दिमाखदार विजयांची शिदोरी घेऊन बाद फेरीत जाण्यासाठी आतूर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने उभे ठाकले आहेत. चारपैकी तीन सामने जिंकत श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे.
कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, महेला जयवर्धने व तिलकरत्ने दिलशान हे श्रीलंकेचे प्रमुख फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यांना अँजेलो मॅथ्यूज व थिसारा परेराची साथ मिळणे अपेक्षित आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा संघ कमकुवत आहे. धावा रोखणे व बळी मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर लसिथ मलिंगा श्रीलंकेचे प्रमुख अस्त्र आहे. रंगना हेराथ अद्यापही दुखापतीतून सावरलेला नसल्याने फिरकीची जबाबदारी सचित्रा सेनानायकेवर आहे. न्यूवान कुलसेकरा व सुरंगा लकमल यांना खेळ उंचावण्याची गरज आहे.  
अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. वॉर्नरसह आरोन फिंच, स्टिव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. दुखापतीतून परतलेल्या मायकेल क्लार्कला अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या त्रिकुटावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची भिस्त आहे.

नाणेफेक हा एकमेव घटक महत्त्वाचा आहे, असे वाटत नाही. खेळपट्टय़ा गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही साहाय्यक आहेत. तीनशे धावा सहजतेने होत आहेत आणि या लक्ष्याचा यशस्वी पाठलागही होत आहे.
– अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार

खेळपट्टी संथ आणि कोरडी आहे. यामुळे संघात बदल करण्याचा आमचा विचार आहे. सिडनीच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळते म्हणून झेव्हियर डोहर्टीला संघात समाविष्ट  केले जाऊ शकते.
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सामना क्र. : ३२
ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका
स्थळ : सिडनी क्रिकेट ग्राऊंड  ल्ल वेळ : सकाळी ९.००
संघ
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टिव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, शेन वॉटसन, मिचेल मार्श, जेम्स फॉल्कनर, झेव्हियर डोहर्टी, मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन, जोझ हेझलवूड, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, ब्रॅड हॅडिन
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान, लाहिरु थिरिमाने, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, दुश्मंत चमीरा, दिनेश चंडिमल, रंगना हेराथ, थिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, उपुल थारंगा.
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर