विश्वचषकात दणदणीत विजयांची परंपरा राखणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विजयरथासमोर चक्रीवादळाचे आव्हान आहे. मात्र हे चक्रीवादळ क्वीन्सलॅण्ड प्रांताच्या दिशेने सरकल्याने ऑस्ट्रेलियाला दमदार विजयाची आशा आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशशी ब्रिस्बेनमध्ये सामना होणार
आहे.
‘मार्सिआ’ नावाचे चक्रीवादळ ब्रिस्बेन शहराभोवती घोंघावते आहे. मात्र हे वादळ क्वीन्सलॅण्ड किनाऱ्याच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. मात्र चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ब्रिस्बेन शहरात पावसाचे आगमन झाले आहे. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स अशा चार वेगवान गोलंदाजासह खेळण्याची शक्यता आहे. ‘‘चक्रीवादळाने दिशा बदलल्यास आमच्या विजयाचा मार्ग सुकर होईल,’’ असे ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने सांगितले.

पावसाचा जोर राहिल्याने आम्हाला इन्डोअर सराव करावा लागला. हवामान खराबच राहिल्याने आम्ही अंतिम संघ जाहीर करू शकलेलो नाही. दुखापतीतून सावरलेला कर्णधार मायकेल क्लार्क पुनरागमन करणार आहे. मात्र त्यासाठी जॉर्ज बेली किंवा शेन वॉटसन यांच्यापैकी कोणाला वगळणार हे ठरलेले नाही.
– ब्रॅड हॅडिन