scorecardresearch

Premium

स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ?

बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखी सतावत असते. त्यावर योग्य उपचार घेण्याऐवजी अनेकजणी कुणी तरी काही तरी सांगतं त्यावर त्या विश्वास ठेवतात आणि डॉक्टारांकडे जाणं टाळतात. योग्य उपचारच स्त्रियांना आराम देऊ शकतात.

women health, back pain, calcium c pill, diagnosis, treatment
स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ? ( photo courtesy – freepik )

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

“डॉक्टर, या कंबरदुखीवर काहीतरी उपाय सांगाच.”

Things Mother Should Keep In Mind
Parenting Tips: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
womens sexual desire feminist perspectives on sex cultural suppression of female sexuality
ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’
women must know this six points while making financial investments dvr 99
मैत्रिणींनो, आर्थिक गुंतवणूक करायचीय?… मग ‘या’ ६ गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं!
cardiac arrests symptoms men and women
अचानक हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी लक्षणे जाणवतात का? पुरुष आणि स्त्रियांमध्ये ही लक्षणे वेगळी असतात का? संशोधन काय सांगते….

“डॉक्टर, आज हिला जबरदस्तीनेच घेऊन आलोय. गेली कित्येक वर्षं हिची सतत कंबर दुखतेय, पण तुमच्याकडे यायलाच तयार नव्हती. असं होतंच सगळ्या बायकांना, असं तिचं म्हणणं आहे. मला पटलं नाही म्हणून घेऊन आलोय तुमच्याकडे.” इति रुग्णाचा वैतागलेला पण प्रेमळ नवरा.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या धर्तीवर ‘घरोघरी कंबरदुखी’ असं म्हणता येईल एवढी कंबरदुखी ही कॉमन गोष्ट आहे. आणि त्याबरोबरच याबद्दल असलेले अगणित गैरसमज, वेळप्रसंगी अंधश्रद्धासुद्धा आपल्या समाजात दिसतात. त्यामुळे या विषयी वेगळी चर्चा व्हायलाच हवी असं वाटतं.

सर्वात मोठा प्रचलित गैरसमज म्हणजे कंबरदुखी सिझेरियनच्या वेळी पाठीत दिलेल्या इंजेक्शनमुळे सुरू होते हा आहे. सिझेरियनच्या वेळी spinal anaesthesia म्हणजे मणक्याच्या एका आवरणात इंजेक्शन देऊन भूल दिली जाते. यामध्ये कमरेखालचा भाग साधारणपणे २ तासांपर्यंत पूर्ण बधिर होतो. ही भूल स्त्री आणि बाळ दोघांकरताही अतिशय सुरक्षित असते. या भुलेमुळे बाळ बाहेर येताना नवमाता पूर्ण जागी असते. तिला बाळ लगेच दाखवलं जातं आणि बाळाला स्तन्यपानसुद्धा ऑपरेशन टेबलवर असतानाच सुरू करता येतं.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोटदुखी (उदरशूल)

आता थोडंसं वेदनारहित प्रसूतीबद्दल – यामध्ये गर्भवतीच्या प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी कळा सुरू झाल्यानंतर मणक्याच्या epidural space या भागात वेदनाशामक औषध सोडलं जातं. यासाठी एक अतिशय बारीक नळी मणक्याच्या आतील भागात ठेवून गरजेप्रमाणे डोस दिला जातो. गर्भवती या दरम्यान पूर्ण जागी असते आणि प्रसूतीची वेळ आल्यावर जोरही लावू शकते. प्रसूती न झाल्यास डोस वाढवून सिझेरियनही करता येऊ शकतं.

भुलेची इंजेक्शन्स आयुष्यभर दुखतात हे म्हणणं म्हणजे लहान बाळांना दिलेल्या लसी आयुष्यभर दुखतात असं म्हणण्याइतकेच अशास्त्रीय आणि अतार्किक आहे. महत्त्वाचा मुद्दा हाही आहे, की भारतीय स्त्रिया स्त्रीरोग तज्ञांनी कितीही आवर्जून सांगितलं तरीही नियमित कॅल्शियमच्या गोळ्या घेत नाहीत. त्यामध्ये सुद्धा पूर्वीच्या पिढीत कॅलशियमच्या गोळ्या घेतल्या तर बाळाचं वजन खूप वाढतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, असा गैरसमज खरंतर अंधश्रद्धाच होती. ही पिढी अजूनही अशा अशास्त्रीय आणि कधी कधी धोकादायक गोष्टी तरुण स्त्रियांच्या मनावर बिंबवत असतात. एखादी नुकती प्रसूत झालेली स्त्रीसुद्धा स्वतःला याबाबतीत एक्सपर्ट समजते आणि आजूबाजूच्या सगळ्या कोवळ्या मुलींना सल्ले देत सुटते. बऱ्याच तरुण मुलींचं अशा चुकीच्या सल्ल्यांमुळे आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: पावटा, वाल, वालपापडी

