पाकिस्तानची चमत्कार घडवण्याची क्षमता ध्यानात ठेवून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने छोटे, पण फसवे लक्ष्य सहा विकेट राखून गाठले आणि उपांत्य फेरीत आगेकूच केली. अनपेक्षित दणका देऊ शकणाऱ्या पाकिस्तानवर सहज वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा आता उपांत्य फेरीत भारताविरुद्ध मुकाबला होणार आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय आपल्या बाजूने सार्थ ठरवला. उशिरा संघात स्थान मिळालेल्या मात्र त्यानंतर संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्फराझ अहमदला (१०) झटपट माघारी धाडत मिचेल स्टार्कने शानदार सुरुवात केली. त्यापाठोपाठ अहमद शेहझादला (५) जोश हेझलवूडने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मिसबाह उल हक व हॅरिस सोहेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. हे दोघेही स्थिरावले असे वाटत असतानाच ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिसबाह (३४) बाद झाला. मिचेल जॉन्सनने हॅरिस सोहेलला बाद केले, त्याने चार चौकारांच्या जोरावर ४१ धावा केल्या. उमर अकमलही (२०) मिसबाहप्रमाणेच फिंचच्या हाती झेल देऊन बाद झाला. शाहिद आफ्रिदीने  (२३) नेहमीप्रमाणे आततायीपणे फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र हेझलवूडने त्याची खेळी संपुष्टात आणली. सोहेब मकसूदने (२९) खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला हेझलवूडने बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांवर यॉर्कर व उसळत्या चेंडूंचा मारा केला. अखेर पाकिस्तानचा डाव २१३ धावांतच संपुष्टात आला. सर्वाधिक ४ बळी घेणाऱ्या हेझलवूडने सामनावीर पुरस्कार मिळवला.  
छोटय़ा लक्ष्याच्या यशस्वी बचावासाठी पाकिस्तानचा संघ ओळखला जात असला तरी त्यांना हा सामना जिंकता आला नाही. पण पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला धक्के मात्र दिले. सोहेल खानने आरोन फिंचला पायचीत पकडले. तीन चौकारांसह आक्रमक पवित्रा घेतलेल्या धोकादायक डेव्हिड वॉर्नरला (२४) वहाब रियाझने बाद केले. वहाब रियाझच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला नमते घ्यावे लागले. वहाबच्याच उसळत्या चेंडूवर मायकेल क्लार्कने (८) आपली विकेट गमावली. यानंतर स्टीव्हन स्मिथ व शेन वॉटसन यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावा केल्या. वहाबच्या वेगवान माऱ्यासमोर स्मिथ व वॉटसन यांनी शरणागती पत्करली. मात्र दुसऱ्या बाजूने चांगली साथ न मिळाल्याने अन्य गोलंदाजांवर त्यांनी हल्लाबोल केला. वॉटसन व वहाब रियाझ यांच्यात वाक्युद्धही रंगले. मात्र वॉटसनने संयमी खेळी केली.
एहसान अदिलने स्टीव्हन स्मिथचा (७ चौकारांसह ६५ धावा) प्रतिकार संपुष्टात आणला. मग मॅक्सवेलवर पाक गोलंदाजांनी जोरदार आक्रमण केले. यादरम्यान सोहेल खानने मॅक्सवेलचा पाच धावांवर झेल सोडला. पण यानंतर मॅक्सवेलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन-मॅक्सवेल या जोडीनेच पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉटसनने ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ६४ धावांची खेळी केली. मॅक्सवेलने २९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.
ल्ल  पाकिस्तानी चाहत्यांचा उद्रेक
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. टीव्ही वाहिन्यांवर झळकण्यासाठी आतूर काही चाहत्यांनी चक्क आपले टीव्ही फोडले.

