सलामीची जोडी जमली, इतकी व्यवस्थित जमली की लॉर्ड्सच्या फलकावर सव्वाशे धावा लागून गेल्या. दोघे फलंदाज आपल्यावर खूष व भागीदारीवर संतुष्ट दिसत होते. पण ती जोडी अशीच उदंड खेळत राहावी असं प्रकर्षांनं कुणाला वाटत होतं : फलंदाजी करणाऱ्या संघाला की, त्या फलंदाजाच्या जोडीला शतायुषी होण्याचं, निदानपक्षी ६० षटकं संपूर्ण खेळत राहण्याचं अभीष्टचिंतन करणाऱ्या गोलंदाजांना अन् क्षेत्ररक्षकांना?
logo03प्रसंग १९७९मधील दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा. क्लाइव्ह लॉइडच्या विंडीजनी इंग्लंडला आव्हान दिलेले २९० धावांचे. त्यापैकी सुमारे ४५ टक्के म्हणजे १२९ धावांचे योगदान बॉयकॉट-ब्रियर्ली या बिनीच्या जोडीचे. १२९ धावा काढण्यास त्यांनी लावली होती चक्क ३८ षटके आणि बाकीच्या नऊ सहकाऱ्यांना १६० धावा ठोकण्यास ठेवली होती २२ षटके!
जेफ बॉयकॉटने धावांचा दुहेरी आकडा गाठण्यास १८ षटके घेतली, पण त्याला सांगणार- समजवू शकणार कोण? रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर व क्रॉफ्ट यांच्या कोटय़ातील षटके, शेवटच्या टप्प्यासाठी राखून, विवियन रिचर्ड्सच्या कोटय़ाची सारीच्या सारी षटके कर्णधार लॉइड संपवून टाकू शकला- ती बॉयकॉट-ब्रियर्ली जोडी ‘जमल्या’मुळे! १९७५ ते २०११ या गेल्या दहा विश्वचषक स्पर्धाच्या अंतिम लढतीतील हे विचित्र क्षण.
लॉइड-रिचर्ड्स
१९७५ व ७९ या दोन्हीही विश्वचषकांच्या अंतिम फेरीवर ठसठशीत ठसा विंडीज शतकवीरांचा. लॉइड ८५ चेंडूंत १०२, तर रिचर्ड्स १३८. पण या दोघांच्या साथीदारांचा ढंग वेगवेगळा. पहिल्या तिघांना, ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिल्मूरने गुंडाळले होते. अशा वेळी लॉइडला, थोरल्या भावाच्या भूमिकेत सांभाळले रोहन कन्हायने. त्याच्या समकालीन डावखुऱ्या गॅरी सोबर्सशी जोडी जमवायचा, तशीच छान जमवली युवा डावखुऱ्याशी. कन्हायचे ऋण, लॉइड आजही मानतो, ‘‘आम्ही दोघेही गयानाचे. परस्परांच्या खेळाशी परिचित, एक बाजू लावून धरण्यात फटकेबाज रोहनचा हातखंडा.’’
१९७९च्या अंतिम फेरीतही, ढगाळ वातावरणात विंडीजची सुरुवात खराब. फलकावर फक्त शतक, पण चार फलंदाज बाद. सांभाळून खेळण्याचा रिचर्ड्सचा वडीलकीचा सल्ला. नवा जोडीदार कॉलिस किंगला. त्यानेही मान खाली हलवत, रिचर्ड्सची आज्ञा शिरसावंद्य मानली. मग कॉलिस सुसाट सुटला : ६६ चेंडूंत ८६. त्याची धावगती १०० चेंडूंत १३१ धावांची! रात्रीच्या मेजवानीत, तरुण जोडीदाराला शाबासकीची थाप देत रिचर्ड्स म्हणाला : ‘‘मी समजत होतो की मी तुझा साथीदार आहे. पण तू मला बनवलंस प्रेक्षक!’’
विश्वचषक संयोजनात इंग्लंड आघाडीवर आणि मैदानी प्रभुत्वात तेव्हा विंडीज. (व मग कांगारू) वर्चस्व मोडून काढण्यात पुढाकार भरतखंडाचा व त्यातही अर्थातच भारताचा. १९८३ला भारत जिंकला तर मला माझे शब्द गिळावे लागतील, असे भाकित ब्रिटिश पंडितांचे. त्या भारतीय संघाचे खरे वैभव अष्टपैलू खेळाडूंच्या विपुलतेचे. स्वत: कपिल तर इम्रान-बोथम-हॅडली-माल्कम मार्शल या पाच पांडवांतला एक! पण त्याच्या दिमतीला मोहिंदर अमरनाथ, मदनलाल, स्टुअर्ट बिन्नीचे वडील रॉजर बिन्नी, रवी शास्त्री, संदीप पाटील व कीर्ती आझाद. कपिलच्या चतुरस्रतेचे दोन महान पैलू : झिम्बाब्वेविरुद्ध ५ बाद १७ नंतर १३८ चेंडूंत १७५ अन् तितकाच संस्मरणीय.
