विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या स्कॉटलंडवर दमदार चाल करीत बांगलादेशी वाघांनी विजयासाठी आवश्यक असलेले ३१९ धावांचे विक्रमी लक्ष्य केवळचा फलंदाज गमावून गाठले. या विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या बांगलादेशच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
विश्वचषकातील २७ व्या सामन्यात ३१९ धावांचे कठीण लक्ष्य गाठताना बांगलादेशची सुरुवात अडखळत झाली व सामन्याच्या पाचव्याच चेंडूवर सलामीवीर सौम्या सरकार तंबूत परतला. मात्र, हा सामनाजिंकण्याचे महत्त्व लक्षात घेऊन तमीम इक्बाल व महमुदल्लह यांनी निर्धाराने फलंदाजी करीत दुसऱ्या गडय़ासाठी १३० चेंडूत १३९ धावांची भागीदारी केली.
६२ चेंडूत ६२  धावा करून बाद झाल्यानंतर इक्बाल व मुशफिकर रहीम (६०) यांनी संघाची धावसंख्या २०० पर्यंत पोहोचवली. अत्यंत सुंदर खेळी साकारणाऱ्या तमीम इक्बालला शतकाने मात्र हुलकावणी दिली. वैयक्तिक ९५ धावा झाल्या असताना जोश डॅवीच्या गोलंदाजीवर तमीम पायचीत झाला.
शकिब-अल-हसन व रहीम यांनी संघाची धावगती कमी न होऊ देता विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली. शकिब (५२) व सब्बीर रहमान (४२) यांनी संघाला विजयासमीप नेऊन ठेवले. शकिबने विजयी चौकार हाणून बांगलादेशचा विजय साकार केला. स्कॉटलंडतर्फे जोश डॅवीने दोन तर वॉर्डलॉ आणि इवान्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
त्याअगोदर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ३८ धावांवर २ गडी गमावल्यानंतर सलामीवीर केल कोएट्झरने १३४ चेंडूत घणाघाती १५६ धावा करीत संघाला आठ गडी बाद ३१८ धावसंख्येपर्यंत पोहोचवले.        बांगलादेशतर्फे टस्किन अहमदने ४३ धावांत ३ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड : ५० षटकांत ८ बाद ३१८
(केल कोएट्झर १५६, पी मॉमसेन ३९, टस्किन अहमद ४३ धावात ३ बळी)
पराभूत विरुध्द बांगलादेश  : ४ बाद ३२२ (तमीम इक्बाल ९५, महमदुल्लाह ६२, मुशफिकुर रहमान ६०, शकिब अल हसन ५२, जोस डेवी ६८ धावात २)
सामनावीर :  केल कोएट्झर (स्कॉटलंड)