दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने अक्षरक्ष: झंझावाताचे दर्शन घडवल्याने सट्टेबाजार गडबडला. न्यूझीलंडच्या प्रत्येक फटक्याने सट्टेबाजांचा विश्वास डळमळीत झाला.
पंटर्सनी या सामन्यामुळे मोठी कमाई केली. सट्टेबाजाराला चांगलाच फटका बसला. दक्षिण आफ्रिकेलाच कौल देणाऱ्या सट्टेबाजांनी न्यूझीलंडला कमीच महत्त्व दिले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयावरून सट्टेबाजांनी बांधलेले सगळेच अंदाज फोल ठरवले.
४३ षटकांत २९८ धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलवणार नाही, असाच सट्टेबाजांचा होरा होता. परंतु तो साफ फसला. सट्टेबाजांचे आता लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे लागले आहे. अर्थात आताही सट्टेबाजांचा कौल ऑस्ट्रेलियालाच आहे.
न्यूझीलंडसारखा चमत्कार भारतीय संघ करील असे सट्टेबाजांना अजिबात वाटत नाही, तरीही भारतीय संघाच्या चमत्कार कुवतीबद्दल सट्टेबाज आशावादी आहेत. त्यामुळेच सट्टेबाजांनी ऑस्ट्रेलियाला कौल दिलेला असला तरी भारताला कमी लेखलेले नाही. अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया असेल असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.
सामन्याचा भाव
भारत          ऑस्ट्रेलिया
९० पैसे            ५५ पैसे
निषाद अंधेरीवाला