(मलई पेढा, बालूशाहीचे दोन बॉक्स, डाळ आणि दाण्यांचं मोठं पोतं आणि टीम इंडियाची निळाई दर्शवणारी जर्सी असा साग्रसंगीत पसारा घेऊन चंपक अवतरतो.)
wc13चंपक : हिप हिप हुर्रे! काय जिंकलोय यार मॅच. क्लासिक! इतिहास-भूगोल, आकडे सगळ्यांना पोत्यात घातलं. नादखुळा परफॉर्मन्स.
तोताराम : अगदी मनातलं बोललात.
चंपक : इतक्या दिवसांपासून येतोय. हे लक्षात आलं नाही. हा मलमलचा डगला उतरवा आणि टीम इंडियाची जर्सी परिधान करा. म्हणजे कसा आणखी फील येईल काम करताना. आणि हा डाळ-दाण्यांचा प्रसाद विठ्ठलपंतांसाठी. त्यांना विसरून कसं चालेल?
तोताराम : तुम्ही म्हणाल तसं. २९ मार्चपर्यंत हाच पोशाख आमचा आता.
चंपक : तुम्ही म्हणाला होतात, खूप धावा कराव्या लागतील. ३०७ केल्या. सातत्याने विकेट्स घ्यावा लागतील, घेतल्या. फिल्डिंगमध्ये जॉन्टी व्हावं लागेल. अहो जॉन्टी मीठ-भाकर ओवाळून काढेल असे रनआऊट्स केले आपण. अगदी तुम्ही म्हणालात तसा ‘आदर्श’वत परफॉर्मन्स. जिंकण्याची ‘प्रोसेस’ सुफळ संपूर्ण.
तोताराम : आम्ही निमित्तमात्र! आम्ही नॉस्ट्राडेमस पंथीय नाही. उदी काढली, दिला मंत्र हे आमचं तत्त्व नाही. शास्त्रोक्त अभ्यास हीच बैठक आमची.
चंपक : म्हणून तर मी तुमचा क्लायंट आहे. पळतो आता. लवकर झोपून ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सो कल्टी.कॉम.