सुनील गावस्कर यांच्यासारख्या व्यक्तींनी क्रिकेटबद्दल बोलायला हवं, तो अधिकार माझ्याकडे नाहीच; पण खेळताना जे काही दिसतं, ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच आहे. त्यांच्याकडे जिद्द आहे. लढाऊ वृत्ती आहे; पण खिलाडूवृत्ती किती आहे, हे पाहायला हवं. सरतेशेवटी हा खेळ आहे आणि याकडे खेळ म्हणूनच पाहायला हवं. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे जरी दोन वेगवेगळे देश असले तरी त्यांची संस्कृती जवळपास सारखीच आहे; पण क्रिकेटमध्ये जो उमदेपणा असतो ना तो कुठे तरी कमी झालेला दिसतो आताच्या घडीला. एखादा बळी घेतल्यावर मिठय़ा मारणं, आनंद साजरा करणं आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला घायाळ केलंय, हे देहबोलीतून वाटतं. हे आजचं क्रिकेट असलं तर ते त्यांचं त्यांना लखलाभ होवो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा, कारण आमच्यासाठी दोन्ही सारखेच आहेत. आमचा गेरू झालाय. आम्हाला पिवळं आणि निळं सारखंच दिसतं.
ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये फार शिस्त आहे आणि त्याचबरोबर ते फारच आक्रमक आहेत. अॅडलेडमध्ये मी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना पाहिला. अद्भुत अनुभूती होती. काय सुंदर मैदान आहे ते. आपल्याकडे जे काही आहे ते यासारखे दुरुस्ती करता येणारच नाही. या गोष्टी घडवता येतात, एखाद्या गोष्टीमध्ये बदल करून तसे होऊच शकणार नाही.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत हरले. त्यांच्या खेळात जिद्द दिसली नाही. फार उतावीळ लोक आपल्या संघात आहे. सचिनकडे जी परिपक्वता, संयम होता, तो आताच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही, कारण आता जगच बदललंय. सध्याचं क्रिकेट बदललंय. बॅट कशीही करा, उभी-आडवी करा, पण धावा करा, हे महत्त्वाचं ठरतंय. आता हे सारं जग ‘ग्लॉसी’ झालेलं आहे. एखाददिवस आताचे खेळाडू चमकतात, दोन दिवस प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे कौतुक होते. पूर्वी खेळामध्ये स्वीकारार्हता होती. जेव्हा मूळ क्रिकेट हा खेळ सुरू झाला तेव्हा त्यामध्ये प्रतिस्पध्र्याची खेळी स्वीकारली केली जायची. एखाद्याला बाद केल्यावरही ‘तू चांगला खेळलास, पण तुला बाद करणं माझं काम होतं,’ असं म्हटलं जायचं; पण आताच्या घडीला, बघ त्याला कसा बाद केला, यामध्ये एक असूया दिसते. हा खेळ नव्हे. माझ्या मते खेळभावना कुठे तरी हरवत चालली आहे. आता खेळामध्ये लढाऊ वृत्ती वाढली आहे. पूर्वीचे खेळाडू फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करून असायचे; पण आता तसं पाहायला मिळत नाही. क्रिकेटमध्ये दीर्घकाळ कारकीर्द आता कोणाची राहिलीए? सचिननंतर कोणाचीही नाही.
आर्थिकदृष्टय़ा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाचे पैसे बुडाले, कारण जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आले असते तर चांगला व्यवसाय होऊ शकला असता. जगभरात जेवढी उत्सुकता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यासाठी असते त्यापेक्षा किती तरी पटीने भारत आणि पाकिस्तानसाठी असते. हे पैसे मिळवण्यासाठीचे साधन सुरू केलेलं आहे; पण त्याचबरोबर आनंद किती मिळतो, याचाही समतोल राखता यायला पाहिजे.
शब्दांकन : प्रसाद लाड
First Published on March 29, 2015 6:09 am