सध्या चर्चा आहे ती दिल्लीतील आपच्या विजयाची आणि भाजपच्या भुग्याची.. स्विस बँकेतल्या काळ्या पैशांची आणि इंडियन एक्स्प्रेसने जाहीर केलेल्या त्या खातेदारांच्या नावांची.. सध्या चर्चा आहे ती नेमाडेंना मिळालेल्या ज्ञानपीठाची आणि त्यानिमित्ताने सुरू असलेल्या रश्दी विरुद्ध नेमाडे अर्थात इंग्रजी विरुद्ध मराठी वादाची. त्या आधी अशीच चर्चा रंगली होती एआयबी रोस्टची, त्यातल्या भाषेची आणि विनोदांची.. यात विश्वचषक क्रिकेटस्पर्धा कुठे आहे? ही स्पर्धा आता २४ तासांवर येऊन ठेपली असताना जनमानसावर छाप दिसते ती क्रिकेटेतर विषयांवर. क्रिकेट हा धर्म मानणाऱ्या या देशात अद्याप विश्वचषक दरवळू लागलेले नाही. ‘अमुक-तमुक खाओ, वर्ल्डकप जाओ’ अशा जाहिरातींचा मारा दिसत नाही की तमाम टीव्ही ब्रँडचे विश्वचषक क्रिकेटच्या काळातले ब्रँडिग झोकात होताना दिसत नाही. हे नेमके कशामुळे, याची सात कारणे
१)भारतीय क्रिकेट संघ गेले तीन महिने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळत आहे. कसोटी मालिका आणि तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील भारतीय संघाची कामगिरी खराब झाली. या भूमीवर गेल्यापासून विजयाचे दर्शन भारताला घडलेले नाही. तिरंगी एकदिवसीय मालिका चालू असताना त्यामुळेच क्रिकेटरसिकांना त्याचे फारसे सोयरेसुतक नव्हते. ‘स्कोअर काय?’ हे प्रश्न नव्हते, याचप्रमाणे आज कोण जिंकले, काय कामगिरी झाली? याबाबत कुठेही खमंग चर्चा रंगल्या नाहीत. आशावादी दृष्टीकोन बाळगल्यास अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने विजय मिळवला. परंतु ऑस्ट्रेलियातील भारताच्या कामगिरीमुळे भारतीय संघाकडून माफक अपेक्षा केल्या जात आहेत. विश्वचषकाच्या कार्यक्रमपत्रिकेकडे पाहिल्यास चांगले गुण मिळवून देणारे सोपे पेपर सोडवून भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्यात कोणतीच अडचण येणार नाही. कदाचीत उपांत्य फेरीतसुद्धा हा संघ गाठू शकेल.

२) गेल्या सहा विश्वचषक क्रिकेट स्पर्धावर सचिन तेंडुलकर नामक महाक्रिकेटवीराने अधिराज्य गाजवले. त्यामुळे २३ वर्षांनंतर हा पहिलाच विश्वचषक असेल की, ज्यात सचिन नसेल. त्याच्या बॅटचा बहर, त्याच्या खेळीच्या वेळी जाणवणारे आशा-निराशेचे मानसिक हिंदोळे नसतील.

३)गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे डागाळले आहे. हितसंबंध, राजकीय मंडळी, उद्योगपती यांच्या तालावर क्रिकेट कठपुतलीप्रमाणे डोलते आहे. सच्च्या क्रिकेटरसिकांना हे नको आहे.

४)विश्वचषकाचा गारूड क्रिकेटरसिकांमध्ये जाणवत नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण मागील विश्वचषकाची भारतात अनुभूती घेतली. २०११च्या विश्वचषकाचे सहयजमानपद भूषवणाऱ्या भारतात बहुतांशी सामनेसुद्धा झाले. याशिवाय बांगलादेश आणि श्रीलंका या आशियाई देशांमधील वातावरण क्रिकेटमय झाले होते. सामन्यांचा ‘याचि देही, याची डोळा’ चाहत्यांना आनंद लुटता आला होता. अंतिम फेरी मुंबईत झाली. वानखेडेवर भारताने विश्वचषक उंचावला. सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. उपांत्य फेरीतील चार संघांपैकी तीन संघ आशियाई होते. या सर्व गोष्टींमुळे मागच्या विश्वचषकाने जी उंची गाठली. त्यातून सावरल्यानंतर आपण तुलना करू लागलोय की आता वातावरण निर्मिती दिसत नाही.

५) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची जाहिरात कोणत्याही कंपनीला करता येत नाही. फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत पुरस्कर्त्यांनाच विश्वचषकाच्या फिव्हरचा लाभ घेता येतो.

६)आयफेल टॉवर किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्यात एक वेगळीच अनुभूती असते, ती छायाचित्र पाहण्यात नसते. ऑस्ट्रेलियात जाऊन क्रिकेट विश्वचषकाचा आनंद लुटावा, अशी अनेक क्रिकेटरसिकांची इच्छा असेल. परंतु प्रवासाच्या दृष्टीने खर्चिक राष्ट्र असल्यामुळे ते फारसे परवडणारे नाही. भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकीटे २० मिनिटांत संपली होती. यापैकी आशियाई देशांमधून अनेक जणांनी ती काढलीही होती. परंतु विमानतिकीटांचे त्या तारखांचे दर वाढल्याने अनेक क्रिकेटरसिकांची संख्या मंदावत चालल्याचे चित्र आहे. परिणामी भारतासह आशियाई देशांना ऑस्ट्रेलियातील विश्वचषक पाहण्यासाठी टीव्ही हेच माध्यम असणार आहे.

७) ‘स्टार स्पोर्ट्स’ यंदाच्या विश्वचषकाचे प्रक्षेपण जगभरात करणार आहे. तसे मागील विश्वचषकाचे प्रक्षेपणही याच कंपनीने केले. परंतु ती स्पर्धा भारतात झाली आणि आता ऑस्ट्रेलियात होत आहे. त्या मागील अर्थकारणात कमालीचा फरक पडताना आढळतो आहे. त्यामुळेच आपल्याला विश्वचषकाशी निगडित जाहिराती आणि विपणन मोठय़ा प्रमाणात दिसत नाही. उदाहरणादाखल द्यायचे झाल्यास ‘स्टार स्पोर्ट्स’ने सचिनच्या निवृत्तीची कसोटी ऐतिहासिक ठेव्याप्रमाणे साकारली. त्याचे वानखेडे स्टेडियम हे व्यासपीठ असो किंवा सचिनचे क्रिकेटरसिकांचे आभार मानणारे भाषण, हे सारेच ‘स्टार स्पोर्ट्स’चा टीआरपी वाढवणारे घटक. मात्र जॅक कॅलिसची निवृत्ती ती उंची गाठू शकली नाही.
प्रशांत केणी