महिलांचे मानसिक आरोग्य हा आपल्याकडे कायमच दुर्लक्षित विषय राहिलेला आहे. मानसिक आरोग्य एका रात्रीत चांगले किंवा वाईट होत नाही. कित्येत छोट्या छोट्या सवयींमुळे आपली मानसिक स्थिती तयार होत असते. तुम्ही किती वाजता आणि कसं झोपता, झोपताना मोबाईलवर काय बघता, सकाळी उठण्याची तुमची सवय काय आहे ? उठल्याउठल्या फोन बघता का? फोन कसा आणि किती वापरता ते अगदी स्वत:चं अंथरूण-पांघरूण नीट आवरून ठेवता का? इथपर्यंत अनेक गोष्टींचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. या सवयी चांगल्या असतील तर त्या तुमच्यावर सकारात्मक परिणाम करतात. या सवयी नकारात्मक असतील तर त्याचा नकारात्मकच परिणाम होतो. या सवयींचा आपल्या आयुष्यावर काय दीर्घकालीन परिणाम होणार आहे याबद्दल आपणच अनेकदा अनभिज्ञ असतो. कामाचे डोंगर उपसणाऱ्या, घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांसाठी तर हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या छोट्या सवयींबद्दल नक्की विचार करा.

उठल्याबरोबर डूम स्क्रोलिंग (Doom Scrolling)

हल्ली अनेकांना सकाळी उठल्याबरोबर मोबाइल बघण्याची सवय लागली आहे. सकाळी उठल्याबरोबर मोबाल बघणे हे मानसिक अस्वस्थतेला आमंत्रण देते. खरं तर दिवसाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असते आणि भरपूर उर्जा असते. त्यावेळेस जे तुम्ही बघाल किंवा विचार कराल त्याचा मनावर परिणाम होतो. सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्ट्स पाहिल्यानंतर नकळत तुलना सुरू होते आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो, काहीवेळेस भावनांवर नियंत्रण राहत येत नाही. सकाळी सकाळीच चिडचिड सुरू होते, निराश वाटू शकतं. याउलट सकाळचा काही वेळ जर तुम्ही शांतपणे घालवलात तर तुमचं मन अधिक सजग राहतं. भावनांवर नियंत्रण राहतं, लक्ष विचलित होत नाही असं तज्ज्ञ सांगतात.

उठल्याबरोबर अंथरूण पांघरूण न आवरणं

सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचं अंथरूण-पांघरूण आवरून ठेवत नसाल तर ताबडतोब ही सवय बदला. हा सकाळचा किंचितसा आळशीपणा महागात पडू शकतो. उठल्यावर अंथरुण पांघरूण अस्ताव्यस्त ठेवणं ही कदाचित छोटीशी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण त्यावरूनच दिवसाची सुरुवात कशी होणार आहे ठरू शकतं. यामागे अगदी साधं कारण आहे. दिवसाची सुरुवातच जर अव्यवस्थितपणे झाली तर मन अस्वस्थ राहू शकतं. छोटी छोटी कामं अपूर्ण ठेवली तर त्यामुळे गोंधळ उडतो. ही कामं एकत्र समोर दिसली तर त्यामुळे ताणही वाढू शकतो. जर उठल्यावर फक्त एक ते दोन मिनिटे देऊन तुम्ही पांघरुणाची व्यवस्थित घडी घालून ठेवली तर पसारा कमी दिसत असल्याने मनाला बरं वाटतं.

योग्य आहार न घेणं

भारतीय महिलांबाबत तर ही सर्वसाधारण गोष्ट आहे. घरच्यांना पोटभर, त्यांच्या आवडीचं खायला घालून झाल्यावर उरलेलं किंवा शिळं खाणं, वेळेवर न खाणं, व्यवस्थित बसून न खाता कामं करत करत किंवा उभ्यानं पटकन खाणं अशा असंख्य गोष्टी आपणही करत असतोच. पण वेळेवर न खाणं, जेवण टाळणं, किंवा सतत जंक फूड खाणं याचा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही भरपूर परिणाम होतो. बराच काळ उपाशी राहिल्यानं, चुकीचा आहार घेतल्यानं, पोटभर न खाल्ल्यानं पित्त वाढतं, उर्जा कमी होते, रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होतो. त्याशिवाय चिडचिड वाढते, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे सगळं टाळायचं असेल तर प्रत्येक महिलेनं वेळेवर आणि पौष्टिक आहार घेणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे.

गरजेपेक्षा जास्त वेळ झोपणं

थकवा येतो या नावाखाली काही महिला, विशेषत: घरी असणाऱ्या महिला खूप वेळ झोपतात. जशी अपुरी झोप झाल्यानं त्रास होतो तसेच गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यानंही आरोग्यावर परिणाम होतो. शरीराला आवश्यक असलेल्या झोपेपेक्षा जास्त झोप घेतल्यास सुस्ती आणि उदासीनता जाणवू शकते. दिनक्रमावर परिणाम होतो. दिनक्रम विस्कटला तर शरीरामध्ये हार्मोन्सचे संतुलन राखणं अवघड होतं. त्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते. अति झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळण्याऐवजी गुंगी येते. याचा परिणाम कार्यक्षमतेवरही होऊ शकतो. नियमित आणि योग्य तसेच ठरावीक काळाची पुरेशी झोप आपल्यावर सकारात्मक परिणाम करते. म्हणूनच प्रत्येक महिलेसाठी पुरेशी आणि शांत झोप आवश्यक आहे.

स्वत:बद्दल नकारात्मक बोलणं

बहुतेक महिला ‘मला कसं काही जमत नाही, कळत नाही’, असं सतत बोलत राहतात. तुम्ही जर स्वत:बद्दल सतत नकारात्मक बोलत राहिलात तर तुमचं मन त्यावर हळूहळू विश्वास ठेवायला लागतं. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचा तुमच्या मूडवरही परिणाम होतो. तुम्ही तुमच्याबद्दल कसं बोलत आहात, कसा विचार करत आहात यावरून तुमची मानसिक स्थिती तयार होते. विचार सकारात्मक असतील तर मूडही आनंदी, उत्साही होतो. नकारात्मक विचार असेल तर तुमचा मूडही खराब होतो, चिडचिड होत राहते. रोज कृतज्ञता जर्नल लिहीणे हा त्यावर एक अगदी साधा उपाय आहे. यामध्ये तुम्हाला मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल किंवा तुम्हाला ज्याबद्दल कृतज्ञ वाटत आहे अशा पाच गोष्टी दररोज लिहीत राहा. यामुळे तुमचा स्वत:शी संवाद वाढेल आणि स्वभावातली नकारात्मकता जाऊन समतोल साधला जाईल. यामुळे फक्त आत्मविश्वासच नाही एकंदर तुमच्या व्यक्तिमत्त्वातच चांगला फरक पडू शकतो. स्वत:बद्दल कौतुक करणं, चांगलं बोलणं हा तुमच्या रोजच्या सवयीचा भाग करायला विसरू नका.

थोडक्यात, आयुष्यात आलेल्या मोठ्या घटनांमुळेच मानसिक आरोग्य घडते किंवा बिघडतं असं नाही. तर तुमच्या दररोजच्या सवयी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुमच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या सवयी, सकाळी दिवसाची सुरुवात कशी करता आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वत:कडे कसं बघता यामुळे हळूहळू तुमची भावनिक स्थिती तयार होते. या सवयी कदाचित छोट्या आणि अगदीच निरुपद्रवी आहेत असं वाटू शकतं, पण त्यामुळेच तुमचं मानसिक आरोग्य चांगलं घडू शकतं किंवा बिघडू शकतं.