जोश हेझलवूड
१०-१-३५-४

धावफलक
पाकिस्तान : अहमद शेहझाद झे. क्लार्क गो. हेझलवूड ५, सर्फराझ अहमद झे. वॉटसन गो. स्टार्क १०, हॅरिस सोहेल झे. हॅडिन गो. जॉन्सन ४१, मिसबाह उल हक झे. फिंच गो. मॅक्सवेल ३४, उमर अकमल झे. फिंच गो. मॅक्सवेल २०, सोहेब मकसूद झे. जॉन्सन गो. हेझलवूड २९, शाहिद आफ्रिदी झे. फिंच गो. हेझलवूड २३, वहाब रियाझ झे. हॅडिन गो. स्टार्क १६, एहसान आदिल झे. स्टार्क गो. फॉल्कनर १५, सोहेल खान झे. हॅडिन गो. हेझलवूड ४, राहत अली नाबाद ६, अवांतर (लेगबाइज ५, वाइड ५) १०, एकूण ४९.५ षटकांत सर्वबाद २१३
बादक्रम : १-२०, २-२४, ३-९७, ४-११२, ५-१२४, ६-१५८, ७-१८८, ८-१८८, ९-१९५, १०-२१३.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क १०-१-४०-२,
जोश हेझलवूड १०-१-३५-४, मिचेल जॉन्सन १०-०-४२-१, ग्लेन मॅक्सवेल ७-०-४३-२, शेन वॉटसन ५-०-१७-०,
जेम्स फॉल्कनर ७.५-०-३१-१
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. राहत अली गो. वहाब रियाझ २४, आरोन फिंच पायचीत गो. सोहेल खान २, स्टिव्हन स्मिथ पायचीत गो. एहसान आदिल ६५, मायकेल क्लार्क झे. सोहेब मकसूद गो. वहाब रियाझ ८, शेन वॉटसन नाबाद ६४, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४४, अवांतर (वाइड ९) ९, एकूण ३३.५ षटकांत ४ बाद २१६
बादक्रम : १-१५, २-४९, ३-५९, ४-१४८
गोलंदाजी : सोहेल खान ७.५-०-५७-१, एहसान आदिल ५-०-३१-१, राहत अली ६-०-३७-०, वहाब रियाझ ९-०-५४-२, शाहिद आफ्रिदी ४-०-३०-०, हॅरिस सोहेल २-०-७-०
सामनावीर : जोश हेझलवूड

३००३ मिसबाह उल हकने पाकिस्तानचा कर्णधार म्हणून एकदिवसीय प्रकारात केलेल्या धावा. ३००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पाकिस्तानचा दुसरा कर्णधार. याआधी केवळ इम्रान खानने ३७०९ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत केलेल्या प्रवेशांची संख्या. विश्वचषकात सर्वाधिक वेळा उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ.

४३ ऑस्ट्रेलियातर्फे पाकिस्तानला सर्वबाद करण्याची संख्या. एका विशिष्ट संघाने दुसऱ्या संघाला सर्वाधिक वेळा सर्वबाद करण्याचा विक्रम आता ऑस्ट्रेलियाच्या नावावर.

भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आह़े  महेंद्रसिंग धोनी कल्पकतेने नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे आणि त्यामुळे उपांत्य फेरीत आमच्यासमोर कडवे आव्हान आह़े  आम्हाला भारताविरुद्ध फलंदाजीत सुधारणा करायला हवी़  विशेष करून अव्वल चार फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावायला हवी़
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
२. बेंड्रन टेलर (झिम्बाब्वे) ४३३ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४१७ धावा

अव्वल गोलंदाज
१. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) १८ बळी
२. मोहम्मद शमी (भारत) १७ बळी
३. वहाब रियाझ (पाकिस्तान) १६ बळी

निराश झालो़  ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला आणि या विजयावर त्यांचाच हक्क आह़े  २७०च्या आसपास धावा सहज होतील असे वाटत असताना आमचे फलंदाज चुकीचे फटके मारण्याच्या नादात एका मागोमाग माघारी परतल़े  वहाबने अप्रतिम गोलंदाजी केली़
– मिसबाह उल हक, पाकिस्तानचा कर्णधार