popat(तोताराम थोडासा निराश बसलेला. विठ्ठलपंतांची भुणभुण सुरू होती मागे. तेवढय़ात चंपक ‘कदम कदम बढाये जा’ गाणं गुणगुणत हजर होतो आणि पुढे सुरू..)
चंपक : तोतारामभौ, चेहरा का असा पडलाय?
तोताराम : परवा तुम्हाला भारत-पाकिस्तान मॅचचं सांगितलं ते सगळं तंतोतंत खरं ठरलं.
चंपक : सवाल. आपण एकत्र काजूकतली फस्त केली की. आता काय झालं हिरमुसायला?
तोताराम : वेस्ट इंडिजने घात केला!
चंपक : अहो, तुम्ही सांगितलं होतं ना, की आर्यलड डेंजर आहेत एकदम. जीव तोडून खेळतात. सावध राहा.
तोताराम : ते जीव तोडून खेळले आणि यांच्यात जीवच नव्हता. नाइलाज म्हणून पाठवलंय तिकडे असं वाटलं हायलाइट्स पाहून.
चंपक : अहो चालायचंच, दोन्ही धक्केवालेच. फार मनाला लावून घेऊ नका.
तोताराम : वेस्ट इंडिजाचं काही नाही एवढं. ते फकीरपंथी आहेत. आमच्या क्रेडिबिलिटीवर डाग लागतो ना!
चंपक : झालं ते झालं. न्यूझीलंड-स्कॉटलंडचं काय?
(विठ्ठलपंत करडय़ा रंगाचं कार्ड तोतारामच्या हाती देतात.)
तोताराम : न्यूझीलंडचा दणदणीत विजय दिसतो. मॅक्क्युलम दादांना हात मोकळे करण्याची सुवर्णसंधी आहे. ‘कोरे’ एक्स्प्रेस सुसाट धावली तर धावांचा पाऊस पडेल. रॉस टेलरला फॉर्मात यायला चांगली मॅच आहे. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अ‍ॅडम मिलने किंवा मिचेल मॅक्क्लिनॅघन यांच्यामुळे व्हेटोरीला गोलंदाजीची संधी मिळायची शक्यताच कमी आहे.
चंपक : उत्तम. पहाटे हाणामारी पाहिली की ऑफिसमधल्या फायरिंगचं काही वाटत नाही.
तोताराम : म्हणजे..?
चंपक : सांगेन कधी तरी, पळतो!