रविवारी मेलबर्नवर रंगणारा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा ऐतिहासिक अंतिम सामना हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. एकदिवसीय प्रकाराला अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे, जेणेकरून नव्या कर्णधाराला संघबांधणीसाठी पुरेसा वेळ मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया क्लार्कने व्यक्त केली.
विश्वचषक स्पध्रेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ३४ वर्षीय क्लार्कने निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट मात्र मी यापुढेही खेळत राहणार आहे, असे त्याने सांगितले. ‘‘मी माझे सहकारी, जेम्स सदरलँड, रॉड मार्श आणि डॅरेन लेहमन यांच्याशी चर्चा करून त्यांना रविवारी मी ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळत असल्याची कल्पना दिली,’’ असे क्लार्कने सांगितले.
‘‘हा माझ्या कारकीर्दीतील २४५वा एकदिवसीय सामना असेल. देशासाठी एवढे सामने खेळायची संधी मिळणे, हा मी माझा गौरव समजतो,’’ असे क्लार्कने सांगितले. अ‍ॅडलेडपासून मी काही महिने दुखापतीमुळे त्रस्त आहे. भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अ‍ॅडलेडला झाल्यावर क्लार्कच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. या पाश्र्वभूमीवर विश्वचषक स्पध्रेतील त्याच्या सहभागाबाबतही साशंका प्रकट करण्यात आली होती; परंतु निवड समितीने त्याला पुरेसा वेळ दिल्यामुळे बांगलाविरुद्धच्या गटसाखळीतील दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकला. क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली असली तरी फलंदाज म्हणून तो योग्य न्याय देऊ शकलेला नाही.

‘‘माझ्यासाठी आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. चार वर्षांपूर्वी माझ्याकडे एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यामुळे विश्वचषकाच्या दृष्टीने योग्य तयारी करण्याकरिता पुरेसा अवधी मिळाला. पुढील ऑस्ट्रेलियन कर्णधारालासुद्धा तशा प्रकारे संधी मिळावी, अशी माझी धारणा होती. मी आगामी विश्वचषकासाठी तंदुरुस्त असेन, याची खात्री देता येत नाही.’’
– मायकेल क्लार्क

एकदिवसीय कारकीर्द
सामने    धावा    सरासरी    शतके    अर्धशतके
२४४      ७९०७     ४४.४२          ८       ५७
कर्णधारपदाची कारकीर्द
सामने        विजयी    
    ७३        ४९