दहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या नॅटवेस्ट तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे ओरखडे अद्याप ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांच्या मनांवर ताजे आहेत. या स्पध्रेतील दुसरा सामना १८ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार होता. विश्वचषक विजेते आणि एकदिवसीय स्वरूपातील अव्वल संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला िलबू-टिंबू बांगलादेशविरुद्धच्या या सामन्याची चिंता करण्याची अजिबात गरज नव्हती. मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिग, मायकेल क्लार्क, ग्लेन मकग्रा यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव करणे दूर; पण बांगलादेशच्या खेळाडूंबरोबर तुलना करणेदेखील व्यर्थ होते. पण इतिहासाने ऑस्ट्रेलियासाठी काही वेगळाच डाव रचला होता. अडीचशे धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. आफ्ताब अहमदने गिलेस्पीच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला व ५ विकेट व ४ चेंडू राखून धक्कादायक विजयाची नोंद केली होती.
या दोन देशांमध्ये शनिवारी होणारा सामना जरी आता एकतर्फी दिसत असला तरी हा सामना थरारक ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या वतीने दुखापत झालेला कर्णधार मायकेल क्लार्कचे पुनरागमन होण्याची शक्यता दिसून येत आहे. क्लार्कसाठी कुणाला आपली जागा मुकावी लागणार आहे, हे जरी नक्की ठरले नसले तरी थोडी लक्षणे दिसून आली आहेत, असे म्हणायला हरकत नाही. संघाचा आगामी कर्णधार जॉर्ज बेली सराव करताना दिसला नाही. क्लार्कसोबत इतर अन्य फलंदाज नियमित सराव करताना दिसले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बेलीने उपयुक्त ५५ धावांचे योगदान दिले. त्या व्यतिरिक्त अष्टपलू खेळाडू शेन वॉटसन सध्या थोडा नरम दिसत आहे. इंग्लंडबरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात आणि भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतदेखील वॉटसनने काही कमाल दाखवली नाही. अशीच कामगिरी चालू राहिली तर संघात आपले स्थान राखणे त्याला फार कठीण जाणार आहे. याऐवजी इतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू सज्ज दिसत असल्यामुळे एका कर्णधारासाठी बहुतेक दुसऱ्या भावी कर्णधाराचेच स्थान धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
दुसऱ्या बाजूला बांगलादेश संघात फारसे बदल होणार नाहीत. गाबाच्या खेळपट्टीवर कर्णधार मुर्तझा आणि रुबेल हुसेन यांच्या धारदार गोलंदाजीवर बांगलादेशची आशा असेल. अफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यासारखी सुरुवात जर बांगलादेशला करता आली तर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीवर ताण पडण्याची शक्यता आहे.
सामन्यावर सध्या निसर्गाचा तिरका डोळा आहे. ब्रिस्बेनपासून ६०० किमी उत्तरेकडून ‘मर्सयिा’नामक वादळाचे आगमन झाले. या वादळासोबत मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. क्वीन्सलँड राज्यातील मंत्र्यांनी आणि स्थानिक महापौरांनी जनतेला बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समुद्राहून खाली असलेल्या ठिकाणी जवळपास एक लाख वाळूच्या गोणी लावण्यात आल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करताना या वादळाची तीव्रता कमी जरी झाल्याची बातमी असली तरी यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांगलादेशी वाघांनी २००५मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात उमटवलेले ओरखडले अद्यापदेखील ताजे आहेत. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला गृहीत न धरता पूर्ण सराव केला आहे. यावरून ऑस्ट्रेलियाने पराभवापासून बराच धडा घेतला आहे, असे म्हणता येईल. कांगारूंच्या अंगणात येऊन वाघ आपली शिकार करू शकेल काय, हे काळच ठरवेल, अर्थात निसर्गाच्या परवानगीने!
सामना क्र. : ११ ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (अ-गट)
स्थळ : ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, ब्रिस्बेन ल्ल वेळ : सकाळी ९.००
बोलंदाजी
चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेला पाऊस यामुळे सामना होईल की नाही, याविषयी काहीही भाष्य करता येणार नाही. पण कोणत्याही स्वरुपातला सामना असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. ब्रिस्बेनमध्ये वातावरण झटकन बदलते. आम्ही कसून सराव करत आहोत. पूर्ण ताकदीनिशी आम्ही या सामन्यात खेळू. जोश हेझलवूडच्या जागी पॅट कमिन्सला स्थान मिळणार का याविषयीचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतरच घेऊ.
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
पावसामुळे सामना होणारच नाही, ही आमची भूमिका आहे. आम्ही संपूर्ण सामना खेळण्याच्या उद्देशाने तयारी केली आहे. ऑस्ट्रेलिया बलाढय़ संघ आहे. मात्र त्यांना नमवण्याची करामत आम्ही केली आहे. परंतु ऑस्ट्रेलियात त्यांना हरवणे खडतर आहे. खेळपट्टीचे स्वरुप लक्षात घेऊन आम्ही संघात योग्य ते बदल करू.
-मुश्रफी मुर्तझा, बांगलादेशचा कर्णधार
आमने सामने
सामने -२ ’ ऑस्ट्रेलिया-२ ’ बांगलादेश-०
संघ
ऑस्ट्रेलिया-मायकेल क्लार्क (कर्णधार), ब्रॅड हॅडीन (यष्टीरक्षक), डेव्हिम् वॉर्नर, आरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, झेव्हियर डोहर्टी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, जेम्स फॉल्कनर.
बांगलादेश- मुश्रफी मुर्तझा (कर्णधार), मुशफकीर रहिम, शकीब अल हसन, मोमिनुल हक, अनामूल हक, महमदुल्ला, रुबेल हुसेन, अल अमिन होसेन, अराफत सनी, नासिर होसेन, साबीर रहमान, सौम्या सरकार, ताजीऊल इस्लाम, तमीम इक्बाल, तास्किन अहमद.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 5:28 am