फलंदाजीच्या रूढ पद्धतींना बाजूला सारत गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करणे हे आधुनिक फलंदाजीचे वैशिष्टय़ आहे. याचाच भाग म्हणून फलंदाजांचे शतक होणे क्रमप्राप्त आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीतच तब्बल ३५ शतकांची नोंद झाली. याआधीच्या कोणत्याही विश्वचषकातील एकूण शतकांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. त्यामुळे विश्वचषकाला विक्रमचषक म्हणणेच योग्य ठरेल. अजूनही सात सामने बाकी असल्याने या ३५ शतकांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. अनुभवी कुमार संगकाराने सलग चार सामन्यात चार शतके झळकावत अनोखा विक्रम नावावर केला आहे.
१९७५मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकात फक्त सहा शतकांची नोंद झाली होती. पुढच्या विश्वचषकात शतकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र १९७९च्या विश्वचषकात शतकांच्या संख्येत आश्चर्यकारक घट झाली आणि केवळ दोन शतकेच चाहत्यांना अनुभवायला मिळाली. भारताने १९८३च्या विश्वविजेतेपदावर नाव कोरले, त्या स्पर्धेत आठ शतकांची नोंद केली. पुढच्या विश्वचषकात शतकांच्या संख्येने दुहेरी आकडा गाठला.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याने फक्त आठ शतकांची नोंद झाली. त्यानंतर आशियाई खंडात झालेल्या विश्वचषकात शतकांची संख्या दुप्पट झाली. पुढच्या आणि इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात शतकांची संख्या कमी झाली. ट्वेन्टी-२०च्या आगमनामुळे यापुढच्या विश्वचषकांमध्ये शतकांची संख्या सातत्याने वाढत गेली. यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक फेरीतच शतकांचा कळसाध्याय गाठला गेला.
दमदार शतक म्हणजे विजयाची पायाभरणी, हे समीकरण असल्याने सर्वच संघांचे प्रमुख फलंदाज शतक झळकावण्यासाठी आतुर असतात. यंदाच्या विश्वचषकात साखळी फेरीत नोंदल्या गेलेल्या बहुतांशी शतकवीरांनी आपापल्या संघांना विजय मिळवून दिला आहे.
यंदाचे सर्वाधिक शतके शतकांची संख्या
झळकावणारे खेळाडू
कुमार संगकारा (श्रीलंका) ४
ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे) २
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) २
महमदुल्ला रियाझ (बांगलादेश) २
शिखर धवन (भारत) २
वर्ष शतके
१९७५ ६
१९७९ २
१९८३ ८
१९८७ ११
१९९२ ८
१९९६ १६
१९९९ ११
२००३ २१
२००७ २०
२०११ २४
२०१५ ३५*
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 3:17 am