बरगडय़ांना झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. कमिन्सने न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीद्वारे विश्वचषक पदार्पण केले होते. या सामन्यात कमिन्सने ३८ धावांत २ बळी घेतले होते, तर फलंदाजीत सात धावा करताना ब्रॅड हॅडिनसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतीतून जेमतेम सावरला आहे. पूर्ण तंदुरुस्त नसल्याने अष्टपैलू जेम्स फॉल्कनर अजून एकही सामना खेळू शकलेला नाही. या यादीत आता कमिन्सची भर पडल्याने ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाच्या चिंता वाढल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत पहिल्या षटकात गोलंदाजी करताना पडला होता. त्या वेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती. बरगडय़ांना त्रास जाणवत असल्याने त्याने माघार घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी आशा ऑस्ट्रेलियाच्या संघाचे फिजिओथेरपिस्ट अ‍ॅलेक्स कोंटुरिस यांनी सांगितले.
जेम्स फॉल्नकर तंदुरुस्त
पर्थ : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनर तंदुरुस्त झाला असून, तो अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषक पदार्पण करण्याची शक्यता आहे. बरगडय़ांना झालेल्या दुखापतीमुळे २४ वर्षीय फॉल्कनर विश्वचषकात अजून एकही लढतीत खेळू शकलेला नाही. प्रमुख गोलंदाज व हाणामारीच्या षटकात उपयुक्त फलंदाजी करणारा फॉल्कनर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. फॉल्कनरच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बळकट होणार आहे. फॉल्कनरसाठी शेन वॉटसन किंवा ग्लेन मॅक्सवेल यांच्यापैकी एकाला संघातून डच्चू देण्यात येईल.