भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
स्त्रियांनी मनस्वास्थ्य जपण्यासाठी स्वतःची काळजी, भावनिक आधार, व्यायाम, योग्य झोप, संतुलित आहार आणि ताण व्यवस्थापन यांना प्राधान्य देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक फरकाबरोबरच मानसिक घडणही वेगळी असते. दोघांचे मेंदू वेगळे घडवले आहेत, त्यामुळे मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्यावर दोघं वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. महिला आणि पुरुषांचे मानसिक त्रास आणि मानसिक आजारही वेगळे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानसिक आरोग्य म्हणजे अशी अवस्था, व्यक्ती आपली क्षमता ओळखते, जीवनातील सामान्य ताणतणावांचा सामना करू शकते, फलदायी कार्य करते आणि समाजासाठी योगदान देते. यात भावनिक स्थिरता, सकारात्मक दृष्टिकोन आणि इतरांशी चांगले नातेसंबंध टिकवणे यांचा समावेश होतो

महिलांचे मानसिक आरोग्य का बिघडते किंवा महिलांमध्ये पुरुषांपेक्षा मानसिक अनारोग्य का निर्माण होते; आणि सध्याच्या काळात मानसिक आरोग्याच्या समस्या जास्त प्रमाणात का दिसून येतात याची अनेक जैविक, जनुकीय, सामाजिक कारणे आहेत. महिलेच्या शरीरात संप्रेरकांचा (हार्मोनल) चढ-उतार सतत चालू असतो. स्त्रीला वयात येताना, प्रसूतीनंतर आणि रजोनिवृत्तीपूर्वी इस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी कमी होणे हे अनेक मानसिक आजारांना कारणीभूत ठरू शकते.

प्रत्येक टप्प्यावर संप्रेरक कमी-जास्त होणे यावर तिचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून आहे. इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्त्रीच्या शरीरात खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते कसे? इस्ट्रोजेनची वाढलेली पातळी मूड ठीक ठेवण्यापासून मेंदूची भावना नियंत्रण करणाऱ्या केंद्रावरसुद्धा इस्ट्रोजेन संप्रेरकाचा खोलवर प्रभाव जाणवतो. इस्ट्रोजेनची पातळी जास्त असते तेव्हा स्त्री आनंदी, उत्साही आणि प्रफुल्ल असते. तीच पातळी घटली की तिला निराश वाटते. सामाजिक कारण- फार पूर्वीपासून महिला काही कारणानिमित्त कार्यक्रमात एकत्र यायच्या.

शेजारणी एकत्र येऊन शिळोप्याच्या गप्पा मारायच्या, बोलणे चालणे होई, सुख दु:खाच्या गोष्टींची देवाणघेवाण होत असे. बोलून अनेक प्रश्न सुटत. संवाद होऊन भावनांचे निराकरण, निचरा होत असे. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आल्यापासून लोकांचे गप्पा मारणे बंद झाले. ओठाने बोलणे बंद झाले, बोटाने बोलणे सुरू झाले. मोबाईल हातात आल्यावर कुणाला एक दुसर्‍याकडे जायचे / यायचे नसते. मोबाईलवर शुभेच्छांपासून श्रध्दांजलीपर्यंत सगळी कामे घरी बसल्या होतात. कुणाकडे जायला/ यायला नको. त्यामुळे घरोघरी यंत्राला बांधलेले एकलकोंडी बेटं तयार होत आहेत. संवाद हरवत चालला, आपल्या भावनांचे निराकरण करणार कसे.

