News Flash

धुळवड

‘‘आयना का बायना, घेतल्याशिवाय जायना.. शबय, शबय..’’ असे ओरडतच जेसन होल्डर होळीपाशी आला. विराट कोहली तिथे कुणाला तरी शिव्या घालत उभा होता.

| March 8, 2015 05:40 am

‘‘आयना का बायना, घेतल्याशिवाय जायना.. शबय, शबय..’’ असे ओरडतच जेसन होल्डर होळीपाशी आला. विराट कोहली तिथे कुणाला तरी शिव्या घालत उभा होता. होळीपाशी इतकी गर्दी होती की, विराट कुणाचा उद्धार करतो आहे, हेच कळत नव्हतं. होळीच्या दिवशी शिव्या देणं ही परंपरा पाळत विराट बहुतेक शिव्या wc01हासडत होता.
‘‘बा देवा महाराजा, हे आपले माही महाराजा.. आणि दुसरे हे आपले जेसन महाराजा..’’ दोघांच्या नावानं होळीपाशी प्रार्थना झाली. ‘‘या धुळवडीत तुझ्यासहित तुझ्या सर्व सवं‘गडय़ां’ना आम्ही रंगवणारच!’’ जेसनने शड्डू ठोकताच धोनीनं हातातलं नाणं आकाशात भिरकावलं. कौल जेसनच्या बाजूनं लागला. जेसन आणि मंडळींनी पुन्हा एकदा ‘शबय, शबय’चा नारा लावला. धोनी आणि मंडळी हिरमुसली. आधी धोनीच्या संघानं जेसनच्या संघाला रंगवायचं होतं. धोनीनं सवंगडय़ांना दक्षतापूर्वक पेरलं. जेसननं स्मिथ आणि ख्रिस गेल यांना मदानात उतरवलं. गेलची ती भयानक थंड नजर धोनी आणि मंडळींच्या अंगावर शिरशिरी आणत होती. ताडमाड गेल रुळला, की मग त्याला रंगवून बाद करणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत धोनीच्या सवंगडय़ांनी कंबर कसली.
सगळ्याचं लक्ष गेलकडे होतं म्हणून स्मिथ थोडासा बेसावधच होता. याचा फायदा घेत शमी वेगात आला आणि काही कळायच्या आतच धोनीनं स्मिथला पाठीमागून पकडलं. शमीनं ‘‘बुरा ना मानों होली है’’ म्हणत स्मिथला रंगवून टाकलं. एकच गदारोळ उठला. ‘‘होळीला गवऱ्या पाच पाच, डोक्यावर घेऊन नाच नाच’’ असं म्हणत विराट बेभान नाचू लागला. ते पाहून सॅम्युअल आणि गेल बाचकले. काहीच न सुचल्याने सॅम्युअल धावत सुटला, पण भांबावलेला गेल जागेवरच थांबला. गेलची जोड न मिळल्यामुळे सॅम्युअलला काय करावं, हेच सुचत नव्हतं. विराटने नाच थांबवला आणि ‘‘होली है’’ म्हणत सॅम्युअलला रंगवून टाकलं. धोनी आणि मंडळी विराटनं काय चकवलं म्हणत हसू लागली.. आणि थंड गेल भडकला. भांगेची थंडाई त्यात सुरा मिक्स करून तो गटागटा प्यायला. गल्लीतून मदानात येत मोठमोठय़ानं सिंहनाद करीत गेल बोंब मारत कॅरेबियन डान्स करू लागला. गेलच्या पदन्यासाने मदानात धुरळा उडू लागला. त्या क्षणी असंच वाटू लागलं की, आता गेल चक्रीवादळाचंच रूप घेणार. तसं झालं असतं तर मात्र धोनी आणि सवंगडय़ांची दयनीय अवस्था झाल्यावाचून राहिली नसती. जेसनच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट आली आणि त्यांनी मिळेल ती वाद्य्ो बडवत बोंबाबोंब करायला सुरुवात केली. जोनाथन कार्टर आणि गेल मिळून धोनीच्या सवंगडय़ांच्या तोंडचं पाणी पळवणार असं वाटत असताच हुकमी वेगात येत शमीनं गेलला अख्खा भिजवला. त्यानंतर शमी, मोहित शर्मा, उमेश यादव हे ‘‘होळी रे होळी पुरणाची पोळी. आम्हाला मिळाले वेस्ट इंडिजचे बळी’’ असं केकटत जेसनच्या सवंगडय़ांना एकापाठोपाठ एक करत रंगवत सुटले. धोनी समर्थकांनी जोरात गलका केला, ‘‘होली है!’’
