एका भारतीय पत्रकाराला विराट कोहलीने शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतली असून भारतीय क्रिकेट संघाची प्रतिष्ठा सांभाळण्याचा सल्ला भारतीय उपकर्णधाराला दिला आहे. अशा प्रकारचे वर्तन भविष्यात होऊ नये, अशी तंबीही मंडळाने कोहलीला दिली आहे.
चित्रपट अभिनेत्री व विराटची मैत्रिण अनुष्का शर्मा हिच्यासंबंधातील वृत्त एका आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकात प्रसिध्द झाल्यानंतर कोहलीने एका वरिष्ठ पत्रकाराला शिवीगाळ केली होती. या प्रकरणी माध्यमातून कोहलीवर टीका झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने मध्यस्थी केली होती. त्या वरिष्ठ पत्रकाराला ओळखण्यात कोहलीची चूक झाली. विराटने शिवीगाळ केली नव्हती व संबंधित पत्रकाराची त्याने माफी मागितली आहे, अशा अर्थाचे एका ओळीचे पत्र भारतीय संघ व्यवस्थापक डॉ. आर.एन. बाबा यांनी विश्वचषक स्पध्रेचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना दिले होते.
मात्र, आता खुद्द भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोहलीला ताकीद दिल्याने संघ व्यवस्थापन तोंडघशी पडले आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाची प्रतिष्ठा सांभाळली गेली पाहिजे व भविष्यात असा प्रकार घडू नये, असे संबंधित खेळाडूला सांगण्यात आले असल्याचे, मंडळाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनानुसार पर्थ येथे घडलेल्या घटनेची मंडळाने नोंद घेतली असल्याचे म्हटले आहे. ‘मंडळाने या प्रकरणी संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधला व पुन्हा असा प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यास सांगितले. क्रिकेटचा प्रसार करण्यात, वार्ताकन करण्यात व खेळाची लोकप्रियता वाढविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतातील क्रिकेटचे व्यवस्थापन व प्रसार यातील माध्यमांच्या भूमिकेची जाणीव मंडळाला आहे. हे प्रकरण येथेच थांबवून संबंधित सर्वानीच भारताच्या विश्वचषक मोहिमेवर लक्ष केंद्रित करावे, अशी बीसीसीआय विनंती करीत आहे,’ असे ठाकूर यांच्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, पर्थ येथे सरावासत्रानंतर कोहलीनेपत्रकारांशी केलेल्या वर्तनावर माजी खेळाडू सुनील गावस्कर, व्ही व्ही एस लक्ष्मण, स्टीव्ह वॉ यांनी देखील टीका केली होती.
कोहलीकडून वडय़ाचे तेल वांग्यावर!