विषारी वेलीवर सुंदरसे फूल फुलावे, असेच काही अफगाणिस्तानच्या बाबतीत म्हणता येईल. आतापर्यंत दहशतीमध्ये त्यांचे आयुष्य गेले असले तरी आता क्रिकेटमध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ सज्ज आहे. क्रिकेटमधील लक्षणीय कामगिरी आणि खेळाडूंच्या भावनात्मक कथा हे आतापर्यंत चर्चेला विषय ठरले असले तरी या विश्वचषकात आपली छाप पाडण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशसारख्या अनुभवी, परंतु अस्थिर संघाबरोबर त्यांचा सलामीचा सामना होणार असून विश्वचषकात विजयी सलामी देण्यासाठी ते सज्ज आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही क्रिकेटजगतामध्ये लिंबू-टिंबू संघ असले तरी या मोठय़ा स्पर्धेतील सामन्याचा निकाल त्यांचे भवितव्य ठरवणारा आहे. यापूर्वी या दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना झाला असून त्यामध्ये अफगाणिस्तानने बाजी मारली आहे.
विश्वचषकाच्या पात्रता फेरीमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने दमदार कामगिरी करीत सर्वाचेच लक्ष वेधून घेतले असून विश्वचषकात त्यांची कामगिरी कशी होते, यावर साऱ्यांची नजर असेल. नवरोझ मंगलसारखा अनुभवी फलंदाज त्यांच्याकडे आला, त्याला असघर स्टानिकझाई, समीउल्ला शेनवारी आणि कर्णधार मोहम्मद नबी यांची चांगली साथ मिळू शकते. हमीद हसनसारखा भेदक वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे असून शापूर झाद्रान व दावलत झाद्रान यांची त्याला साथ मिळेल.
बांगलादेशच्या संघाचे आतापर्यंत बरेच धक्के दिले असले तरी त्यांना विजयामध्ये आतापर्यंत सातत्य राखता आलेले नाही. शकिब अल हसनसारखा नावाजलेला अष्टपैलू त्यांच्या संघामध्ये आहे. कर्णधार मश्रफी मुर्तझाकडेही १४४ एकदिवसीय सामन्यांचा चांगला अनुभव आहे. सलामीवीर तमीम इक्बालने सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे.
दोन्ही संघांचा विचार करता अफगाणिस्तानपेक्षा बांगलादेशचे पारडे नक्कीच जड आहे, पण गेल्या काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानने एकामागून एक धक्केदिले आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना नक्कीच सोपा नसेल.
सामना क्र. : ७   अफगणिस्तान वि. बांगलादेश(अ-गट)
स्थळ : कॅनबेरा  ल्ल वेळ : सकाळी ९.०० वा. पासून

लक्षवेधी खेळाडू
नवरोझ मंगल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानच्या संघात असलेला सर्वात अनुभवी फलंदाज म्हणजे नवरोझ मंगल. आतापर्यंत मोठय़ा संघांबरोबर दमदार फलंदाजी करत मंगलने क्रिकेट जगतामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अफगाणिस्तानला जर या स्पर्धेत धक्का द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मंगलची सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची असेल.
शकिब अल हसन (बांगलादेश) : बांगलादेशचा सर्वात गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून शकिबकडे पाहिले जाते. प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो त्याचे दडपण न घेता डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने त्याने फलंदाजांना चकित केले असून मधल्या फळीत फलंदाजीला येऊन चांगली कामगिरीही केली आहे.

बोलंदाजी
जर योग्य वेळी रणनीतीनुसार आमची कामगिरी झाली तर गटातील बांगलादेश आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांना आम्ही पराभूत करू शकतो. त्याचबरोबर मोठय़ा संघांना धक्का देण्याची कुवत आमच्यामध्ये असून बाद फेरीत पोहोचण्याचे आमचे ध्येय असेल. त्यासाठी स्पर्धेची चांगली सुरुवात व्हायला हवी. बांगलादेशविरुद्धच्या सामन्याकडे आमचे लक्ष लागलेले आहे.
-अँडी मोल्स (अफगाणिस्तानचे प्रशिक्षक)

संघामध्ये चांगला समन्वय असून गुणवत्ताही भरपूर आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नसली तरी विश्वचषकाचा चांगला अभ्यास आम्ही केला आहे. संघांमध्ये चांगले फलंदाज आणि फिरकी गोलंदाज असून कोणत्याही खेळपट्टीवर आम्ही कमाल करू शकतो.
मश्रफी मुर्तझा  (बांगलादेशचा कर्णधार)

आमने सामने
सामने १ – अफगणिस्तान : १ ’ बांगलादेश : ० ’ टाय/रद्द : ०

संघ
अफगाणिस्तान : मोहम्मद नबी (कर्णधार), नवरोझ मंगल, असघर स्टानिकझाई, समीउल्ला शेनवारी, अफसर झेझाई (यष्टिरक्षक), नजीबुल्लाह झाद्रान, नासिर जमाल, मिरवेस अश्रफ, गुलबदीन नईब, हमीद हसन, शापूर झाद्रान, दावलत झाद्रान, अफताब आलम, जावेद अहमदी, उस्मान घनी.
बांगलादेश:  मश्ररफ मोर्तझा (कर्णधार), शकिब उल हसन , तमिम इक्बाल, अनामुल हक बिजॉय, मोमीनुल हक, महंमदुल्लाह रियाझ, मुश्फीकर रहीम (यष्टिरक्षक), नासिर हुसेन, ताजिउल इस्लाम, ताश्किन अहमद, अल अमीन हुसेन, सौम्य सरकार, रुबेल हसन, शब्बीर रहेमान, सनी अराफत.