News Flash

सिली पॉइंट : इथे खेळपट्टीला पाय फुटतात!

‘पोर्टेबिलिटी’ अर्थात ‘सहजपणे ने-आण करता येणारी गोष्ट’ हा शब्द सध्या परवलीचा शब्द आहे. लॅण्डलाइन ते स्मार्टफोन व्हाया पेजर या दूरसंचार क्रांतीत ‘पोर्टेबिलिटी’च महत्त्वाची आहे.

| March 24, 2015 03:58 am

wclog02‘पोर्टेबिलिटी’ अर्थात ‘सहजपणे ने-आण करता येणारी गोष्ट’ हा शब्द सध्या परवलीचा शब्द आहे. लॅण्डलाइन ते स्मार्टफोन व्हाया पेजर या दूरसंचार क्रांतीत ‘पोर्टेबिलिटी’च महत्त्वाची आहे. हे दळणवळण क्रीडापटू विशेषत: क्रिकेटपटूंनाही लागू झालं आहे. ३६५ पैकी ३४० दिवस कुठली ना कुठली स्पर्धा खेळणाऱ्या क्रीडापटूंची ‘पोर्टेबिलिटी’ अधोरेखित झाली आहे. आता हे क्रिकेटपटू ज्या खेळपट्टीवर हा सगळा खेळ मांडतात, तीच पोर्टेबल म्हणजे स्थलांतरित झाली तर..? माती, गवत, वाळू यांनी तयार होणाऱ्या या तुकडय़ालाच पाय फुटले तर..? विचित्र वाटतंय ना? पण हे खरं आहे आणि अगदी शास्त्रोक्त आहे. स्थलांतरित होऊ शकणाऱ्या या संकल्पनेचं मूर्त रूप म्हणजे ‘ड्रॉप इन’ खेळपट्टी. हे सगळं समजून घ्यायचं निमित्त म्हणजे विश्वचषक स्पर्धा. क्रिकेटविश्वाचा मानबिंदू असणाऱ्या स्पर्धेत अनेक सामने या ‘चालत्या-फिरत्या’ खेळपट्टय़ांवर होत आहेत.
मोठय़ा आकाराचं मैदान केवळ एका खेळासाठी वापरण्याची चैन कोणत्याच संघटनेला परवडणारी नाही. त्यामुळे एखादं स्टेडियम हे बहुविध खेळांसाठी उपयोगात आणण्याची शक्कल संघटकांना सुचली. आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर हा पर्याय तांत्रिकदृष्टय़ा अडचणीचा होता. कारण प्रत्येक खेळासाठी नियम आणि मैदानाचा आकार वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ क्रिकेटसाठी मुख्य खेळपट्टी आणि सभोवताल वापरला जातो तर रग्बीसाठी अख्खं मैदान लागतं, पण त्याचा आकार क्रिकेटच्या तुलनेत कमी असतो. प्रत्येक खेळाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. रग्बीसारख्या धसमुसळ्या खेळात खेळाडूंच्या सततच्या वावरण्यामुळे मैदानाच्या पृष्ठभागाचे नुकसान होत असते. क्रिकेटसाठी मैदानाच्या मध्यभागी असणारा तुकडा अतिशय महत्त्वाचा असतो. एका खेळामुळे दुसऱ्या खेळाचे नुकसान होऊ नये, या जाणिवेतून ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीचा उदय झाला.
खेळपट्टीचा आकार असतो २२ यार्ड म्हणजेच २०.१२ मीटर लांबी आणि ३.०५ मीटर रुंदी. खेळपट्टी ज्या ठिकाणी बसवायची आहे, त्या ठिकाणी खेळपट्टीच्या आकार आणि त्याच्याभोवतीचा परिसर खणण्यात येतो. जमिनीच्या खाली ०.२ मीटर एवढं खोदलं जातं, जेणेकरून कृत्रिम खेळपट्टी त्यात तंतोतंत बसू शकते. २० टन वजनाची खेळपट्टी एका कंटेनरसारख्या मोठय़ा वाहनातून आणली जाते. ३५ सेंटीमीटरचा काळ्या मातीचा थर स्थिर राहण्यासाठी एक मोठी जाळी, लाकडी मेखांसह बसवलेली असते. माती, गवत यांनी आच्छादलेली खेळपट्टी आणि त्याखाली मातीचा आच्छादित थर असा हा वजनी प्रकार उचलण्यासाठी कंटेनरसह क्रेनही मैदानात
अवतरते. कंटेनर आणि क्रेन यांसारख्या मोठय़ा वाहनांमुळे मैदानाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्लायवूडचा पृष्ठभाग अंथरण्यात येतो. खेळपट्टी
सुरक्षित राहावी यासाठी सच्छिद्र आवरणाची पट्टी बसवलेली असते.
