योगमार्ग : शशांकासन

या आसनाच्या सरावाने मासिक पाळीच्या काळातील पोटदुखी कमी होते आणि शांत वाटतं

योगमार्ग : शशांकासन
योगा

डॉ. उल्का नातू गडम

रोजच्या धावपळीत सर्व आघाड्यांवर लढताना कितीही मनात आणलं तरी शांत वाटत नाही. अनेकाग्रतेत एकाग्रता साधनं कठीण होऊन बसतं. अशावेळी वाटतं कुणीतरी अशी एखादी युक्ती सांगावी की, त्रासलेले मन क्षणार्धात थोडं तरी शांत होऊ शकेल. यासाठी योगाचार्य व्यवहारे गुरुजी एक खूप छान कृती शिकवत, ती म्हणजे मुखधौती! एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा व तोंडाने जोरात फुंकर मारत सोडून द्यायचा. थोडक्यात श्वास भरून घेताना भरपूर प्राणीशक्तीचे सेवन करत आहोत. हा विचार मनात आणायचा आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे हा विचार करायचा. क्षणभर का होईना खूप छान वाटतं. मनाला शांतता प्रदान करणारे, आसन केल्या केल्या शांतता जाणवून देणारं एक नितांत सुंदर सोपं आसन म्हणजे शशांकासन.

हे आसन आपल्याला वज्रासनातून पुढे करायचं आहे. दोन्ही हात वज्रासनात मांड्यांवर ठेवा. आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही कोपरांमध्ये हात सरळ ठेवा. आता श्वास सोडत हात खाली आणा, पाठकणा जमिनीला समांतर आणा. पोट/छाती मांड्यांवर व कपाळ जमिनीला गुडघ्यापुढे टेकलं पाहिजे. पृष्ठभाग/नितंब वर उचलू नका. आता हात कोपरात किंचित दुमडा व दोन्ही तळवे व कोपरे जमिनीवर अतिशय शिथिल ठेवा. साधारण ४ ते ५ श्वास या स्थितीत रहा. नंतर पूर्वस्थितीला या. जमल्यास अधिक आवर्तनं करा. या आसनाच्या सरावाने मासिक पाळीच्या काळातील पोटदुखी कमी होते. शांत वाटते.

‘शश’ म्हणजे ससा व अंक म्हणजे मांडी. चंद्रावरील काळे डाग म्हणजे जणू काही त्याच्या मांडीवर बसलेला ससा आहे अशी भारतीय जनमानसात रुजलेली जुनी कल्पना आहे. चंद्र हा शांततेचं, शीतलतेचं प्रतीक आहे. या आसनाची अंतिम स्थितीदेखील सशाप्रमाणे दिसते. त्याचा लाभही मनःशांती देणारा आहे. म्हणूनच या आसनाला शशांकासन या नावाने संबोधले जाते.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women yoga in daily life shashankasana simple posture with multiple benefits nrp

Next Story
घर आणि करिअर : सेलिब्रेटीज तोल सांभाळतात कसा?
फोटो गॅलरी