वो घडी आ गयी आ गयी हं!
प्राथमिक फेरी संपून वर्ल्डकपची नॉकआऊट म्हणजेच बाद फेरी आली. बाद फेरीतले संघ निश्चित होताच भारत-पाकिस्तान उपान्त्य सामना होणार, भारत जिंकणार, पाकिस्तानमध्ये यादवी माजणार वगैरे वगैरे काय वाट्टेल ते सनसनाटी चित्र मीडियाने उभे करायला सुरुवात केली. पाकिस्तानला अगोदर ऑस्ट्रेलियाचा महाकाय पर्वत ओलांडायचा आहे, तर भारताला प्रेरणेने झपाटलेल्या बांगलादेशला मात द्यायची आहे. पण त्या अगोदरच मीडियाने भारत-पाकिस्तान सामना लावून टाकला. हे म्हणजे सीईटी न देता मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखे झाले.
 मीडियाप्रमाणे असंख्य भारतीय चाहत्यांनीसुद्धा बांगलादेशला शून्य मार्क देऊन नापास करून ठेवले आहे. बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाला सर्वात कोणता मोठा धोका आहे तर या वरिष्ठतेच्या भावनेचा. ज्याला आपण सुपीरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो. संपूर्ण सामन्यात ज्या क्षणी ही भावना मनात येईल तो क्षण धोकादायक ठरणार. संपूर्ण सामन्यात ही भावना घर करून राहिली तर नामुष्की पत्करावी लागेल. बांगलादेश हा लिंबूटिंबू संघ म्हणून हिणवला जात असला तरी एकदिवसीय सामन्यात अत्यंत उत्कट स्फूर्तीने खेळणारा तो संघ आहे. भारतासारखीच बांगलादेशात क्रिकेटबद्दल जबरदस्त पॅशन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याकरिता या संघाची सतत धडपड चालू असते. एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताला ज्या तीन सामन्यांत हरवले आहे त्यामध्ये एका सामन्यात भारत आशिया स्पर्धेतून बाहेर पडला तर दुसऱ्यांदा २००७च्या विश्वचषकामधून. भारतीय उपखंडातील भारत, श्रीलंका, पाकिस्तान या संघांकडून आणि त्यांच्या क्रिकेट रसिकांकडून कायम दादागिरीची वागणूक मिळत असल्याने बांगलादेश संघ या तीन संघांविरुद्ध तर जास्तच चेवाने खेळतो. श्रीलंकेची १९८० आणि १९९०च्या दशकांमध्ये अशीच परिस्थिती होती. श्रीलंकेने जबरदस्त महत्त्वाकांक्षेने १९९६चा विश्वचषक जिंकला, ज्यामध्ये दोन वेळा भारताला सहज हरवले. त्यानंतर १९९७ साली कोलंबोत कसोटी सामन्यात ९५२ धावांचा हिमालय भारताविरुद्ध उभा केला. डाव घोषितच केला नाही. खेळत राहिले, खेळत राहिले. कशाकरिता? तर आम्हाला बरोबरीचे स्थान द्या. आम्ही तुमच्याइतकेच तयार आहोत. आता आम्हाला कमी लेखू नका हे सांगण्यासाठी. बांगलादेशचा संघसुद्धा अशा अनेक गोष्टी ओरडून सांगण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याकरिता त्यांच्या संघाची उत्तम बांधणी त्यांनी केली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन नावाजलेल्या संघांविरुद्ध २८० धावा बांगलादेशने केल्या. इंग्लंडला हरवले तर न्यूझीलंड कसेबसे जिंकले.
 तमीम इक्बाल, मुब्फीकूर, मोहमदउल्ला, शाकीब उल हसन हे कसदार फलंदाज आणि मोर्ताझा, तस्कीन अहमद, रुबेल, ताईजूल इस्लाम, शाकीब यांसारखे सामन्यागणिक खेळ उंचावत नेलेले गोलंदाज आहेत. हे सर्व गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर चेंडूला वेग कमी करून फलंदाजाला मेटाकुटीला आणतात. चेंडू बॅटवर संथपणे येईल आणि फलंदाज अगोदर खेळून झेल उडतील हे भारतीय उपखंडातील धोरण ते ऑस्ट्रेलियातदेखील वापरत आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी यश मिळत आहे. मोर्तझा आणि रुबेल चेंडू चांगले स्विंग करतायत. शाकीबच्या रूपात एक अत्यंत कुशल आणि चतुर अष्टपैलू त्यांच्याकडे आहे. त्यामुळे बांगलादेशच्या संघाला भारतीय संघाने आणि भारतीय चाहत्यांनी किरकोळीत काढू नये. पाकिस्तान, आफ्रिका या चांगल्या संघांविरुद्ध भारताने जसा कठोरपणे आणि सातत्यपूर्ण तीव्रतेने प्रहार केला तसाच ‘छोडना मत’ या धोरणाने प्रहार करायचा आहे. वरिष्ठतेची भावना भारतीय संघाच्या मनात आली तर लिंबूटिंबू संघ आभाळाएवढा वाटू लागेल.
  मेलबोर्नचे स्टेडियम, ९० हजारांपैकी ८० हजार भारतीय प्रेक्षक, प्रत्येक विकेटनंतर वाढलेले टेन्शन, घाम आलेले हात, त्यातून विश्वचषक निसटतोय असे फिलिंग, जड खांदे, डोक्यात मुंग्या, वाढलेला रक्तदाब. क्रिकेटच्या धर्मस्थळी आपण वारकरी बेभान होणारच. सामन्याचा आनंद लुटा. तब्येतीला जपा. बघू वाटेत खरेच पाकिस्तान भेटतो का. हॅपी व्हय़ूइंग!
– रवि पत्की- sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)