युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अर्थात अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता. मात्र क्रिकेटच्या नकाशावर अमेरिकेचे स्थान नाममात्र. म्हणूनच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होत असलेल्या क्रिकेटच्या महासोहळ्याशी त्यांचा सुतराम संबंध नाही. पण प्रत्यक्ष खेळण्याशी नसला तरी अमेरिकेतच सर्वाधिक क्रिकेटप्रेमी ‘फेसबुक’कर नेटिझन्स असल्याचे स्पष्ट झाले आहे.
समाजमाध्यमांतील अग्रणी असलेल्या ‘फेसबुक’ने जाहीर केलेल्या अंतर्गत चाचणीद्वारे अमेरिकेचे क्रिकेटप्रेम उघड झाले आहे. ‘फेसबुक’ वापरणाऱ्या आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते असणारे सर्वाधिक अर्थात ४५ टक्के नेटिझन्स भारतीय आहेत. आश्चर्यकारकरीत्या या यादीत दुसऱ्या स्थानी अमेरिकेतील नेटिझन्स आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने हजारो भारतीय अमेरिकेच्या विविध भागांत स्थायिक झाले आहेत. परदेशात आल्यावरही त्यांचे क्रिकेटप्रेम कमी झालेले नाही हे ‘फेसबुक’च्या पाहणीवरून नक्की झाले आहे.
फेसबुककर मंडळींच्या टाइमलाइन, अ‍ॅप्स, लाइक केलेली पाने आणि अन्य गोष्टींतून क्रिकेटप्रेमाचा दाखला मिळाला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचे पेज नेटिझन्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी निवड समिती सक्षम आहे. मात्र संघात कोण असावे आणि कोणाला काढावे यावर ‘फेसबुक’च्या असंख्य पानांवर खमंग चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.