खेळ नियंत्रित करण्यासाठी नियम असतात. बदलत्या काळानुसार, तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार नियम बदलतात. ते बदलणं गरजचंही असतं. मात्र अर्थकारणाच्या दबावापोटी नियमांना दिलेल्या एकांगी स्वरूपामुळे गोलंदाज नावाची संकल्पना कालबाह्य़ होण्याची शक्यता आहे. वाढीव आकाराचा बॅटरूपी दांडपट्टा चालवणाऱ्या फलंदाजांचा कर्दनकाळ झेलण्यासाठीची माणसं एवढय़ापुरते गोलंदाज मर्यादित logo10होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेळातली चुरस, रंजकता टिकून ठेवायची असेल तर नियम सर्वसमावेशक होणं अत्यंत आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय सामन्यांसाठी ऑक्टोबर २००१पासून नवी नियमावली जाहीर केली. पहिल्या दहा षटकांसाठी अनिवार्य पॉवरप्ले आणि यावेळी ३० गज वर्तुळाच्या बाहेर केवळ दोन खेळाडू तैनात करता येतील. फटकेबाजीचा परवाना घेऊन मैदानावर दाखल झालेल्या धडाकेबाज सलामीवीरांना हा नियम म्हणजे मैदान आंदण दिल्यासारखे आहे. मात्र त्याच वेळी त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजांना बचावासाठी वर्तुळाबाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक. गोलंदाज एका षटकात केवळ दोनच उसळते चेंडू टाकू शकतो. दोनच्या पुढील उसळते चेंडू नोबॉल देण्यात येतात. उजव्या हाताचा फलंदाज रिव्हर्स स्विचद्वारे डावखुरा फलंदाज होऊन षटकार खेचू शकतो, मात्र अशी मुभा गोलंदाजांना नाही. १९९२च्या विश्वचषकामध्ये पहिल्या १५ षटकांत जोरदार आक्रमण करत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी करण्याची परंपरा मार्क ग्रॅटबॅचनं सुरू केली. मार्टिन क्रो याची ही संकल्पना. मग १९९६मध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथरणा यांनी ती पुढे चालवली. चौकार-षटकारांची लयलूट पाहणे प्रेक्षकांसाठी आनंदाची आणि ‘पैसा वसूल’ गोष्ट आहे. मात्र कोणत्याही आयुधाविना गोलंदाजांना त्यांना रोखायला सांगणं हास्यास्पद आहे.
यानंतरचा बॅटिंग पॉवरप्ले १६ ते ४० षटकादरम्यान कधीही घेता येतो. याबाबतचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेतो. बहुतांशी संघ शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये म्हणजेच ३५ ते ४० षटकांदरम्यान पॉवरप्ले घेतात. यावेळी वर्तुळाबाहेर तीन क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा असते. सुरुवातीच्या षटकांमध्ये आलेले दडपण झुगारून देत
प्रचंड धावगतीसह धावसंख्या वाढवण्याचा हा कालखंड. मात्र तेव्हाही गोलंदाज केविलवाणे आणि हताश ठरतात. विश्वचषकात बॅटिंग पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा भारतीय संघाने घेतला आहे. प्रतिस्पध्र्यावर दडपण येईल असे ३०० धावांचे लक्ष्य देणे भारतीय संघाचे उद्दिष्ट असते आणि ही उद्दिष्टपूर्ती या पॉवरप्लेमध्ये होते.
नव्या नियमांप्रमाणे पॉवरप्लेची षटकंवगळता अन्य वेळी वर्तुळाबाहेर केवळ चारच क्षेत्ररक्षक असू शकतात. पूर्वी पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी होती. नव्या नियमामुळे चेंडूची आतली कड घेतलेला किंवा बॅटशी जेमतेम स्पर्श झालेला किंवा सहज तटवलेला चेंडूही अनेक वेळा सीमारेषेपार होतो. कारण तो अडवण्यासाठी वर्तुळाबाहेर पुरेसे क्षेत्ररक्षकच नसतात. फलंदाजांना टोलेबाजी करण्यासाठी मुक्तपीठ असताना गोलंदाजांवर अन्याय का?
२०११च्या विश्वचषकात अष्टपैलू युवराज सिंग मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषक संघात त्याची निवड करण्यात आली नाही. युवराजच्या साधारण कामगिरीपेक्षाही धोनीच्या मनात युवराजविषयी आकस आहे, अशा वावडय़ा उठल्या. प्रत्यक्षात नव्या नियमांनी युवराजला डच्चू मिळण्यासाठी खतपाणी घातले आहे. धोनीने काही दिवसांपूर्वीच ही मेख उलगडली. वर्तुळाबाहेर केवळ चार क्षेत्ररक्षक आणि दोन्ही दिशांकडून नव्या चेंडूचा वापर यामुळे फिरकीपटू तसेच कामचलाऊ गोलंदाजांच्या उपयोगावर थेट मर्यादा आली आहे. विश्वचषकात अष्टपैलूंपेक्षा विशेषज्ञ गोलंदाजांनीच घेतलेले बहुतांशी बळी धोनीचं बोलणं अचूक असल्याचं सिद्ध करणाऱ्या आहेत.
मागील विश्वचषक स्पर्धामध्ये एकूण शतकांच्या संख्येपेक्षाही जास्त शतकं यंदाच्या विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीतच नोंदली गेली आहेत. २०११च्या विश्वचषकात म्हणजेच पूर्वीच्या नियमांनुसार झालेल्या स्पर्धेत एकूण २४ शतकांची नोंद झाली तर यंदाच्या विश्वचषकात साखळी फेरीतच हा आकडा ३५ आहे. बाद फेरीच्या सात सामन्यांनंतर हा आकडा वाढणारच आहे.
खेळातली चुरस वाढवण्यासाठी वर्तुळाबाहेर पाच क्षेत्ररक्षक तैनात करण्याची तसेच प्रत्येक षटकात दोनपेक्षा जास्त उसळते चेंडू टाकण्याची परवानगी असावी. रिव्हर्स स्विचप्रमाणे खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजाला शैली किंवा स्वरूप बदलण्याची अनुमती असावी. खेळपट्टीवर आखलेल्या निर्धारित रेषेपलीकडे पाय असल्यास नोबॉल देण्यात येतो. नव्या नियमानुसार पुढच्या चेंडूवर फ्री-हिट मिळते. मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी तसेच निर्धाव षटकासाठी कोणताही बोनस गोलंदाजांना नाही.
सर्वच नियम फलंदाजधार्जिणे असल्याने लवकरच गोलंदाजांऐवजी बॉलिंग मशीन असेल, असं उद्वेगाने माजी खेळाडू कर्टली अ‍ॅम्ब्रोज म्हणाले. आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या अ‍ॅम्ब्रोज यांच्या मताचा आयसीसी वेळीच विचार करेल अशी अपेक्षा आहे. चाहत्यांना केवळ बेधडक फटकेबाजी पाहायला आवडते, हे बाजारू त्रराशिक चूक नाही. मात्र चाहत्यांना गोलंदाजांनी उडवलेली भंबेरीही अनुभवायला आवडते, हेही तितकंच खरं आहे. नियमांची साथ गोलंदाजांनाही मिळाली तरच बॅट-बॉलमधला मुकाबला समानतेचा होईल. समानतेचे वारे सगळ्याच क्षेत्रात वाहत आहेत, मग क्रिकेट त्याला अपवाद ठरायला नको.