तेवीस वर्षीय महत्त्वाकांक्षी आर्मिश असिजाने प्रचंड मेहनत करून भारतीय हवाई दलातील [IAF] सर्वात तरुण महिला अधिकारी बनून दाखवले आहे. आर्मिश असिजाने पंजाब जिल्ह्यातील पहिली फ्लाइंग ऑफिसर बनून इतिहास रचला आहे. “मी माझ्या कुटुंबामधील डिफेन्स अधिकारी बनणारी पहिलीच आहे, त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब माझी पासिंग आऊट परेड पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होते. माझ्या दोन्ही आजीदेखील [आईच्या आणि वडिलांच्या बाजूने] त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. लहानपणापासून आमच्या घरात भारतीय सैन्याबद्दल प्रचंड आदर असल्याचे मी पाहिले होते. त्यामुळे ही नोकरी इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे याची मला जाणीव झाली”, असे आर्मिशने म्हटले असल्याचे इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

आर्मिश आणि तिचे कुटुंब पंजाबच्या, फाजिल्का या सीमारेषेजवळीत भागात राहत असल्याने आर्मिशच्या या यशाचा तिच्या कुटुंबीयांना प्रचंड अभिमान आहे. डिफेन्स सेवेमध्ये भरती होणारी आर्मिश, असिजा कुटुंबातील पहिली व्यक्ती असून, तिने पुढील अनेक पिढ्यांसाठी एक मोठा पाया रचला आहे. आर्मिशने पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तिथे तिने उत्तम शैक्षणिक कामगिरी करून एकूण १५० विद्यार्थ्यांमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला आणि स्वतःसाठी IAF मधील फ्लाइंग ऑफिसर हे पद प्राप्त केले. या १५० जागांपैकी केवळ ३० जागा या महिलांसाठी राखीव असतात.

हेही वाचा : ‘बालवधू’ ते यशस्वी ‘डॉक्टर’! स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपाला कशी मिळाली कुटुंबाची साथ, पाहा…

फाजिल्कामधील पहिली IAF फ्लाईंग अधिकारी – आर्मिश असिजा

आर्मिशची पासिंग आऊट परेड पाहणे तिच्या कुटुंबीयांसाठी अतिशय सुखद आणि भावनिक क्षणांपैकी एक होते. आर्मिशचे वडील, महदीप असिजा हे इन्व्हायर्मेंटल इंजिनियर आहेत; तर आई, डॉक्टर सोनिका असिजा, हिसार येथील गुरु जंबेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाची प्रमुख आहे.

आर्मिश केवळ अभ्यासात नव्हे, तर खेळातदेखील उत्तम आहे. लष्करी वातावरणामुळे तिच्या बास्केटबॉल आणि रोलर स्केटिंगमधील सहभागामुळे, बुद्धीसह शारीरिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम होते. आर्मिशला तिचे हे यश तिच्या राहत्या ठिकाणापासून म्हणजेच फाजिल्कापासून ते दिल्लीपर्यंत कुठूनही मिळवता येऊ शकते असे तिचे मानणे आहे. आर्मिशला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी मात्र प्रचंड पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले असेही समजते.

हेही वाचा : Sara Milliken : “सौंदर्य हे प्रत्येक आकारात, रंग-रूपात…” प्लस साईज मॉडेलचे ट्रोलर्सना चोख उत्तर!

डॉक्टर आर्मिशचा हा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे, जे आपल्या देशातील अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. “आत्ताच्या घडीला स्त्रियांसाठी हा समाज अतिशय सकारात्मक आहे. याचकाळात आपल्याला १०० टक्के देऊन, आपले स्थान निर्माण करण्याची गरज आहे”, असे आर्मिश म्हणत असल्याचे इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.