मनातील भावना, कल्पना, योजना बोलून, संवाद साधून मोकळ्या न झाल्याने सर्व मनात दडपून, दाबून, साचून त्याचे रूपांतर मानसिक आरोग्यावर परिणामात होऊ शकते. हजारो वर्षांच्या मानसिकतेने, सामाजिक अपेक्षेने, परंपरेनुसार, स्त्रियांवर पगडा तयार होऊन घर सांभाळण्याची जबाबदारी स्त्रीची. आर्थिक चणचण, आर्थिक आघाडी टिकवून ठेवण्यासाठी दोघांनी कमाई करणे गरजेचे झाले. नवनवीन गरजा भागवण्यासाठी नव्या युगाच्या गरजेनुसार आर्थिक कमाई करण्याची जबाबदारीसुद्धा तिच्यावर पडली. त्यात दु:खाचे प्रसंग, सामाजिक अवहेलना, अत्याचार सहन करत, सतत सर्व आघाडीवर स्वत:ला सिध्द करावे लागल्याचे गंभीर परिणाम दिसून येतात, सर्व जबाबदार्‍या एकटीने पेलताना त्याची परिणाम नैराश्य, चिंता यात होऊ शकतो.

मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या विचार, भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारी स्थिती. हे मेंदूच्या कार्यामध्ये होणारे बदल आहेत, ज्यामुळे दैनंदिन जीवन, नातेसंबंध आणि कामावर परिणाम होतो. हे आजार नैराश्य, चिंता किंवा स्किझोफ्रेनियासारखे २०० हून अधिक प्रकारचे असू शकतात, ज्यासाठी योग्य वैद्यकीय उपचार आणि थेरपी आवश्यक असते.

मानसिक आजाराची मुख्य लक्षणे :

वर्तणुकीत बदल : सतत चिडचिड होणे, कामात रस न वाटणे, सामाजिक संपर्क कमी करणे. भावनिक बदल : तीव्र नैराश्य, भीती, चिंता किंवा नाहक अपराधी भावना निर्माण होणे. विचार करण्याच्या पद्धतीत बदल : नकारात्मक विचार, भ्रम निर्माण होणे.

शारीरिक बदल : झोप न येणे, भूक मंदावणे किंवा अति खाणे.

भारतीय महिलांमध्ये मानसिक विकारांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आणि ताण-तणाव यांसारखे सामान्य मानसिक विकार समाविष्ट आहेत. महिलांचे नैराश्याचे प्रमाण (३.९%) पुरुषांच्या (२.२%) तुलनेत जास्त आहे.

भारतीय महिलांमधील मानसिक विकार

सामान्य मानसिक विकार : नैराश्य (मुख्य नैराश्य, प्रसुतिपूर्व नैराश्य), चिंता (सामान्य चिंता, फोबिया) आणि शारीरिक लक्षणे यांचा समावेश आहे.

गंभीर मानसिक विकार : स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर- जे बहुतेकदा पुरुषांच्या वेगवेगळ्या वयांत उद्भवतात.

वृद्धापकाळातील मानसिक आरोग्य समस्या : नैराश्य, स्मृति भ्रंश आणि मेंदू सिंड्रोमचेप्रमाण जास्त आहे.

विशिष्ट जोखीम-आधारित विकार : घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक-आर्थिक ओझ्यांमुळे होणारा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर.

महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण ४१.९% पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. महिलांमध्ये मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर (MDD) (१०-२५%) प्रामुख्याने आढळणारा आजार पुरुषांपेक्षा (५-१२%) दोन-तीन पट अधिक आहे. चिंता विकारांचे प्रमाण ४.४२% आणि मूड विकारांचे प्रमाण १.७९% आहे. सामान्य मानसिक आजार ५.८३% आहेत. महिलांमध्ये वयानुसार नैराश्याचे प्रमाण वाढत जाते, ४५ वर्षांनंतर ते शि‍गेला पोहोचते. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये, कमी शिक्षण असलेल्या, आर्थिक स्थिती कमकुवत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. भारतातील १६% ते ५०% महिलांनी आयुष्यभर हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे हे मानसिक आरोग्य समस्यांसाठी प्रमुख कारण आहे. भारतातील महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. बालविवाह, अत्याचाराचे महत्त्वाचे धोके आहेत.

नैराश्य म्हणजे काय?

