जेव्हा सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करीत होते तेव्हा मध्य प्रदेशातील मोरेना येथील १९ वर्षांची नंदिनी अग्रवाल मात्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 'सर्वांत तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट (CA)' म्हणून आपले नाव कमावण्याच्या दृष्टीने व्यग्र होती. अत्यंत हुशार आणि ठरविलेले ध्येय चिकाटीने गाठणाऱ्या नंदिनीचे हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. नंदिनी अग्रवाल हिची शाळेमध्ये असताना अत्यंत बुद्धिमान आणि मेहनती विद्यार्थिनी म्हणून ख्याती होती. तिच्यातील या खास गुणांमुळेच शाळेने नंदिनीला काही वर्ग / इयत्तांमधून सूटदेखील देण्यात आली होती. त्यामुळे नंदिनीने इतरांपेक्षा काही वर्षे आधीच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नंदिनीने दहावीची परीक्षा आणि १५ व्या वर्षी बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिली होती. एकदा शाळेला भेट देण्यास आलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारकामुळे तिला प्रेरणा मिळाली. मग आपणही आयुष्यात अशीच कोणती तरी मोठी कामगिरी करावी हे तिने मनाशी पक्के केले. या विचारांमधूनच पुढे नंदिनीने आपण सर्वांत तरुण 'सीए' बनायचे, असे ध्येय ठरवले. हेही वाचा : मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास…. मात्र, नंदिनीचे लहान वय तिच्यासाठी शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) मिळविण्यामध्ये अडथळा ठरत होते. १६ वर्षांच्या कोवळ्या मुलीला सुरुवातीला कोणीही शिकाऊ व्यक्ती म्हणून कामावर ठेवण्यास तयार नव्हते. परंतु, हुशार असलेल्या इतर मुलांसाठी ही धैर्य खच्चीकरण करणारी बाब असली तरी नंदिनी अशा गोष्टींमुळे हार मानून आपले स्वप्न अर्धवट सोडणाऱ्यांमधील मुळीच नव्हती. २०२१ मध्ये १९ वर्षांच्या नंदिनी अग्रवालने तिचे ध्येय गाठले. तिने CA च्या अंतिम परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला होता. तिने ८०० पैकी एकूण ६१४ गुण (७६.७५ टक्के) मिळवले. त्यामुळे नंदिनी सर्वांत तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट ठरण्याचा विक्रम केला आणि याच विक्रमाची नोंद गिनीज बुकातदेखील करण्यात आली. या संपूर्ण प्रवासात नंदिनीच्या भावाचा महत्त्वाचा वाटा होता. कारण- नंदिनीबरोबर तिच्या भावानेदेखील CA परीक्षेची तयारी केली होती. आपल्या बहिणीसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत हे त्याला माहीत होते. त्यामुळे नंदिनीला त्याने योग्य ते मार्गदर्शन केले. या सीए परीक्षेमध्ये नंदिनीला पहिला क्रमांक मिळाला आणि तिच्या मोठ्या भावाने १८ वे स्थान मिळविले असल्याची माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळाली.