बायांना हे असले बुवा हवेत. लग्न झालं तर लवकर मूल व्हावं हे गाऱ्हाणं घेऊन त्या अशा बुवा बाबांकडे येतात. नवरा दारू पितो, कमवत नाही, मारतो चला एखाद्या बुवाकडे.

सासू छळते, नणंद भांडणं लावते, सांग एखाद्या बुवाबाबाला तिचा बंदोबस्त करायला. नवऱ्याने दुसरा घरोबा केला आहे, मुलाबाळांसह वाऱ्यावर सोडलं आहे, लाव एखाद्या बाबाचा अंगारा. यातलं काहीच नसेल तर जे आहे ते नीट रहावं म्हणूनदेखील एखाद्या बुवाबाबाकडे जाणाऱ्या बायका आहेत. त्या नवसाला पावणाऱ्या देवापुढे जितक्या भक्तीभावाने झुकतात, त्यापेक्षाही जास्त अशा बुवाबाबांपुढे झुकतात.

एखाद्या भागात एखादा बुवाबाबा नावारुपाला यायला लागतो. कुणीतरी एखादी जाते, ती दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते…. असं करत अशा बाबांकडे जाणारी बायकांची गर्दी वाढायला लागते. आधीच घरात, पुरुषप्रधान व्यवस्थेत व्यक्ती म्हणून फारशी किंमत नाही. कितीही रामरगाडा उपसा, कष्ट करा, एखादा कौतुकाचा शब्द नाही. त्यांना कधी स्वत:हून नीट विचार करायला शिकवलं जात नाही की निर्णय घ्यायला शिकवलं जात नाही. हे सगळं दुसऱ्या कोणीतरी करायचं असतं आणि बायकांनी त्याची फक्त अंमलबजावणी करायची असते, हेच त्यांना माहीत असतं. त्यात घरातली बाई कुठं फिरायला जाते म्हणाली तर तिला टोकलं जाईल, पण एखाद्या बाबाकडे ‘सत्संगा’ला जाते म्हणाली तर तिचं, तिच्या धार्मिक वृत्तीचं कौतुक होतं. काय माहीत, एखादा प्रेमाचा शब्द, प्रेमाचा स्पर्श कदाचित त्यांना या सगळ्या जाळ्यात पुढं जायला प्रवृत्त करत असेल. आणि मग कदाचित परतीचा रस्ताच नसेल.

खरात बाबा त्याच्याकडे येणाऱ्या बायकाचं योनिशुद्धीकरण करून देत होता असे तपशील आता पुढे आले आहेत. योनिशुचितेपासून ते योनिशुद्धीकरणापर्यंतचा आपल्या समाजाचा हा प्रवास खरोखर चक्रावून टाकणारा आहे. एकीकडे स्त्रीच्या योनिशुचितेचा आग्रह धरत शेकडो वर्षे तिला समाजपुरुषाच्या बंधनात रहावं लागलं. आणि असं असताना कुणीतरी येतो आणि मी कृष्ण आहे, मी तुझी योनी शुद्ध करून देतो असं सांगतो आणि बाया त्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही अशुद्ध आहात, पापी आहात, मीच तुमचा तारणहार असं कुणी म्हणत असेल तर त्यामागचं राजकारण त्यांच्या का बरं लक्षात येत नाही? उच्चवर्गीय, प्रतिष्ठित घरांमधल्या बाया अशा नाटकाला बळी पडत असतील तर अशिक्षित, तळागाळातल्या स्त्रियांना कसा दोष द्यायचा?

अनिल अवचट यांच्या धार्मिक या लेखसंग्रहातदेखील असाच एक वाघमारे बुवा आहे. जुन्नर परिसरात बेकरीत काम करणारा हा एक अगदी सामान्य माणूस. पण चक्रे अशी फिरत जातात की तो योनिपूजा करायला सुरुवात करतो आणि त्याच्या परिसरातील अगदी प्रतिष्ठित घरांमधल्या तरुण, प्रौढ, वयस्क अशा सगळ्याच स्त्रिया भरपूर पैसे देऊन त्याच्याकडून आपली योनिपूजा करून घ्यायला लागतात. लैंगिक संबंधाचं एक रॅकेटच यातून फोफावत जातं. वाघमारे बुवा ४०-४५ वर्षांपूर्वी योनिपूजा करत असे. खरात बुवा योनिशुद्धीकरण करत होता.

दोन्हीकडे फसल्या त्या त्या परिसरातील स्त्रियाच. अर्थात अशनीजल नामक भंपक प्रकारातून वायग्रा देत खरात बुवाने मंत्र्यासंत्र्यांना, सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवलं. दोनपाचशे रुपयांचे खडे दोनपाच लाखांना विकत कोट्यवधींची संपत्ती उभी केली. महाराष्ट्राच्या मनाची मशागत ज्ञानदेव, तुकारामांसारख्या संतांनी केली आहे, असं अभिमानाने सांगितलं जातं. पण हे सगळे प्रकार बघितले की,

‘‘व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर’’

या तुकारामांच्या ओळी अगदी सार्थ वाटायला लागतात.

‘‘नको नको रे ज्योतिषा माह्या दारी नको येऊ,

माह्य दैव मले कळे माह्या हात नको पाहू…’’ असं बहिणाबाई चौधरींसारख्या अशिक्षित समजल्या जाणाऱ्या बाईने १०० वर्षांपूर्वी म्हटले होते. पण आजच्या सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या बाया मात्र योनिशुद्धीकरण यासारख्या भोंगळ प्रकाराला बळी पडतात हे खरोखरच चक्रावून टाकणारे आहे.