अनेक महिला दम लागणे, थकवा येणे यांसारख्या लक्षणांकडे ताणतणाव, वाढते वय किंवा दैनंदिन कामांमुळे येणारा थकवा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, हृदयाच्या झडपांच्या आजाराचे (व्हॉल्व्ह डिसीज) निदान उशिरा होते आणि हा आजार हळूहळू वाढत राहतो. त्यामुळे महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हृदयातील झडपा रक्ताचा प्रवाह योग्य दिशेने ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. जेव्हा यांपैकी एक किंवा अधिक झडपा व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा त्याला हृदयाच्या झडपांचा आजार (Heart Valve Disease) असे म्हणतात. काही वेळा झडप अरुंद होणे (व्हॉल्व्ह स्टेनोसिस) हेदेखील या आजाराचा एक भाग असतो.

या आजारामागे वाढते वय, कौटुंबिक इतिहास, उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॅाल, हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे, संधिवातजन्य आजार (र्‍ह्युमॅटिक डिसीज), एंडोकार्डायटिस तसेच स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) विकार यांसारखे घटक कारणीभूत असू शकतात.

पुरुष आणि महिला या दोघांनाही हा आजार होऊ शकतो. मात्र, महिलांमध्ये लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. हृदयाच्या झडपांच्या आजारामुळे महिलांना सतत थकवा जाणवणे, दम लागणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे, पायांमध्ये सूज येणे किंवा दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. दुर्दैवाने अनेक महिला ही लक्षणं तणाव, रजोनिवृत्ती (मेनोपॉज), अपुरी झोप, वाढते वय किंवा घर आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांमुळे होत असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

अनेक महिला कुटुंब आणि घरगुती जबाबदाऱ्यांना प्राधान्य देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वेळीच तपासणी न केल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि पुढील उपचार अधिक गुंतागुंतीचे ठरू शकतात.
वेळीच उपचार न घेतल्यास हृदयाच्या झडपांसंबंधी गंभीर विकारांमुळे हृदय निकामी होणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होणे तसेच स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • सतत थकवा किंवा अशक्तपणा
  • चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
  • हृदयाची धडधड वाढणे
  • घोटे व पायांमध्ये सूज येणे
  • छातीत वेदना, दडपण किंवा अस्वस्थता जाणवणे
  • व्यायाम किंवा दैनंदिन कामे करण्यास अडचण येणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

महिलांनी रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॅालची नियमित तपासणी करून ती नियंत्रणात ठेवावी. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. योग्य वजन राखण्यासाठी नियमित व्यायाम करावा आणि फळे, भाज्या व तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा.

हृदयाच्या झडपांच्या आजाराबाबत जागरूकता आणि वेळीच उपचार हे महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.