scorecardresearch

लग्नानंतर वर्षभरातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर “तूच पांढऱ्या पायाची” म्हणणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती की…

नवऱ्याच्या निधनानंतर जेव्हा लोक हिणवतात तेव्हा…

womens story maharashtra
नवऱ्याच्या निधनानंतर जेव्हा लोक हिणवतात तेव्हा…

गेले कित्येक महिने एका कोपऱ्यात शांत बसले की, तो दिवस आठवतो आणि डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. २०२१च्या मार्चला मी व सुशील लग्नबंधनात अडकलो. आम्ही दोघांनी आमच्या लग्नाचं जसं स्वप्न पाहिलं होतं अगदी तसंच थाटामाटात लग्न केलं. राजा-राणीचा संसार होता आमचा. सासू-सासरे आणि आम्ही दोघं… आम्हा दोघांनाही उत्तम पगाराची नोकरी. आम्ही काय काय स्वप्न पाहिली होती. पण सगळ्याचीच माती झाली. हो, मातीच झाली. होत्याचं नव्हतं झालं आणि मी आयुष्यभरासाठी एकटी पडले.

एक दिवस असा आली की, “सोनल मी निघतो गं… रात्री लवकर येईन आपण बाहेर जेवायला जाऊ” म्हणत त्याने (सुशील) ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पाऊल टाकलं. त्यादिवशी तो जरा गडबडीतच होता. ऑफिसमध्ये मीटिंग होती म्हणे… मी स्वयंपाक घरातून बाहेर येईपर्यंत सुशीलने त्याच्या बाईकला किक् मारली होती. नंतर मीही फारसा विचार न करता ऑफिसला निघायची तयारी करू लागले. ही आमच्या दोघांची शेवटची भेट ठरेल असा विचार स्वप्नातही मी केला नाही.

आई-बाबांना (सासू-सासरे) चहा व नाश्ता दिला, कामं आवरली आणि मीही ऑफिसला निघाले. इमारती बाहेरील बसस्टॉप जवळ पोहोचले. इतक्यात माझा फोन वाजला. “सोनल आंबेकर बोलत आहात का?” असं समोरच्या व्यक्तीने मला विचारलं. मी “हो” म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने जे काही सांगितलं त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. “तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. तुम्हाला लगेचच रुग्णालयामध्ये यावं लागेल” असं मला फोनवरच सांगण्यात आलं. मला तिथेच घाम फुटला. घाईघाईत मी माझ्या भावाला फोन केला आणि आम्ही रुग्णालयामध्ये पोहोचलो. पण जेव्हा मी रुग्णालयामध्ये गेली तेव्हा माझं जगच संपलं होतं. सुशील मला सोडून गेला होता.

आणखी वाचा – वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…

हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस. काही महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना. पण माझ्या या कठीण काळामध्ये मी जे काही दिवस पाहिलं ते कोणाच्याच वाट्याला येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना. आभाळच फाटलं असताना “तूच पांढऱ्या पायाची” हे तीन शब्द माझ्या मनावर कोरले गेले. या काळात कुटुंबातील मंडळी माझ्या बरोबर होतीच पण त्रास दिला तो त्या सुशिक्षित अडाणी लोकांनी… सुशिक्षित अडाणी मी मुद्दामच म्हणतेय. कारण मला हिणवणारे, डिवचणारे बरेच लोक हे उच्चशिक्षितच होते.

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

बरं सुशील जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा त्याचं आणि तुझं काही भांडण झालं होतं का? नक्कीच त्याला कोणतं तरी टेन्शन असणार? त्याचा ऑफिसमध्ये काही वाद झाला होता का? कोणतंच टेन्शन नव्हतं मग असा कसा अपघात झाला? स्वतःच्याच विचारांमध्ये तो गाडी चालवत असणार, इतके वर्ष अगदी उत्तम गाडी चालवणाऱ्या मुलाचा अपघात झालाच कसा? असे कित्येक प्रश्न माझं सांत्वन करायला येणाऱ्या लोकांनी विचारले. त्याक्षणी मी अजूनच गळून पडायचे. माझं सर्वस्व मी गमावलं पण लोकांना दोष माझ्यामध्ये दिसत होते. दिवसेंदिवस अशांना तोंड देऊन मी पुरती खचले.

सुशील जाऊन बारा दिवस झाले होते आणि माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला. कारण या बारा दिवसांमध्ये मीच कशी “पांढऱ्या पायाची” असं लोकांनी जवळजवळ मला पटवून दिलं होतं. “लग्न झाल्यानंतरच असं कसं झालं?”, “घरात आलेल्या सूनेचा पायगुणच बरोबर नसणार”, “पांढऱ्या पायाची असणार ही” हे मी कित्येक लोक दबक्या आवाजात बोलत असताना ऐकलं होतं. आईला मी एक दिवस म्हटलं की, “आई मला जगायचीच इच्छा नाही. नवरा गेल्याचा दोष मलाच देतात लोक. माझा जगूनच उपयोग काय?”. माझं हे वाक्य ऐकून आईच्या काळजात चर्रर्रर्रर्र… झालं.

आईने माझ्या वडिलांसह दोन भावंडांना मी जे काही बोलले ते सांगितलं. सासू-सासऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. संपूर्ण कुटुंबाने मला यातून बाहेर काढण्यासाठी एकच निश्चय केला. सांत्वनासाठी घरी येणाऱ्या लोकांना मला भेटण्यासाठी सक्त मनाई त्यांनी केली. अर्थात यातही आमचंच कुटुंब कसं उद्धट? याचे दाखले लोकांनी दिलेच. पण असो… माझ्या कुटुंबाने घेतलेला तो निर्णय माझ्यासाठी यशस्वी ठरला. मी लोकांच्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिले आणि कुटुंबामध्ये माझं मन रमवू लागले. माझे आई-वडील, सासू-सासरे, भावंडांनी मला आत्महत्येच्या विचारांमधून बाहेर काढत नव्याने आयुष्य जगण्यासाठी बळ दिलं.

आणखी वाचा – नवरा गमावला, वडिलांचंही निधन झालं, पण माझं पुढे कसं होणार याची चिंता तुम्हाला का?

माझं कुटुंब माझ्या पाठिशी खंबीर होतं म्हणून आज माझा जीव वाचला. असं म्हणतेय कारण, अशा प्रसंगांमध्ये लोकांनी आपल्या मनावर बिंबवलेली प्रत्येक नकारात्मक गोष्ट ही नैराश्येकडे जाण्यास आपल्याला भाग पाडते. माझं कुटुंब माझ्याबरोबर होतं म्हणून मी जगले. पण अशा कित्येक मुलींना ही हिणवारी व डिवचणारी लोकं त्रास देणार? त्यांना आत्महत्येचा विचार करण्यास प्रवृत्त करणार. नवरा गेलेल्या स्त्रीला तूच कशी वाईट आणि तुझाच कसा दोष म्हणून हिणावणाऱ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की, बोलताना जरा विचार करा. प्रसंग काही सांगून येत नाहीत. आणि हो, माझ्यासारखं कुटुंब प्रत्येक मुलीलाही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आपलीच मुलगी, आई, बहीण आहे असं समजून तिला योग्य ती वागणूक द्या. वेळीच हे सगळं थांबवा!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 12:02 IST

संबंधित बातम्या