कर्टनी अ‍ॅम्ब्रोजनं काय समजावलं कुणास ठाऊक जेसनचा पूर्ण संघ मदानात उतरला तोच चंग बांधून. आता धोनी आणि मंडळींना कमीत कमी वेळात रंगवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिखर धवननं टेलरला दमवायला सुरुवात केली. आधी शिखरला, नंतर रोहितला टेलरनं रंगवून टाकलंच. कोहली ऐकणार नव्हता, त्याचा आत्मविश्वासही दांडगा. एकदा का तो टिकला की गल्लीन गल्ली माहीत असल्यासारखा तो सापडत नाही. अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यातच खेळत होता. त्यानं रसेलला सतवायला सुरुवात केली. अचानक विराटला रसेलनं पकडलं. उत्साहाच्या भरात असलेला विराट माघारी परतला आणि भीतीची पाल समर्थकांच्या मनात चुकचुकली. रहाणे आणि रैना दोघे मिळून जेसन मंडळींवर हल्लाबोल करतील असे वाटत असतानाच रहाणेला त्यांनी जवळ जवळ ढापलाच. त्यानं दाद मागितली, पण तो घामानं भिजला की रोचनं उडवलेल्या पाण्यानं हे काही लक्षात येत नव्हतं.
मग धोनी खेळात उतरला. स्मिथच्या जाळ्यात रैना सापडलाच. रसेल तर शिमगा करीतच आला. छान वेशभूषा करून रोंबाट मारायचे, हे त्यानं ठरवलं होतं; पण जेसन आणि मंडळींनी त्याला वेळ दिलाच नाही. त्यामुळे त्याला केवळ केशभूषेवर समाधान मानावं लागलं. धोनीनं त्याची भंबेरी उडवायला सुरू करताच जेसननं रसेलला लपवूनच ठेवलं. स्मिथला चौकात घेऊन धोनी पुढे निघाला. पुढे चौकातच त्याने सॅम्युअल्सला उताणा पाडताच धोनी समर्थक ओरडले, ‘‘आयनाच्या बायना, घेतल्याशिवाय जायना.. शबय, शबय..’’
जेसन हरला; पण खरं तर होळीचा आनंद त्यांनीही लुटला होता. ‘‘भारतानं होळी साजरी करावी आणि आशा आहे की आम्ही विजयोत्सव साजरा करू!’’ असं जेव्हा सॅमी म्हणाला होता, तेव्हा कुणाला माहीत होते की, वेस्ट इंडिज आणि भारत दोघे मिळून मदानात खरंच अशी धुळवड साजरी करतील? शेजारी पाकिस्तानातही गेले दोन दिवस उत्सव साजरा होत आहे. भारतीय पोरं हुशार म्हणत शुक्रवारी ते नाचले. कारण वेस्ट इंडिज हरल्याचा फायदा पाकिस्तानलाच झाला आणि शनिवारी दक्षिण आफ्रिकेसारख्या कडव्या संघाला त्यांनी हरवलं. भारतीय होळीत पहिल्यांदाच पाकिस्तानही सामील होऊन जल्लोष करू लागला. अशा रीतीने होळी सफल साजरी झाली. ‘‘शबय, शबय..’’ म्हणत समर्थक रंगवलेल्या चेहऱ्यावर पाणी मारू लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 5:40 am

Web Title: cricket world cup entertainment
Next Stories
1 तोफांचा ‘ब्रँड’ तोच, दारूगोळा हलका!
2 विजयाचा निश्चय
3 बदलती समीकरणे
Just Now!
X