विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला निष्प्रभ केले. ऑस्ट्रेलियामध्ये क्रीडासंस्कृती आहे. प्रत्येक मुलाला किमान दोन खेळात तरी नैपुण्य असते. महत्वाची गोष्ट अशी की फक्त क्रीडासंस्कृती नाही, तर प्रत्येक खेळात अव्वल दर्जाचा पाठलाग करण्याची संस्कृती आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा त्यासाठी क्रिकेट मंडळापासून प्रशिक्षक आणि खेळाडूंपर्यंत सर्व आपले प्रयत्न, प्रतिष्ठा पणाला लावत असतात. ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यातला संघ आणि त्यांची कामगिरी पाहिली की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
लेफ्ट आर्म फास्ट गोलंदाजामध्ये स्टार्क आणि जॉनसनने अव्वल दर्जा काय असतो, ते दाखवलं. १५०चा स्पीड, लेट स्विंग होऊन ऑफ स्टंपकडे येणारे आणि बॅटच्याख़ाली खोलवर पडणारे चेंडू, तितक्याच कौशल्याने ऑफस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू. ३५-४० षटकांत पॉवरप्ले करता खास फॉकनरकडून घोटवून घेतलेला सर्वोत्तम दर्जाचा आणि १०० पैकी ९९ वेळा अचूक पड़णारा स्लोअर वन. ऑफस्टंपची कास कधीही न सोडणारा हेजलवूड. गोलंदाजीचे प्रशिक्षक मॅकड़रमॉट यांनी प्रत्येक गोलंदाजाकडून खूप चिकाटीने काम करुन घेतले आणि एकेक कसे पैलू पाडलेले हिरे तयार झाले, हे आपण पाहिलेच. मला खात्री आहे की अजून दोन दिवसांनी मॅकडरमोट आपल्या चेल्याना पुन्हा नेटमध्ये घेऊन जाणार आणि मी का समाधानी नाही, हे सांगणार आणि पुन्हा मेहनत चालू.
वॉर्नरसारख्या खेळाडूकडून पहिल्या १० षटकातल्या बॅटिंगचे तंत्र तर मॅक्सवेलकडून पॉवर हिटिंगची मेहनत करून घेतली आहे. प्रत्येक स्पॉट करता खेळाडू हेरून त्याच्याकडून अव्वल दर्जा विकसित कसा होईल हे डोळ्यात तेल घालून पाहिले आहे. न्यून गोष्टींना थाराच नाही. जे करू ते उत्तमच ही संस्कृती असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही उत्तम कामगिरी ऑस्ट्रेलिया करते.
आता पुन्हा ऑस्ट्रेलिया आणि इतर क्रिकेट देशांमध्ये मोठी दरी दिसू लागली आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका चांगले संघ आहेत. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची गुणवत्ता आत्ता तरी जास्त श्रेष्ठ आहे.
ऑस्ट्रेलियाचे साम्राज्य वर्षानुवर्षे चालू नये, म्हणून इतर देशांची खूप दमछाक होणार हे नक्की.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)