नैराश्य (डिप्रेशन) म्हणजे केवळ दुःख, खिन्नता नसून एक वैद्यकीय स्थिती ज्यात व्यक्तीला दीर्घकाळ उदास, निराश, उर्जा कमी होणे, झोपेचा त्रास, भूक न लागणे किंवा जास्त खाणे अशी लक्षणे दिसतात.

कारणे :

मेंदूमधील रासायनिक द्रव्ये (Neurotransmitters)- जसे सिरोटोनीन, डोपामाईन यांचा असमतोल निर्माण होतो. काहीवेळा आनुवंशिक घटक कारणीभूत ठरतात. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलामुळे, सामाजिक व कौटुंबिक ताण.

उपचार :

नैराश्यासाठी प्रामुख्याने Selective Serotonin Reuptake Inhibitors (SSRIs) आणि Serotonin–Norepinephrine Reuptake Inhibitors (SNRIs) यांसारखी औषधे वापरली जातात. ही औषधे मेंदूमधील सिरोटोनिनचे प्रमाण वाढवतात. सिरोटोनिन आनंदी परिस्थितीमध्ये स्रवणारे हार्मोन आहे. त्याचे परिणाम दिसण्यासाठी २–४ आठवडे लागू शकतात. यासाठी योग्य डोस निवडणे फार महत्त्वाचे असते.

दुष्परिणाम :

मळमळ होणे, वजन वाढणे, लैंगिक इच्छा कमी होणे किंवा झोपेचे विकार होतात.

चिंता (विकार) : चिंता ही सामान्य भावना असली तरी ती अति प्रमाणात आणि दीर्घकाळ टिकल्यास विकार ठरते.

लक्षणे :

सतत काळजी वाटणे, धडधड वाढणे, घाम येणे, हातपाय थरथरणे.

औषधोपचार :

चिंतेचे उपचारासाठी काही वेळा Benzodiazepines वापरली जातात. ही औषधे मेंदूतील GABA नावाच्या रसायनाची क्रिया वाढवतात. त्यामुळे शांत वाटते आणि झोप येते. जलद परिणाम देतात, पण दीर्घकाळ वापर धोका दायक असू शकतो.

दुष्परिणाम :

गुंगी येणे, सवय लागणे, स्मरणशक्ती कमी होणे.

महिलांमधील औषधांचे दुष्परिणाम महिलांच्या शरीररचनेत आणि हार्मोनल चक्रात बदल होत असल्याने औषधांचा परिणाम वेगळा दिसू शकतो. गर्भधारणेदरम्यान काही antidepressants सुरक्षित नसतात. मासिक पाळी व रजोनिवृत्ती काळात हार्मोनल बदलामुळे औषधांचा परिणाम बदलू शकतो. महिलांमध्ये औषधांचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात दिसतात.

आरोग्य शास्त्राचा दृष्टीकोन:

औषध देताना वजन, वय, गर्भधारणा स्थिती विचारात घेतली जाते. नियमित फॉलोअप आवश्यक असतो.

झोपेच्या गोळ्या- सवय की आवश्यकता?

झोप न लागणे (Insomnia) ही आजची मोठी समस्या आहे. अनेक जण स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेतात.

झोपेच्या गोळ्यांचे प्रकार:

Benzodiazepines

Non-benzodiazepine hypnotics

Melatonin supplements

या औषधांचा मेंदूवर शांत करणारा प्रभाव असतो. थोड्या कालावधीसाठी वापर सुरक्षित असतो. दीर्घकाळ वापरल्यास सवय लागू शकते.

धोके :

डोस वाढवण्याची गरज भासणे. अचानक बंद केल्यास झोप अजून कमी होणे. मानसिक व शारीरिक अवलंबित्व.

औषधांशिवाय उपचार

मानसिक आरोग्य उपचारात औषधांबरोबरच समुपदेशन आणि मानसोपचार (Counseling) महत्त्वाचे आहे.

उपाय :

आकलन वागणूक (Cognitive Behaviour) थेरपी, नियमित व्यायाम, ध्यान व प्राणायाम, संतुलित आहार हवा.

औषधनिर्माणशास्त्र सांगते की औषधे मेंदूतील रसायनांचे संतुलन सुधारतात, तर मानसशास्त्र सांगते की विचारसरणी व वर्तन बदलल्यास दीर्घकालीन परिणाम चांगले होतात.

समाजामध्ये काही गैरसमज दिसून येतात- जसे की “डिप्रेशन म्हणजे कमकुवतपणा” चुकीची समजूत आहे. “झोपेच्या गोळ्या घेतल्यास काही होत नाही” हे चुकीचे आहे आणि “औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात” असे प्रत्येकवेळी होत नाही. योग्य निदान व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचा वापर सुरक्षित ठरतो. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. नैराश्य, चिंता आणि झोपेचे विकार यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत; मात्र त्यांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. महिलांमध्ये विशेष काळजी आवश्यक असते. झोपेच्या गोळ्या आवश्यकता म्हणून वापराव्या, सवय म्हणून नव्हे.

औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य शास्त्र दोन्हींचा समतोल दृष्टिकोन ठेवूनच मानसिक आरोग्य सुधारता येते. योग्य माहिती, जागरूकता आणि समुपदेशन यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात.

स्त्रियांनी मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही मूलभूत गोष्टी सातत्याने पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

स्वतःसाठी वेळ देणे :

दररोज थोडा वेळ स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी ठेवणे आवश्यक आहे. वाचन, संगीत ऐकणे, चालणे, योग किंवा ध्यान यामुळे मन शांत राहते आणि ताण कमी होतो.

भावनांची मोकळेपणाने अभिव्यक्ती :

मनातले दु:ख, राग, ताण किंवा चिंता विश्वासू व्यक्तीशी बोलणे महत्त्वाचे आहे. भावना दाबून ठेवण्यामुळे चिंता किंवा नैराश्य वाढू शकते.

नियमित व्यायाम :

दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योग, प्राणायाम किंवा व्यायाम केल्याने शरीरात एंडॉर्फिन (feel-good hormones) वाढतात. त्यामुळे मन प्रसन्न राहते.

पुरेशी आणि दर्जेदार झोप :

७-८ तासांची झोप मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. झोपेचा अभाव असल्यास चिडचिड, थकवा आणि ताण वाढू शकतो.

संतुलित आहार :

आहारात फळे, भाज्या, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स यांचा समावेश असावा. योग्य पोषणामुळे मेंदूचे कार्य आणि भावनिक संतुलन सुधारते.

ताण व्यवस्थापन (Stress management) :

कामाचे नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणे आणि ‘नाही’ म्हणण्याची सवय लावणे हेही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

सोशल मीडिया आणि डिजिटल वापर मर्यादित ठेवणे :

अतिरिक्त मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे तुलना, असुरक्षितता आणि मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे डिजिटल ब्रेक घेणे उपयुक्त ठरते.

आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे.

जर दीर्घकाळ उदास, चिंता, झोपेच्या तक्रारी किंवा भावनिक अस्थिरता जाणवत असेल तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी उपचार आणि औषधे घेतल्यास स्थिती सुधारू शकते.

थोडक्यात, स्त्रियांनी मनस्वास्थ्य जपण्यासाठी स्वतःची काळजी, भावनिक आधार, व्यायाम, योग्य झोप, संतुलित आहार आणि ताण व्यवस्थापन यांना प्राधान्य देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. शेवटी, मनाची काळजी घेण्याची सुरुवात तिच्याच हातात असते; त्या दिशेने आज केलेली सुरुवात उद्याच्या निरोगी आणि आनंदी आयुष्याचा पाया ठरू शकते.

(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र द्वीपदवीधर आहेत.)

phadkebhagyashri@gmail.com