खेळपट्टी घट्ट आणि स्थिर राहावी यासाठी स्टीलचे रॉड आणि स्क्रू बसवलेले असतात. खेळपट्टी मैदानात आणल्यानंतर हे रॉड आणि ५०० स्क्रू बाजूला काढले जातात. अजस्त्र क्रेनच्या साह्य़ाने ही खेळपट्टी पसरवली जाते. स्वयंपाकघरात वडय़ा बनवताना साच्यात सारण थंड होण्यासाठी ठेवले जाते आणि घट्ट झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडल्या जातात. सारण थंड झाल्यावर साच्यातून अलगदपणे वडय़ा पाडल्या जातात, तोच यांत्रिक अलगदपणा ‘ड्रॉप इन’ खेळपट्टी बसवताना आणि काढतानाही अंगीकारला जातो. खेळपट्टी त्या खोदलेल्या साच्यात बसवल्यानंतर बाजूच्या भागाला एकरूप करण्यात येतं. जेणेकरून खेळपट्टी आणि अन्य भाग समान पातळीचा होतो. ट्रक तसेच कंटेनर, क्रेनसारख्या मोठय़ा वाहनांची दळणवळण होऊ शकेल अशा मैदानांवरच हे ‘ड्रॉप इन’ खेळपट्टी बसवता येतो. साधारणत: क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर खेळपट्टी काढली जाते. खेळपट्टीचा हा तुकडा जवळच्या छोटय़ा मैदानात नेऊन त्याची जोपासना केली जाते. खेळपट्टी बाजूला झाली की अन्य खेळांसाठी हे मैदान खुलं होतं. त्या खेळाचा हंगाम संपला की मग विश्रांती स्थितीतला हा तुकडा पुन्हा मैदानात विराजमान होतो. हा सव्यापसव्य करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर पैसा आणि अत्याधुनिक साधनांची आवश्यकता असल्याने तूर्तास मोजक्याच मैदानांवर ‘ड्रॉप इन’चा प्रयोग रुजला आहे. विश्वचषकाची अंतिम लढत होणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ‘ड्रॉप इन’ खेळपट्टी आहे. न्यूझीलंडच्या इडन पार्कवरही ही सुविधा आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि स्थापत्य या शास्त्रांचा आधार घेत हा प्रयोग होतो. ‘ड्रॉप इन’ खेळपट्टी फलंदाजांना साजेशी होते. भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमी खडतर ठरतो. यंदाही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकू शकला नाही. तिरंगी स्पर्धेतही त्यांची कामगिरी यथातथाच झाली. मात्र आपल्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. याचं कारण बहुतांशी सामने ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ांवर झाले. या खेळपट्टय़ा नैसर्गिकच असल्या तरी त्यांची निगा स्वतंत्रपणे राखली जात असल्याने या खेळपट्टीवर चेंडूला प्रचंड उसळी मिळत नाही. भारतीय फलंदाजांना नेहमीच ऑस्ट्रेलियात जी अडचण जाणवते, त्या समस्येची तीव्रता ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ांनी कमी केली.
आपल्याकडेही हे पेव येऊ पाहतंय. पण त्याआधी भारताने विश्वविजेतेपदाची कमाई केली तर आपल्या यशात या ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ांचा वाटा असेल. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधले प्रयोग आपल्या पथ्यावर पडू शकतील. तसं झालं तर मग भारतातही ‘ड्रॉप इन’ खेळपट्टय़ांची प्रथा रूढ होऊ शकते.
पराग फाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2015 3:58 am

Web Title: customary practice of drop in pitches
टॅग : Cricket World Cup
Next Stories
1 पडद्यामागील शिलेदार
2 एक्स्ट्रा इंनिग : फटकेबाजीची संगत, पण हरवली रंगत!
3 दमलेल्या धोनीची कहाणी!
Just Now!
X