popat(मरिन ड्राइव्ह किनारी किऑस्कसदृश पोर्टेबेल युनिट उभं आहे. तोताराम ऊर्फ तॅत्स आपल्या होरोगॅझेट्सना एका सॉफ्ट ब्रशने साफ करतोय. शोधक नजरेने चंपक इकडून तिकडे फिरताना दिसतो)
तॅत्स : वेलकम, मिस्टर चंपक
चंपक : तोतारामभौ, अहो काय हे?
तॅत्स : जाणारा जातो, आठवणी उरतात पण आपल्याला जगावंच लागतं. तुम्ही म्हणालात ना मागे, कॉलसेंटर्समध्ये नावं बदलवतात. तुमचा तोताराम आता तॅत्स झालाय.
चंपक : तुम्ही एकटेच?
तॅत्स : लढाई एकटय़ाचीच असते. म्हणून तर एकला चलो रे म्हणतात ना.. पण तुमचा मुद्दा कळला. फिकर नॉट. तुमचं काम आता महासागराएवढा डेटा साठवणारं, पण छोटंसं मशीन सांगणार आहे.
चंपक : काय राव मजाक करता. हे सगळं कुठून आणि कसं आणलंत?
तॅत्स : दिवसरात्र एक केला. आयुष्यभराची पुंजी एक केली आणि हे खरेदी केलं.
चंपक : काय सांगतं तुमचं मशीन आफ्रिका-श्रीलंका मॅचबद्दल?
(तॅत्स दोन बटनं दाबतो, बीप असा आवाज होतो आणि टेक्स्ट स्क्रीनवर अवतरतो.)
तॅत्स : दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड आहे. श्रीलंकेविरुद्धची त्यांची प्रत्येक मॅच कट्टर होते. आफ्रिकेच्या दहा खेळाडूंनी एबीला खारीच्या वाटय़ाएवढी साथ दिली तरी ते जिंकतात. कारण श्रीलंकेचा संघ दुखापतींमुळे विस्कळीत झालाय. संगकारा आणि दिलशानने आतापर्यंत जबाबदारी पेलली आहे. पण प्रत्येक सामन्यात त्यांच्यावरच भार टाकणं श्रीलंकेला अडचणीत टाकू शकतं. मलिंगाचं कोडं आफ्रिकेसमोर आहेच. पण प्रसन्न-सेनानायके यांची फिरकीही त्यांना सतावू शकते.