-डॉ. किशोर अतनूरकर

प्रश्न : डॉक्टर, पूर्वी माझं वजन इतकं जास्त नव्हतं, पण गेल्या वर्ष भरात माझ्या पाळीचं गणित काहीसं बिघडलंय, दोन-दोन, तीन-तीन महिने पाळी येत नाही, आली तरी ‘खूप कमी जातं’ (रक्तस्त्राव खूप कमी होतो), त्यामुळे माझं वजन खूप वाढलंय. मी काय करू?
उत्तर : अनेक तरुण, अविवाहित मुली आणि काही वेळा तर विवाहित, जननक्षम वयात असलेल्या स्त्रियांचीही ही तक्रार असते. मासिकपाळी उशिरा येत असल्यामुळे आणि सरासरीपेक्षा खूप कमी रक्तस्त्राव होत असल्यामुळे रक्ताच्या गाठी आत, शरीरामधे जमा होऊन आपल्याला लठ्ठपणा आला आहे, आपलं वजन वाढत आहे, असं अनेक स्त्रियांना वाटत असतं. हा एक गैरसमज आहे. तो सहसा आई किंवा घरातील जेष्ठ स्त्रियांमार्फत तरुण मुलींपर्यंत पसरतो.

Stale vs fresh roti Find out which one might help regulate blood sugar
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

वस्तुस्थिती वेगळीच, किंबहुना पूर्णपणे विरुद्ध आहे. मासिक पाळीत रक्तस्त्राव कमी झाल्यामुळे वजन वाढत नसून ज्या मुलीचं किंवा स्त्रीचं वजन अन्य काही कारणांमुळे वाढलेलं असतं त्यांना मासिकपाळी दर महिन्याला नियमितपणे येण्याऐवजी उशिरा म्हणजे, दोन-दोन, तीन-महिने न येण्याची समस्या असू शकते. पाळी आल्यानंतर रक्तस्रावाचं प्रमाण अति जास्त, अति कमी असतं किंवा थोडा-थोडा रक्तस्त्राव (spotting) अनेक दिवस चालू असतो.

आणखी वाचा-७३ जणांचा गुंतवणुकीस नकार, तरीही उभारल्या ५२ हजार कोटींच्या दोन कंपन्या; वाचा रुची कालराच्या यशाची ‘ही’ रणनीती!

वाढलेल्या वजनाचा किंवा लठ्ठपणाचा आणि मासिक पाळी उशिरा येण्याचा पाळीत कमी रक्तस्त्राव होण्याच्या समस्येचा काय संबंध आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या मुलीची किंवा स्त्रीची मासिक पाळी नियमित महिन्याच्या महिन्याला येते, त्यांच्या प्रजननसंस्थेमधे पाळीच्या साधारणतः १४ व्या दिवशी स्त्री-बीज परिपक्व होऊन स्त्री-बीजांडकोशाच्या (Ovary) बाहेर पडण्याची प्रक्रिया (Ovulation) ढोबळमानाने सुरळीत असते. पाळी उशिरा-उशिरा येते याचा अर्थ ही ovulation ची नैसर्गिक प्रक्रिया तात्पुरती बिघडली आहे असं समजायला हरकत नाही. प्रमाणाबाहेर वजन वाढल्यामुळे ही प्रक्रिया बिघडत असते. शरीरात मेद, चरबी किंवा फॅटचं (Fat) प्रमाण वाढल्यामुळे वजन वाढतं. दर मासिकपाळीच्या १४ व्या दिवशी ovulation होऊन, पाळीचं महिन्यानुसार चक्र नियमित ठेवण्याची जबाबदारी, स्त्रियांचं ‘स्त्री’पण टिकवणाऱ्या हॉर्मोन्स (संप्रेरकं)कडे निसर्गाने सोपवलेली असते. इस्ट्रोजन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) ही त्या दोन हॉर्मोन्सची नावं. या दोन हॉर्मोन्सचं स्रवण स्त्रियांच्या प्रजननसंस्थेत संतुलित पद्धतीनं होत असतं. यांचं संतुलन बिघडलं की ovulation ची प्रक्रिया बिघडते, किंबहुना ovulation होत नाही आणि मासिक पाळीचं चक्र अनियमित होतं, परिणामस्वरूप पाळी उशिरा यायला लागते.

आणखी वाचा-लष्करात सुभेदारपदी नियुक्त होणारी पहिली स्त्री- प्रीती रजक

इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्सचं मूळ कोलेस्टेरॉलमध्ये म्हणजेच फॅटमध्ये आहे हे लक्षात घेतल्यास या हॉर्मोन्सच्या संतुलित निर्मितीचा आणि फॅटचा मूलभूत संबंध आहे हे लक्षात येईल. ज्याप्रमाणे थायरॉईड, पॅनक्रियाज सारखे अवयव हॉर्मोन्स तयार करतात म्हणून त्यांना अंत:स्त्रावी अवयव (Endocrine Organ ) संबोधलं जातं त्याप्रमाणे शरीरात असलेल्या फॅट किंवा चरबीमधे देखील हॉर्मोन्स तयार होण्याच्या घडामोडी चालू असतात, म्हणून फॅट किंवा चरबीलादेखील एक प्रकारचं Endocrine अवयव असं म्हटलं जातं. पॅनक्रियाज या अवयवापासून इन्सुलिन नावाचं हॉर्मोन तयार होत असतं. इन्सुलिनचा जसा मधुमेहाशी संबंध आहे तसा तो लठ्ठपणाशीदेखील असतो. लठ्ठ मुलीं किंवा स्त्रियांमध्ये इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होत असतं. यामुळे फॅट किंवा चरबीमधे असलेल्या अँड्रोजन या हॉर्मोनचं रूपांतर इस्ट्रोजेनमध्ये होतं. इस्ट्रोजन प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे प्रोजेस्टेरॉनबरोबरचं संतुलन बिघडतं. यामुळे स्त्री-बीज तयार होत नाही. हे सगळं लठ्ठपणामुळे घडून येत असतं याची फारशी कल्पना लोकांना नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात.

एक मात्र नक्की, ते म्हणजे, मासिक पाळीत रक्तस्त्राव कमी झाल्यामुळे वजन वाढत नाही तर वजन प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मासिक पाळी उशिरा येणं, पाळीत रक्तस्त्राव कमी होत असतो. या समस्येसाठी वजन कमी करणं हा जालीम उपाय आहे. वाढलेल्या वजनाच्या किमान ५ ते १० टक्के जरी कमी करता आलं तरी मासिक पाळी गोळ्या औषधाशिवाय देखील नियमित होऊ शकते.

(डॉ. किशोर अतनूरकर हे स्त्रीरोगतज्ञ आहेत)

atnurkarkishore@gmail.com