धोनी हा कोणी कपिल नव्हे. पण कपिलला लाभली चतुरस्र सहकाऱ्यांची विपुलता. तर धोनीला विनासायास मिळाली असामान्य प्रतिभेच्या वा कर्तबगार सहकाऱ्यांची कवचकुंडले. तेंडुलकर, सेहवाग व गंभीर ही पहिल्या तीन क्रमांकांवरची त्रिमूर्ती. अष्टपैलू युवराज, अन् झहीर-हरभजन ही गोलंदाजांची जोडी. धोनीचा खारीचा वाटा, निर्णायक झुंजीत. श्रीलंकेशी बहारदार नाबाद ९१.
इम्रान-रणतुंगा
भारतापाठोपाठ विश्वचषकावर नाव कोरण्यात पाकिस्तान व श्रीलंका या आशियाई देशांनी वेळ लावला नाही. १९९२ला संयुक्तपणे संयोजन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचे. पहिल्या पाच सामन्यांत त्रिवार पराभूत झालेल्या पाकला इंग्लंडने संकटात टाकले होते. मग पावसाने हात दिला. मग अंगात ताप असूनही इंझमामने न्यूझीलंडसमोर झंझावाती खेळी केली.
मेलबर्नमधील एमसीजी विशाल, प्रशस्त. विश्वचषकाआधी तीन-चार आठवडे इम्रानने आपल्या संघाला तिथे सराव करायला लावले. वसिम अक्रम व दुखापतग्रस्त वकार युनूसची जागा घेणारा आकिब जावेद, त्या मैदानात १०-१० चकरा जोरजोरात धावत, व्यायाम व क्रिकेट, रोज सहा-सहा तास चालायचे. अंतिम फेरीच्या दिवशी वर्तमानपत्रात झळकल्या बातम्या. इम्रानची वसिमला शिकवण- ‘‘नोबॉल, वाइड यांची चिंता करू नकोस, वेग तुफान ठेव.’’
अंतिम फेरीत इंग्लंडला गरज अडीचशेची. बोथमला बहुधा पंचांनी तंबूत पाठवला. अ‍ॅलन लॅम्ब- नील फेयरब्रदर किल्ला लढवत होते. इम्रानने वसिमच्या हवाली चेंडू दिला. वसिम सांगतो : ‘‘नील फेयरब्रदर व मी दोघेही लँकेशायर कौंटीकडून खेळतो. त्याला माझ्या साऱ्या क्लृप्त्या माहितीच्या आहेत. मी हल्ला चढवतो लॅम्बवर. मी त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. मग आला ख्रिस लुइस. तो अपेक्षा धरेल इनस्विंगरची, याची मला जाणीव होती. पण माझी आखणी पद्धतशीर होती. माझ्या यॉर्करवर चकित झालेला लुइस त्रिफळाचीत! सामना संपल्यात जमा!’’
कांगारूंचीही गफलत
अर्जुन रणतुंगा हा श्रीलंकेचे स्फूर्तिस्थान. जयसूर्या-कालुवितरणा यांना मधल्या फळीतून उचलून सलामीवीर बनवणे, ही त्याचीच कल्पनेची भरारी. अरविंद डिसिल्वा हा त्यांच्या यशाचा शिल्पकार. अंतिम फेरी होणार होती लाहोरला. सारे नियोजन आखीव-रेखीव ही कांगारूंची खासियत, पण तेव्हा त्यांनी सराव केला नव्हता विद्युतझोतांचा. त्याची किंमत त्यांना तेव्हा चुकवावी लागली. पण १९८७, १९९९, २००३ व २००७ मध्ये त्यांची आखणी काटेकोर होती. इंग्लंड, पाकिस्तान, भारत व श्रीलंका या नवनव्या प्रतिस्पध्र्याना त्यांनी अंतिम झुंजीत खडे चारले. आता ११वी स्पर्धा, ११वी अंतिम फेरी. तिची बहार वेगळीच असेल. कारण न्यूझीलंडमध्येही कांगारूंना टक्कर देण्याची भरपूर खुन्नस आहे!