आपल्या समाजात काही स्तरात अजूनही मुलींना लहानपणापासून पोषक आहार मिळत नाही. कुपोषणाची सुरुवात तिथूनच होते. मग लहान वयात लग्न, लगेच मुलं, एकापाठोपाठ बाळंतपणं असं शुक्लकाष्ठ लागतं त्यांच्यामागे. या सगळ्यामध्ये तिच्या शरीराच्या पोषणाचा विचार कोणीही करत नाही. चारपाच महिने झाल्याशिवाय गर्भवतीला डॉक्टरकडेही घेऊन जाण्याची तसदी न घेणारी खूप कुटुंबे आहेत. तरी बरं सगळ्या गर्भवतींना सरकारी दवाखान्यांमध्ये रक्तवाढीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या फुकट दिल्या जातात. बऱ्याच वेळा तर ती बिचारी आधीच्या बाळाला स्तन्यपानही देत असते. अशा परिस्थितीत तिच्या शरीरातील सगळं कॅल्शियम संपलं नाही तरच नवल!

आर्थिक स्तर चांगला असलेल्या गर्भवतीसुद्धा केवळ कंटाळा म्हणून कॅल्शियम गोळी घ्यायची टाळाटाळ करतात. कॅल्शियम हे गर्भारपणात होणाऱ्या बऱ्याच गुंतागुंतींना उदा. गर्भारपणात वाढणारा रक्तदाब इत्यादी टाळण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे.

आता याच स्त्रिया बाळंतपणानंतर एकदोन वर्षात कंबरदुखीची तक्रार करू लागतात. आणि घरचे,बाहेरचे त्यांना सर्रास हे डिलिव्हरीच्या वेळच्या दिलेल्या इंजेक्शनमुळे आहे आणि यावर काही उपाय नाही असं सांगून मोकळे होतात. एव्हाना यातल्या काही स्त्रियांचे वजन वाढलेले असते. घरच्या व्यापामुळे व्यायाम हा शब्द हद्दपार झालेला असतो. मानसिक ताणामुळे ही कंबरदुखी आणखीनच वाढत जाते. मग अशास्त्रीय उपायांकडे मोर्चा वळवला जातो.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा

नव्वद टक्के कंबरदुखी असलेल्या स्त्रियांना नियमित व्यायाम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांनी खूप फरक पडू शकतो. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन नियमित व्यायाम केला नाही तर ते कॅल्शियम हाडांमध्ये शोषले जात नाही त्यामुळे नियमित व्यायामही अत्यंत महत्त्वाचा आहे. आहारामध्ये दूध व दुधाचे पदार्थ, नाचणी, कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांचा समावेश असावा.

आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कंबरदुखी इतरही काही आजारांमुळे असू शकते. मणक्याचे वेगवेगळे आजार, संधिवात, मज्जासंस्थेचे विकार, क्वचित गर्भाशयाला किंवा ओटीपोटात असलेल्या गाठी यामुळेही कंबरदुखी असू शकते. साध्या उपायांनी बरं न वाटल्यास, असह्य वेदना असल्यास, पायांना मुंग्या येणे, पायांची ताकद कमी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असल्यास लगेच तज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

तर मग मैत्रिणींनो, पुढच्या वेळी तुमच्या गप्पांमध्ये कंबरदुखी हा विषय आला की या सगळ्या गोष्टींची चर्चा नक्की करा आणि तुमच्या सख्यांना प्रेमाचा योग्य सल्ला द्या. खरंतर प्रेमाने ओथंबलेले शब्द निम्मी कंबरदुखी बरी करूच शकतात… हो ना?

लेखिका स्त्रीरोग व वंध्यतज्ज्ञ आहेत.

shilpachitnisjoshi@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens health back pain a common problem and its diagnosis asj

First published on: 22-09-2023 at 14:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×