ऑस्ट्रेलियाची ही तारांकित फलंदाजी पाहा. हेडन, गिलक्रिस्ट, पॉंटिग, क्लार्क, सायमन्डस,हंसी, होप्स… ही जबरदस्त नाव असताना आपण सलग दोन वेळा त्याना कॉमन वेल्थ बँक सीरीज मध्ये २००८ साली हरवलं आणि कप जिंकला. आत्ताची त्यांची फलंदाजी पाहिली तर वार्नर,फिंच, वॅटसन, स्मिथ, क्लार्क, मैक्सवेल, फॉकनर, हॅड्डीन ही फलंदाजी २००८ पेक्षा भयावह नाही. तेव्हा ब्रेट ली, ब्रेकन, जॉनसन होते, तर आता स्टार्क हेज़लवूड आणि जास्त प्रगल्भ झालेला जॉन्सन आहे.
आपल्या फलंदाजित सचिन, सेहवाग, गंभीर, युवराज, रोहित, धोनी होते तर आता धवन, रोहित, कोहली, रहाणे, रैना, धोनी आहेत.तेव्हा प्रवीण, इशांत, इरफ़ान, हरभजन, चावला होते. तर आता उमेश , शमी, मोहित, आश्विन, जडेजा आहेत. म्हणजे आपला संघसुद्धा तेवढाच समतोल आहे.
दोन मुख्य गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सचिनसारखी कोणीतरी एक बाजू लावून धरायची आणि प्रवीणसारख्या पहिल्या पाच षटकात दोन विकेट्स घ्यायच्या.शमीची गोलंदाजीची जातकूळी प्रवीणसारखी आहे.तो स्विंगवर पहिल्या काही षटकात धक्के देऊ शकतो.मधल्या ओवर्स मध्ये आश्विन इस्पिकचा एक्का ठरू शकतो.
सिडनी ची खेळपट्टी स्पिनर्सना पूर्वीसारखी साथ देत नाही.मात्र ऑस्ट्रेलियातील पिचेसचा बाउंसच स्थायीभाव ती बाळगून आहे.पर्वाच्या श्रीलंका -अफ्रीका सामन्यात ताहिर आणि डुमिनीला चेंडू फिरल्यामुळे नाही तर फलनदाजांच्या हाराकीरीमुळे मिळाल्या.
कसोटी सामन्यात देखील सिडनीला अश्विन आणि लायन मिळुन पहिल्या डावात ९० षटकात ३ विकेट्स मिळाल्या.त्यामुळे सिडनी म्हणजे स्पिन असं आता राहिलं नाहिये. सिडनीला कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवशी टर्न मिळतो, असं म्हणता येईल.
ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक खेळाला आणि आक्रमक वागण्याला तसंच उत्तर द्यायची काही गरज नाही. खरंतर आपल्याला हवेत ११ धोनी. खेळावर लक्ष देणारे आणि शेवटी कोण श्रेष्ठ ते दाखवून देणार.अजुन एक गोष्ट म्हणजे वहाबच्या नादाला आपण लागू नये. तो १५०ने टाकतो. आपले १४० म्हणजे ऑस्ट्रेलियाला आयते कोलीत मिळेल. बाउंसर मधून मधून धक्का तंत्र म्हणून वापरावा
आपल्या फलंदाजांनीसुद्धा हुकचा मोह पहिली ३० षटके टाळावा. कारण सिडनीच्या विस्तीर्ण ग्राउंड वर रिस्क आहे. दूसरी फलंदाजी आल्यास सर्व गुण पणाला लाउन चेस करू शकतो.
रवि शास्त्री मोठा स्फूर्तिदाता आहे. बिनधास्त खेळा, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, हे तो निक्षून सांगतो. दिलेर,बेडर होवून भारतीय संघ खेळतो ते शास्त्रीच्या स्फूर्तीने.
ऑस्ट्रेलिया काही अनबिटेबल संघ नाही आणि गेल्या एक महिन्याच्या भारताच्या कामगिरी वरुन सांगता येईल की मॅच चांगली होणार.
– रवि पत्की 
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही